रत्नागिरीत १८ दिवसांत वार्षिक सरासरीच्या १८ टक्क्यांहून अधिक पाऊस

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात एकूण वार्षिक सरासरीच्या १८ टक्क्यांहून अधिक पाऊस अवघ्या १८ दिवसांत पडला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ११२.७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १९० मिमी पावसाची नोंद राजापूर तालुक्यात झाली. रत्नागिरी जिल्ह्यात वर्षाला सरासरी ३३५५ मिमी पाऊस पडतो. एक जून ते १८ जून २०२० या कालावधीत १८.४२ टक्के पाऊस झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात १८ जून रोजी सकाळी साडेआठला संपलेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड ७४, मिमी, दापोली १३०, खेड ७० मिमी, गुहागर ८८ मिमी, चिपळूण ७३ मिमी, संगमेश्वर १०५, रत्नागिरी १३९, लांजा १४६ मिमी, राजापूर १९० मिमी.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या, १८ जून रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती पुढीलप्रमाणे – दापोली तालुक्यात मंडणगड दापोली येथे पिसई गावाजवळ झाड पडल्याने वाहतूक बंद झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.

दमदार पाऊस कोसळत असल्याने शेतीच्या कामांना वेग आला असून, अनेक ठिकाणी भाताची पेरणी होऊन रोपे वर आली आहेत. काही ठिकाणी लावणीची लगबग सुरू झाली आहे. हा फोटो रत्नागिरी तालुक्यातील भोके गावातील आहे. (फोटो : कोकण मीडिया)

संगमेश्वर तालुक्यात मौजे देवरुख येथील श्रीमती रेश्मा विष्णू करंडे यांच्या घराचे पावसामुळे २० हजार रुपयांचे नुकसान झाले. जीवितहानी नाही. मौजे मुचरी येथे महादेव मोरे व केशव मोरे यांच्या घराचे पावसामुळे सुमारे तीन लाख ७२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. जीवितहानी नाही. मौजे बेलारी येथील आदर्श माध्यमिक शिक्षा मंदिर शाळेची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळल्याने ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मौजे माखजन येथील शरद पोंक्षे यांच्या घराजवळील संरक्षक भिंत पावसामुळे कोसळल्याने अंशत: नुकसान झाले. जीवितहानी नाही. मौजे मावळंगे येथे किरण दामू ओगले यांच्या घराजवळील संरक्षक भिंत पावसामुळे कोसळल्याने अंशत: नुकसान झाले. जीवित हानी नाही.

आगवे (ता. लांजा) येथील व्हिडिओ

रत्नागिरी तालुक्यात मौजे पंडयेवाडी येथे रस्त्यावर शीळ धरणाच्या पाइपलाइनकरिता रस्त्याच्या दोन मोऱ्या काढल्याने भगवती मंदिराजवळ पाणी तुंबले.

राजापूर तालुक्यात मौजे पेंडखळे येथील सदू गणू म्हादे यांचा गोठा पावसामुळे पडल्याने दोन बैल जखमी झाले आहेत. सुहास धोंडू म्हादे यांच्या गोठ्याचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले असून, जीवितहानी नाही. मौजे कोदवली येथे १६ जून २०२० रोजी महाकाली देवस्थानाजवळ दरड कोसळली होती. परंतु जीवितहानी नाही.
………………………………….

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply