
रत्नागिरी : झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या स्मृतिदिनानिमित्त (१८ जून) दर वर्षी रत्नागिरीच्या कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार प्रदान केला जातो. या वर्षी हा पुरस्कार चिपळूणची योगपटू स्वराली तांबे हिला जाहीर करण्यात आला आहे; मात्र या वर्षी करोना संकटकाळामुळे पुरस्कार वितरण समारंभ प्रलंबित ठेवण्यात आला आहे.
स्वराली तांबे चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिकते. पाग व्यायामशाळेत इयत्ता दुसरीपासून प्रशिक्षक रणवीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ती योगासनांचा सराव करत आहे. तिने आतापर्यंत मुंबई महापौर चषक योगासन स्पर्धा, जिल्हा फेडरेशन आयोजित स्पर्धा, तसेच अमरावती, गाझियाबाद येथील योग स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळवली आहेत. दादर शारदाश्रम येथे महापौर चषक, शिर्डी, पतियाळा (पंजाब), कणेरी मठ येथे शालेय योगासन स्पर्धा, संगमनेर येथे ऱ्हिदमिक योग स्पर्धेत तिने यश मिळवले आहे. चिपळूण नगरपालिका, ब्राह्मण सहायक संघ, दापोली ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्था, ज्येष्ठ नागरिक संघ आदींनीही तिचा यापूर्वी सन्मान केला आहे.
कऱ्हाडे ब्राह्मण संघाकडून राणी लक्ष्मीबाईंना अभिवादन
रणरागिणी स्वातंत्र्यदेवता राणी लक्ष्मीबाईंच्या १८ जून या स्मृतिदिनी रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने राणीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. संघामार्फत राणी लक्ष्मीबाईंना अभिवादन करण्यासाठी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, सचिव शिल्पा पळसुलेदेसाई, डॉ. शरद प्रभुदेसाई, अॅड. प्रिया लोवलेकर, रुद्रांश लोवलेकर, श्री. ढवळे आदी उपस्थित होते.
………………..
(जागतिक योग दिनानिमित्ताने रत्नागिरी जिल्हा रुग्णालय आणि आयुष विभागातर्फे आगळीवेगळी ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
………………….
