रत्नागिरी : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाची भूमिका घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर काहीसा मागे राहिलेला प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आमदार श्री. जाधव यांनी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेतल्याने प्रकल्प समर्थकांना बळ मिळाले असून, कोकणच्या विकासासाठी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींनी भूमिका घ्यावी, असे आवाहन प्रकल्प समर्थकांकडून केले जात आहे.
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला गेल्या काही वर्षांपासून विरोध केला जात आहे. स्थानिकांच्या या प्रकल्पविरोधाला शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षांनी पाठबळही दिले. मात्र गेल्या सुमारे दीड वर्षापासून प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने साडेआठ हजार एकरपेक्षा अधिक जमीनमालकांनी प्रकल्पासाठी आपली जमीन द्यायला प्रवृत्त केले आहे. तशी संमतीपत्रेही त्यांनी जनकल्याण प्रतिष्ठानकडे दिली आहेत. प्रकल्पाला विरोध करणारी मोठमोठी आंदोलने झाली, तशीच प्रकल्प राजापुरातच व्हावा, या आग्रही मागणीसाठीही आंदोलने झाली. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर रिफायनरीचा मुद्दा काहीसा मागे पडला. करोनाप्रतिबंधित लॉकडाउनमुळे उद्योग व्यवसाय ठप्प झाले असून आर्थिक मंदी आली आहे. अशा स्थितीत अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा स्थितीत कोकणातील तरुणांना रोजगार हवा असेल, तर रिफायनरी प्रकल्प होणे गरजेचे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी रिफायनरी प्रकल्पाच्या केलेल्या समर्थनामुळे त्याला पाठबळ मिळाले आहे.
सोशल मीडियामधून व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आमदार श्री. जाधव यांनी, कोकणात येणाऱ्या सर्वच प्रकल्पांना आपण विरोध करत राहिलो, तर कोकणातील तरुणांच्या हाताला काम देणे शक्य होणार नसल्याचा मुद्दा मांडला आहे. कोकण विकासाला चालना देणाऱ्या रिफायनरीसह अन्य प्रकल्पांचे स्वागत करीत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या सागवे विभागातील शिवसैनिकांवर शिवसेनेने कारवाई केली होती. सागवे येथे झालेल्या जाहीर मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांनी ‘प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांना चपलेने मारा,’ असे वक्तव्य केले होते. असे असताना शिवसेनेचेच आमदार भास्कर जाधव यांनी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेतली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांनी प्रकल्पाचे समर्थन करून विकासाचा बाजूने कौल दिलेला असताना खासदार श्री. राऊत कोणती भूमिका घेणार आहेत, असा सवाल कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांनी उपस्थित केला आहे. रिफायनरीच्या समर्थनाची भूमिका घेणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकावर कारवाई करून स्वतःच्या हाताने शिवसेना संपविणार का, असा सवालही श्री. आंबेरकर यांनी उपस्थित केला आहे.
…………………………….
