रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या बेलापूर या मुख्य कार्यालयातील सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा दोन दिवसांपूर्वी करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या रोहा, कोलाड आणि रत्नागिरीतील सुमारे तीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
मरण पावलेला पन्नास वर्षे वयाचा कर्मचारी गेल्या नऊ जून रोजी रोहा आणि कोलाड (जि. रायगड) येथे कामासाठी येऊन गेला होता. त्याच वेळी रत्नागिरीतूनही त्याच ठिकाणी तीन कर्मचारी गेले होते. ते कर्मचारी मरण पावलेल्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आले होते. दरम्यान बेलापूरच्या त्या कर्मचाऱ्याचा गेल्या १३ जून रोजी करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. मरण पावलेल्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले असून, त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
रोहा आणि कोलाड येथील कर्मचाऱ्यांबरोबरच रत्नागिरीतील काही कर्मचाऱ्यांनाही आज (१५ जून) क्वारंटाइन करण्यात आले आहे. कोलाड येथे गेलेले रत्नागिरीतील कर्मचारी परत आल्यानंतर त्यांचा रत्नागिरीतील कर्मचाऱ्यांशी संपर्क आला होता. त्यामुळे त्या सर्वांनाच क्वारंटाइन करण्याचा सल्ला देण्यात आला. आज दिवसभर ३० कर्मचाऱ्यांच्या स्वॅबचे नमुने घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे कोकण रेल्वेच्या प्रशासनातर्फे सांगण्यात आले. संबंधितांच्या संपर्कात आलेल्या ५२ जणांची यादी कोकण रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला दिली आहे.
………………………………
