रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात काल (ता. ११ जून) सायंकाळपासून आजपर्यंतच्या २४ तासांमध्ये मिळालेल्या करोनाविषयक अहवालांनुसार २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ३९२ झाली आहे. करोनामुक्त झाल्याने आज १५ जणांना घरी पाठविण्यात आले. सिंधुदुर्गात दोन नवे रुग्ण सापडले असून, तिघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरीत आज सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील १२, तर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील आठ जणांचा समावेश आहे. दरम्यान, करोनामुक्त झाल्याने आज १५ जणांना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या २५९ झाली आहे. आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून विविध रुग्णालयांमध्ये ११८ जण उपचार घेत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ६५.५ टक्के आहे. आज रत्नागिरीतील समाजकल्याण भवनातून ८, जिल्हा रुग्णालयातून २, कोव्हिड केअर सेंटर, घरडा इन्स्टिट्यूट, लवेल, खेड येथून ३ आणि साडवलीतून २ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
जिल्ह्यात सध्या ६७ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात ९, गुहागर ५, खेड ६, संगमेश्वर ८, दापोली ९, लांजा ६, चिपळूण १४, तर राजापूर तालुक्यात १० गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
जिल्ह्यातील होम क्वारंटाइनखाली असलेल्यांची संख्या तीन हजारांनी कमी झाली असून सध्या ५१ हजार ८८३ जण होम क्वारंटाइन आहेत.
…………
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयास काल (११ जून) प्राप्त झालेल्या अहवालांनुसार आणखी दोन व्यक्तींना करोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये एक रुग्ण सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथील आणि एक रुग्ण कुडाळ तालुक्यातील पडवे येथील आहे. या दोन्ही रुग्णांनी मुंबई येथून प्रवास केला आहे. जिल्ह्यातील आणखी तीन रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली असून, त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५६ झाली आहे. जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४९ असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
…………………………..
