रत्नागिरी : येथील ब्रह्मरत्न संस्थेतर्फे केळशी (ता. दापोली) येथील वादळग्रस्तांसाठी श्रमदान करण्यात आले. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदतही पुरविण्यात आली.
निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीमधील दापोली, मंडणगड तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील केळशी गावात रत्नागिरीच्या ब्रह्मरत्न संस्थेमार्फत श्रमदान करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अनुप पेंडसे आणि सेक्रेटरी कौस्तुभ जोशी यांच्या नेतृत्वाखील १४ जणांचे पथक केळशी येथे गेले. पथक पत्रे, ताडपत्री, चादर-बेडशीट, कौले, आटा, सौरऊर्जेचे दिवे, जनरेटर आणि कटर, पेट्रोल-डिझेल अशा वस्तू घेऊन केळशी येथे पोहोचले. संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरी, पुणे, मुंबई, आंजणारी, वरवडे येथील अनेक लोकांनी आर्थिक आणि वस्तू स्वरूपात मदत दिली होती. त्या जीवनावश्यक वस्तूंचे आपद्ग्रस्तांना वाटप करून या पथकाने, उद्ध्वस्त झालेल्या काही बागा आणि घरांवर पडलेली झाडे तोडून बाजूला केली.
ब्रह्मरत्न संस्थेचे कौस्तुभ जोशी, अनुप पेंडसे, कौस्तुभ सरपोतदार, श्रीवल्लभ केळकर, श्रीनंदन केळकर, अथर्व खांडेकर, चेतन जोशी, अश्विनकुमार जोशी, श्रीकांत जोशी, गणेश साठे, अमेय धोपटकर, आनंद जोशी, मनोहर जोशी, अनिकेत आपटे यांनी हे मदतकार्य केले. (फोटो पाहण्यासाठी सोबतची इन्स्टाग्राम पोस्ट पाहा किंवा येथे क्लिक करा.)
माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत केळशी येथील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी तेथे आले होते. त्यांनी ब्रह्मरत्न संस्थेच्या पथकाने केलेल्या श्रमदानाचे कौतुक केले आणि तेथील सद्यस्थितीबद्दल केळशीचे ग्रामस्थ आणि ब्रह्मरत्नच्या पथकाशी चर्चा केली. (सर्वांत वरील फोटो)
