महामानवाच्या आंबडवे गावातील प्रत्येक कुटुंब होणार आत्मनिर्भर

आंबडवे (मंडणगड) : निसर्ग चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या आंबडवे गावातील नागरिकांना पुन्हा नव्याने स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ (डिक्की), खादी ग्रामोद्योग मंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटू) या संस्था एकत्र आल्या आहेत. हे गाव दत्तक घेत असल्याची घोषणा ‘डिक्की’चे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी काल (१८ जून) आंबडवे येथे केली. प्रत्येक घराला उद्योग, त्यासाठीचा कच्चा माल, निर्मितीचे प्रशिक्षण आणि पक्का माल खरेदीची हमी अशी सर्वांगीण योजना त्यासाठी तयार करण्यात आली आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रत्नागिरीच्या उत्तरेकडील मंडणगड आणि दापोली या तालुक्यांना बसला. मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आहे. त्या गावाला पुन्हा नव्या जोमाने उभे राहण्यासाठी मदत करण्याचा विडा डिक्की संस्थेबरोबरच खादी ग्रामोद्योग विकास मंडळ आणि लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटू) या संस्थांनी उचलला आहे.

या उपक्रमात संपूर्ण गाव आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने नियोजन केले असून, गावातील प्रत्येक घरात लघुउद्योग राबवून स्वयंरोजगाराची संधी निर्माण केली जाणार आहे. अगरबत्ती तयार करणे, सौर हातमाग, रुमाल तयार करणे आदींपैकी एक प्रकल्प व यंत्र प्रत्येक घराला देण्यात येणार आहे. यासाठीचा कच्चा माल खादी ग्रामोद्योग मंडळ पुरवणार आहे. तसेच यासाठीचे तंत्रप्रशिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटू) देणार आहे. उत्पादित झालेल्या पक्क्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याची जबाबदारी या संस्थांनी घेतली आहे.

‘अशा पद्धतीने एखादे गाव दत्तक घेण्याचा महाराष्ट्रातील हा कदाचित पहिलाच प्रयोग असावा. यामधून गाव आत्मनिर्भर होणार असून, या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि देशात एक नवा आदर्श निर्माण होणार आहे,’ असे कांबळे यांनी यावेळी सांगितले. या गावामध्ये ३१ मागासवर्गीय कुटुंबे आणि ४९ सर्वसाधारण वर्गातील कुटुंबे अशी एकूण ८० कुटुंबे आहेत. या सर्वांना या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे.

गावातील घरांचे नुकसान झाल्यामुळे सर्व घरांसाठी ३४ हजार ६६८ चौरस फूट सिमेंट पत्रे आणि प्रत्येक घरासाठी ४३३ चौरस फूट पत्रे, तसेच इतर साहित्य ग्रामस्थांना या वेळी डिक्की संस्थेतर्फे देण्यात आले. तसेच प्रत्येक घराला जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. बऱ्याच दिवसांपासून या भागात वीज नसल्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठी सौर एलईडी दिवेही देण्यात आले. (फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

खादी ग्रामोद्योग मंडळ पूर्ण मदत करणार असल्याची माहिती खादी व ग्रामोद्योग विकास मंडळाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांनी दिली. त्यांनी पश्चिम विभागाचे उप-कार्यकारी अधिकारी संजय हेडाव यांची समन्वयक म्हणून तात्काळ नियुक्ती केली आहे. श्री. हेडाव खादी मंडळाच्या महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांसह जुलैच्या पहिल्या आठवड्यात आंबडवे गावाला भेट देऊन प्राथमिक अहवाल करून पुढील कार्यवाहीची सुरुवात करणार आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. वेदला राम शास्त्री यांनी या गावाच्या विकासासाठी विद्यापीठाचा कौशल्य व उद्योजकता विकास विभाग पूर्ण सक्रियपणे काम करेल असे सांगितले. यासाठी विद्यापीठाकडून दोन प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. संपत खोब्रागडे व प्रा. वऱ्हाडकर यांचा त्यात समावेश असून, तेही या वेळी उपस्थित होते.

या वेळी ‘डिक्की टीम’चे प्रमुख पदाधिकारी अविनाश जगताप, अनिल होवाळे, सीमा कांबळे, अमित औचरे, मैत्रेयी कांबळे, तसेच मंडणगडचे गटविकास अधिकारी आर. एम. दिघे, आंबडवे गावातील शिक्षक व समन्वयक नरेन सपकाळ आदी उपस्थित होते.

………………….

व्हॉट्सअॅप संपर्क : https://wa.me/919405959454

………………

माध्यमविषयक सेवांसह पुस्तके, इनहाउस जर्नल्स आदींसाठी संकलन, संपादन, प्रकाशन , ई-बुक निर्मिती आदी सेवा कोकण मीडियातर्फे पुरविल्या जातात. कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिकही चालवले जाते. पालघर ते सिंधुदुर्ग अशा संपूर्ण कोकणातील विषयांना साप्ताहिकात प्रसिद्धी दिली जाते.
साप्ताहिक कोकण मीडियाकरिता लेखन पाठवण्यासाठी,

तसेच जाहिरातींसाठी संपर्क : 9422382621
ई-मेल : kokanmedia@kokanmedia.in

…………….

स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे उल्हास परांजपे यांचे तंत्र. त्यांची पुस्तके ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी लिंक्स
‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ : shorturl.at/mrsM2
नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ : shorturl.at/dFR37
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply