एकाच दिवसात रत्नागिरीत ३३, तर सिंधुदुर्गात १२ रुग्ण करोनामुक्त

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (११ जून) एकाच दिवसात ३३ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.५९ टक्के झाले आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज एकाच दिवसात १२ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

रत्नागिरीची स्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांची एकूण संख्या काल (१० जून) रात्रीच्या दोन पॉझिटिव्ह अहवालांनंतर ३७२ झाली. आज (११ जून) घरी सोडलेल्या रुग्णांसह आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४४ झाली असून, रुग्णालयात ११३ जण उपचार घेत आहेत. आजवर जिल्ह्यातील एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज कुवारबावच्या समाजकल्याण केंद्रातून १५, साडवलीतून १०, वेळणेश्वरातून एक, सावर्डे, गुहागर आणि कामथे येथून प्रत्येकी दोन आणि दापोलीतील एक अशा ३३ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.

जिल्ह्यात सध्या ६७ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात ९, गुहागर तालुक्यात ५, खेड तालुक्यात ६, संगमेश्वर तालुक्यात ७, दापोलीत ९, लांजा ६, चिपळूण १४ आणि राजापूर तालुक्यात १० गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत. संस्थात्मक विलगीकरणासाठी ८३ रुग्ण दाखल आहेत. होम क्वारंटाइन केलेल्या आणखी पाच हजार जणांची संख्या आजही कमी झाली. सध्या ५४ हजार ३०१ जण होम क्वारंटाइन आहेत.

जिल्हा रुग्णालयामार्फत आतापर्यंत एकूण ७ हजार ११८ नमुने तपासण्यात आले असून, त्यापैकी ६ हजार ७५५ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ३७२ अहवाल पॉझिटिव्ह, ६ हजार ३६० निगेटिव्ह आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयास काल (१० जून) प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी सात व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. हे सातही रुग्ण सावंतवाडी तालुक्यातील आहेत. त्यामध्ये इन्सुली येथील तीन, देऊळवाडी येथील एक आणि मळेवाड येथील तीन व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांनी मुंबई व ठाणे येथून प्रवास केला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १४७ झाली आहे.

रुग्णालयातून आज आणखी १२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५३ झाली आहे. जिल्ह्यातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या १२१ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ८८ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, तर ३३ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल आहेत.

परराज्यातून व महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांतून दोन मेपासून आजअखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ८७ हजार १९४ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज खारेपाटण येथील चेकपोस्ट, तसेच वैभववाडी, फोंडा, कणकवली येथील कोविड केअर सेंटरची पाहणी केली. त्या वेळी त्यांच्यासोबत जिल्हा शल्यचिकित्सक, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
………..

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply