तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सद्गुरू वामनराव पै यांनी यशस्वी जीवनाचा मूलमंत्र ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या त्यांच्या प्रसिद्ध उक्तीतून दिला आहे. करोनाचे जगद्व्यापी संकट आणि कोकणात निसर्ग चक्रीवादळाने दिलेला दणका या पार्श्वभूमीवर या उक्तीचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.

करोनाने आता हळूहळू गावागावांनाही व्यापले आहे. सुरुवातीच्या काळात तयार केलेल्या अनेक व्याख्या सातत्याने बदलाव्या लागल्या आहेत. संचारबंदीची पहिली घोषणा झाली, तेव्हा जारी केलेले सुरक्षिततेचे नियम वगळता वेगवेगळे झोन, अलगीकरणाची मुदत यामध्ये सातत्याने बदल झाला आहे. नियम आणि व्याख्या जसजशा बदलत गेल्या, तसतसे सर्वसामान्यांचे जगणे अधिकाधिक कठीण होत गेले, ही वस्तुस्थिती आहे. जगण्याचा सर्व डोलारा आर्थिक गणितावर आधारलेला असतो. घराबाहेर पडले तर पैसे लागतातच, पण घरातच राहिले तरीही पैसे लागतात. त्यामुळे साठवलेले पैसे संपल्यानंतर प्रत्येकाची कोंडी झाली. जे पैसे साठवू शकत नाहीत, त्यांच्या हालांना तर पारावारच नाही. उच्च उत्पन्न गटातील मूठभर लोक सोडले, तरी मध्यमवर्गीय आणि अतिसामान्यांची आर्थिक स्थिती फारशी वेगळी राहिलेली नाही. सर्वच हालचालीवर मर्यादा आल्यामुळे पैसे हा जगण्याचा मुख्य स्रोत कसा पुनरुज्जीवित करायचा, हा प्रश्न साऱ्यांसमोर आहे. आता संचारबंदीचे नियम बरेचसे शिथिल झाले असले, तरी मूळचे उत्पन्नाचे स्रोत बुजलेले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. बहुतेकांना निम्म्याहून कमी वेतनावर काम करावे लागते. मोठे उद्योग अजूनही सुरू झालेले नसल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या रोजंदारीवरील कामगारांना मेहनताना मिळू शकलेला नाही. अशा स्थितीत अनेकांनी आपापल्या परीने पैसे मिळविण्याचे वेगवेगळे उपाय शोधून काढले. विलगीकरणात असलेल्या अनेक चाकरमान्यांनी कोकणात साफसफाईपासून शाळांच्या दुरुस्तीपर्यंतची कामे केली. कोणी विहीर खोदली. कोणी बागा केल्या. व्यापारात कमालीचा तोटा झाल्याने भिकारी झालेल्या व्यापाऱ्यांविषयी आपण ऐकले-वाचलेले असते. पण करोनाच्या काळात एका भिकाऱ्याचा व्यापारी झाला. अर्थातच त्याला प्रेरणा देणारा कोणीतरी होता म्हणून ते शक्य झाले. कोणी वेगवेगळे उपयोजित अभ्यासक्रम पूर्ण केले. कोणी कलेचे छंद जोपासले. तेही विषयात त्यांना अर्थार्जनासाठी उपयुक्त ठरू शकतील. त्यातून त्यांनी वेगळे काही केल्याचा आनंद तर मिळवलाच, पण आर्थिक कमाईचा वेगळा मार्गही त्यांना त्यातून सापडला. मुंबईतून आलेले आणि रोजगार गमावलेले किंवा गमावण्याची शक्यता असलेले चाकरमानी शेतीमध्ये लक्ष गुंतवू पाहत आहेत.

याच ठिकाणी ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ ही उक्ती सार्थ ठरते. पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताचा दिलेला संदेश कुचेष्टेचा ठरू शकतो. पण आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेलेल्या प्रत्येकाला त्या संदेशाकडे गांभीर्याने पाहायला हवे आहे. सरकारी मदतीची अपेक्षा तर कोणीच करून चालणार नाही. कारण केंद्र आणि राज्य सरकारनेही आपल्या तिजोऱ्या पुन्हा न भरणाऱ्या कारणांसाठी रिकाम्या केल्या आहेत. त्यातून सरकारला सावरायलाही कित्येक वर्षे जावी लागतील. कष्ट करून पैसे मिळवू शकणाऱ्या प्रत्येकाने हे लक्षात घेतले, तर त्यातून मार्ग निघू शकेल. निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवर प्रचंड नुकसान झाले. वर्षानुवर्षांच्या बागा दोन-तीन तासांमध्ये नष्ट झाल्या. तात्पुरत्या स्वरूपात अत्यावश्यक सुविधा त्यांना देणगीच्या माध्यमातून मिळतीलही, पण आर्थिकदृष्ट्या पुन्हा एकदा उभारी घ्यायची असेल तर त्यासाठी काहीतरी केले पाहिजे. उद्ध्वस्त झालेल्या नारळी-पोफळीच्या बागांची साफसफाई करून तेथे नव्याने लागवड केली, तरी पुढची आठ-दहा वर्षे त्या बागांपासून त्यांना कोणतेही उत्पन्न मिळणार नाही. उलट बागांची देखभाल करण्यासाठीच खर्च करावा लागणार आहे. त्या बागायतदारांना कोकण कृषी विद्यापीठाने लगेच उत्पन्न मिळू शकतील, अशी कंदपिके घेण्याचा सल्ला दिला आहे. बागायतदारांना असे मार्गदर्शन मिळाले, तरी अन्य क्षेत्रात मार्गदर्शन शकणारेही स्वतः आर्थिक चिंतेत असल्यामुळे कोणाच्या मार्गदर्शनाची वाट पाहत राहण्यात काहीही अर्थ नाही. आपला मार्ग आपल्यालाच शोधायला हवा. त्याशिवाय स्वतःची आणि पर्यायाने राज्याची, देशाची अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर येण्याची शक्यता नाही.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १२ जून २०२०)
    (हा अंक मोफत डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply