रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चोवीत तासांमध्ये मिळालेल्या करोनाविषयक अहवालांवरून जिल्ह्यात करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ७० टक्के झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ४३१ असून, आतापर्यंत ३०५ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. दरम्यान, सिंधुदुर्गातही आज (१५ जून) १० जणांना घरी सोडण्यात आले.
रत्नागिरीतील स्थिती
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला काल (ता. १४) सायंकाळपासून आज सायंकाळपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात असलेले १३ रुग्ण करोनाबाधित असल्याचे आढळले. त्या १३ बाधितांपैकी नऊ जण कळंबणीचे, रत्नागिरीतील ३ आणि देवरूखमधील एकाचा समावेश आहे. त्यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या ४३१ झाली आहे. दिवसभरात चौघे जण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील एक आणि कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवनातील कोव्हिड केअर सेंटरमधील तिघांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू करोनामुळे झाला. सध्या रुग्णालयांमध्ये १०९ जण उपचारांखाली आहेत.
जिल्ह्यातील करोनाबाधित क्षेत्रांची संख्या आता घटली असून, ती ३० वर आली आहे. रत्नागिरी तालुक्यात ३, गुहागर तालुक्यात १, , खेड तालुक्यात ४, संगमेश्वर तालुक्यात २, दापोलीत ५, लांजा तालुक्यात १, चिपळूण आणि राजापूर तालुक्यात प्रत्येकी ६, तर मंडणगड तालुक्यातील २ गावांचा त्यात समावेश आहे.
संशयित करोनाबाधित म्हणून संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या ३७ जणांचा तपशील असा– जिल्हा रुग्णालय २०, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – २, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे २, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी १, कोव्हिड केअर सेंटर, घरडा इन्स्टिट्यूट, लवेल, खेड – २, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – ७, कोव्हिड केअर सेंटर, साडवली, संगमेश्वर -३.
मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आल्याने होम क्वारंटाइन करून ठेवलेल्यांची संख्या ५१ हजार ३५५ आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण सात हजार ६२४ नमुने आतापर्यंत करोनासाठी तपासण्यात आले असून, त्यापैकी सात हजार २८८ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ४३१ अहवाल सकारात्मक, तर सहा हजार ८३६ अहवाल नकारात्मक आले आहेत. आणकी ३३६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यातील ४ अहवाल कोल्हापूर येथे, २१६ अहवाल मिरज येथे, तर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ११६ अहवाल प्रलंबित आहेत.
परराज्यातून आणि अन्य जिल्ह्यांतून रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ३६ हजार २६ चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले, तर जिल्हयातून इतर राज्यांत तसेच इतर जिल्हयात ६३ हजार ६५० जण रवाना झाले.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १५४ असून, आज (१५ जून) १० रुग्णांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९४ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सावंतवाडी येथील ७० वर्षीय करोनाबाधित वृद्धाचा आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या चार झाली आहे. हा वृद्ध १० जून रोजी मुंबईतून आला होता. त्यास मधुमेह, उच्चरक्तदाब, श्वसनदाह असे आजार होते.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेपासून आजअखेर एकूण ९६ हजार १७२ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. जिल्ह्यात सध्या देवगडात सहा, कणकवलीत ११, वैभववाडीत तीन, मालवणात पाच, कुडाळात सहा, वेंगुर्ल्यात एक, सावंतवाडीत १० आणि दोडामार्गात दोन असे सक्रिय कन्टेन्मेंट झोन आहेत.
…………………………..
