रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळपासून आज (१८ जून) सायंकाळपर्यंतच्या २४ तासांत करोनाच्या दहा रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ४५९ झाली आहे. बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ३४३ असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७४.७२ टक्के झाले आहे. आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्गात दोन नवे रुग्ण आढळले असून, तेथील एकूण रुग्णांची संख्या १५८ झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ जणांना करोनामुक्त झाल्याने आज घरी पाठविण्यात आले. मात्र त्यापैकी एक रुग्ण पुन्हा लक्षणे आढळल्याने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला आहे. त्याला श्वसनाचा त्रास होता. मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले होते.
आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमधील दोघे रत्नागिरीतील कोकणनगर भागातील आहेत, तर एक शृंगारतळी (गुहागर) येथील आहे. इतर सात रुग्णांपैकी खेड तालुक्यातील शिवतर येथील एक रुग्ण, तळे, कासारआडीतील दोन, कर्टेलमधील एक, तर एक रुग्ण खवटी आणि संगमेश्वर तालुक्यातील देवरूखजवळच्या साडवली येथील एक व कडवईतील एक रुग्ण आहे. कोकणनगरमधील काही क्षेत्रास करोनाविषाणू बाधित क्षेत्र (कन्टेन्मेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
बरे झालेल्या नऊ रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. त्यातील पाच जण जिल्हा कोव्हिड रुग्णालयातील तर तीन रुग्ण कोव्हिड केअर सेंटर, समाज कल्याण व एक रुग्ण कोव्हिड केअर सेंटर पेढांबे येथील आहे.
जिल्ह्यात सध्या ४७ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात ११ गावांमध्ये, गुहागर तालुक्यात १, खेड तालुक्यात ६, संगमेश्वर तालुक्यात १, दापोलीत ६, लांजा तालुक्यात ५, चिपळूण तालुक्यात १० गावांमध्ये, राजापूर तालुक्यात ६ आणि मंडणगडमधील एका गावात कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरणातील रुग्णालयांची स्थिती अशी – जिल्हा शासकीय रुग्णालय, – ६, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – १, कोव्हिड केअर सेंटर पेढांबे २, कोव्हिड केअर सेंटर, घरडा इन्स्टिट्यूट, लवेल, खेड – ५, उपजिल्हा रुग्णालय, गुहागर-१, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – ८, कोव्हिड केअर सेंटर, साडवली-संगमेश्वर -२. एकूण २६ संशयित करोना रुग्ण दाखल आहेत.
मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आल्याने होम क्वारंटाइन केलेल्यांची आजअखेरची संख्या ४७ हजार ८८ आहे.
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण ७ हजार ९७४ नमुने तपासण्यासाठी घेतले असून त्यापैकी ७ हजार ७३५ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ४५९ पॉझिटिव्ह, ७ हजार २५६ निगेटिव्ह आले आहेत. आणखी २३९ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामध्ये ४ अहवाल कोल्हापूर येथे, १६२ अहवाल मिरज येथे आणि ७३ अहवाल रत्नागिरीच्या प्रयोगशाळेत प्रलंबित आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक लाख ४० हजार ७७९ चाकरमानी दाखल झाले. जिल्ह्याबाहेर गेलेल्यांची संख्या ६८ हजार १३१ आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी १० रुग्णांना आज (१८ जून) डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या १११ झाली आहे. जिल्ह्यात काल आणखी दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील एक आणि कणकवली तालुक्यातील तरंदळे येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १५८ असून, १११ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. चार रुग्णांचा मृत्यू झाला असून, एक रुग्ण उपचारांसाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज (१८ जून) सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट दिली. रुग्णालयातील परिचारिकांशी त्यांनी संवाद साधला. परिचारिकांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली असून, त्या आपल्या जिल्ह्याच्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल आहेत, अशा शब्दांत त्यांच्या कामाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. (वरील फोटो)
दरम्यान, जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित रेण्वीय निदान प्रयोगशाळेचे १९ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन होणार असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत असणार आहेत. या वेळी खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
…………………………
