मुंबई : दोन दिवस कोकणाचा दौरा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (११ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. कोकणातील निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची माहिती पवार यांनी त्यांना दिली. फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची निकड त्यांना सांगण्यात आली.
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी नुकताच दोन दिवसांचा दौरा श्री. पवार यांनी केला. या पाहणीत आणि स्थानिकांशी केलेल्या संभाषणाद्वारे मिळालेल्या माहितीबाबत श्री. पवार यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे आणि उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्याशी मुंबईत चर्चा केली. बैठकीत नुकसानभरपाईत वाढ करण्याच्या मुद्द्यास प्राधान्य देण्यात आले. सर्व भागातील नुकसान पाहता प्रत्यक्षात घटनास्थळी पंचनामे करून त्याची आकडेवारी घ्यायला हवी. यात सर्वप्रथम विद्युत आणि पाणीपुरवठा कसा सुरळित करता येईल यावर भर द्यायला हवा, अशी सूचना श्री. पवार यांनी केली.
फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची निकड श्री. पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली, जेणेकरून या भागातील शेतकरी पुन्हा उभारी घेऊ शकेल. यासाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्याची वेळ आल्यास तेदेखील करावे लागेल, असेही श्री. पवार यांनी सुचविले. चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या फळबागा पुन्हा उभ्या करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची जुनी रोजगार हमी योजना लागू करून, फळबाग लागवड योजनेशी त्याची सांगड घातल्यास हा मार्ग अधिक उपयुक्त ठरू शकेल, अशी सूचनाही करण्यात आली.
चक्रीवादळात घरे, बागा यांचे मोठे नुकसान झाले आहे. भिंती-छप्परे आणि झाडे पडल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. ते साफ करून घरे, बागा व दुकाने स्वच्छ करावी लागतील. हे मोठे काम असल्याने यासाठी रोजगार हमी योजनेचा वापर करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. पर्यटनक्षेत्राला मोठ्या प्रमाणात निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दापोली, अलिबाग, मुरूड-जंजिरा वगैरे भागात करोनापाठोपाठ चक्रीवादळामुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज वाटते, असेही स्पष्ट केले. बहुतांश भागातील बँका बंद असल्याने नागरिकांच्या हाती पैसे नाहीत. शेती व इतर व्यवसायांचे जुन्या कर्जांचे हप्ते भरण्यासाठी तसेच नवीन कर्ज देण्यासाठी बँका सुरू होणे गरजेचे आहे. नवीन कर्ज घेताना संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही सवलती देता येतील का, हे पाहणे जरूरीचे आहे, अशी सूचनाही श्री. पवार यांनी केली.
