रत्नागिरी : ‘कोकणातील चक्रीवादळानंतरची परिस्थिती पाहून शासनाने मदत केल्याचे दिसत नाही. शासनाचे अस्तित्वच दिसत नाही,’ अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांनी आज (१२ जून) रत्नागिरी जिल्ह्यातील चक्रीवादळाने नुकसान झालेल्या दापोली आणि मंडणगड तालुक्यांचा दौरा केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
दापोली तालुक्यातील उटंबर, केळशी, आंजर्ले, पाजपंढरी आदी गावांची पाहणी फडणवीस यांनी केली. केळशी, उटंबर येथील कुणबी समाज भवन, घरे आणि बागांच्या परिस्थितीही त्यांनी पाहिली. ते म्हणाले, ‘शासनाने तात्काळ आर्थिक मदत दिली नसून, नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देणे गरजेचे आहे; मात्र दहा दिवसांत एका नव्या पैशाची मदत देण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी आलेल्या महापुराच्या वेळी कोल्हापूरमध्ये शासन निर्णय जाहीर करून लोकांचे बँकांमधील रोखीचे व्यवहार आम्ही सुरू केले होते; मात्र अशी कोणतीच मदत शासनाने कोकणातील चक्रीवादळाने ग्रस्त झालेल्यांसाठी दिलेली नाही. आर्थिक मदतीबरोबरच घरांच्या छपरासाठीही पत्रे तातडीने देणे आवश्यक होते. ती मदत भारतीय जनता पक्षातर्फे देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कोकणात पत्रे बनविणारे चार मोठे कारखाने आहेत. तरीही लोकांना पत्रे पुरविण्याची तजवीज केल्याचे दिसले नाही. शासन अशा तऱ्हेच्या मदतीच्या पातळीवर अपयशी ठरले आहे. सरकारने काहीही केले नाही. हे दुर्दैवी आहे. महावितरण यंत्रणा, मोबाइल, फोन यंत्रणा सारे ठप्प आहे. दहा दिवसांत महत्त्वाच्या कोणत्याच गोष्टी पुन्हा सुरू झाल्या नाहीत. त्यासाठी शासनाने राज्याच्या इतर भागांतून अधिकारी-कर्मचाऱ्यांना नियुक्त करणे आवश्यक होते. तसे झाले नाही.’
‘मच्छीमारांची घरे, बागायती या सगळ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. झाडे आणि बागा उन्मळून पडल्या आहेत. उत्पन्नाचे साधन नष्ट झाले आहे. आता दहा वर्षे तरी बागायतदारांना उत्पन्न मिळणार नाही. उभी दिसत असलेली झाडेही पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता आहे. बँकांकडून दीर्घ मुदतीची कर्जे दिली गेली पाहिजेत. त्याचे व्याज शासनाने भरायला हवे. हा सगळा विचार चाकोरीबाहेर जाऊन करावा लागेल. तरच चांगल्या पद्धतीने मदत पोहोचू शकेल. पर्यटन उद्योगाचाही विचार केलेला नाही,’ अशी टीका फडणवीस यांनी केली.
फडणवीस यांच्यासमवेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार नीलेश राणे, डॉ. विनय नातू, प्रसाद लाड, केदार साठे, भाऊ इदाते आदी सहभागी झाले होते.

रामदास आठवलेंचाही रायगड आणि रत्नागिरी दौरा
‘निसर्ग चक्रीवादळाने कोकणचे सर्व उद्ध्वस्त झाले आहे. कोकण निसर्गरम्य आहे. येथील पर्यटन व्यवसाय, शेती, बागायती, मच्छिमारांच्या बोटी, गावांमधील घरे, समाजमंदिरे उद्ध्वस्त झाली आहेत; मात्र अद्याप वादळग्रस्त कोकणाला शासनाने कोणतीही मदत दिलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणाचे असून, त्यांनी कोकणाला त्वरित मोठी मदत देऊन दिलासा द्यावा,’ असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. रायगडमधील माणगाव, रत्नागिरीतील मंडणगड आणि दापोली या तालुक्यांतील गावांना आठवले यांनी भेट दिली.
मंडणगडमधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गाव असलेल्या आंबडवे गावालाही भेट देऊन त्यांनी पाहणी केली. डॉ. आंबेडकर स्मारकाला भेट देऊन डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला, तसेच त्यांच्या अस्थिकलशाला पुष्पांजली अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.
वादळग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात विलंब करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवर जनता नाराज असल्याचे प्रतिपादन आठवले यांनी केले.
…………………..
