नेम श्रावणमासाचा – राघवयादवीयम् – अद्भुत श्लोकसंग्रहाचा परिचय

श्रावण शुद्ध प्रतिपदा, शके १९४२

आज, २१ जुलै २०२० रोजी श्रावण महिना सुरू होत आहे. त्यानिमित्ताने महिनाभर संस्कृत साहित्यातील एका अद्भुत श्लोकसंग्रहाचा परिचय करून देणारी मालिका ‘कोकण मीडिया’वर प्रसिद्ध केली जाणार आहे. राघवयादवीयम् हे त्या श्लोकसंग्रहाचे नाव.

रामकथा आणि कृष्णकथा एकाच वेळी वाचता येते, हे या राघवयादवीयम् श्लोकसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. कांचीपुरम् येथे सतराव्या शतकात कवी वेंकटाध्वरी यांनी राघवयादवीयम् श्लोकसंग्रहाची रचना केली. या ग्रंथाला अऩुलोम-विलोम काव्य असेही म्हणतात. संपूर्ण ग्रंथामध्ये रामासाठी ३० आणि कृष्णासाठी ३० असे केवळ ६० श्लोक आहेत. या श्लोकांमधील पहिली ओळ वाचली, तर रामकथा होते (त्याला अनुलोम म्हणतात.) याच श्लोकाची अक्षरे उलट्या क्रमाने वाचली, तर ती कृष्णकथा होते. अशा प्रकारे केवळ ३० श्लोकांमध्ये रामाचे आणि ३० श्लोकांमध्ये कृष्णाचे चरित्र लिहिले गेले आहे. राघव (राम) आणि यादव (कृष्ण) यांचे चरित्र सांगणारी गाथा म्हणून राघवयादवीयम्.

या श्लोकसंग्रहाचा हिंदी अनुवाद आणि ओवीबद्ध गायन विविध संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. मात्र मराठी वाचकांसाठी श्लोकसंग्रहाचा मराठी अनुवाद येथे देत आहोत. दररोज एका अनुलोम-विलोम श्लोकाचा अनुवाद येथे दिला जाणार आहे. हा अनुवाद रत्नागिरीतील निवृत्त संस्कृत शिक्षिका सौ. वंदना दिगंबर घैसास यांनी करून दिला आहे.

सौ. घैसास (पूर्वाश्रमीच्या रेखा दत्तात्रय जोग) एमए, बीएड आहेत. त्यांनी १९७१ ते १९८० या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात माणगाव (ता. कुडाळ) येथील वासुदेवानंद सरस्वती विद्यालय आणि कुडासे (पूर्वीचा तालुका सावंतवाडी, सध्याचा तालुका दोडामार्ग) येथील सरस्वती विद्यामंदिरात संस्कृतचे अध्यापन केले. पुढे विवाहानंतर त्या रत्नागिरीत आल्या आणि १९८१ पासून रत्नागिरी जिल्ह्यात संस्कृत शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले. रत्नागिरीच्या रा. भा. शिर्के प्रशालेतून २००९ त्या सेवानिवृत्त झाल्या. त्यानंतर सौ. विशाखा भिडे यांच्या नारायणी मंडळामध्ये विविध संस्कृत स्तोत्रांचे पठण इतर भगिनींसमवेत त्या करतात. जुलै २०१९ मध्ये शृंगेरी येथे श्रीमद् भगवद्गीतेच्या सर्व १८ अध्यायांमधील ७०० श्लोकांच्या पठण स्पर्धेत भाग घेऊन त्या यशस्वी झाल्या. त्याबद्दल त्यांना पारितोषिकही मिळाले. शंकराचार्यांच्या मठात शृंगेरी (कर्नाटक) येथे जाऊन परीक्षा देण्याचा एक विलक्षण संस्मरणीय अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

‘कोकण मीडिया’साठी राघवयादवीयम् या श्लोकसंग्रहाचा अनुवाद करून देण्याची विनंती त्यांना केली. त्याच दरम्यान, राघवयादवीय श्लोकसंग्रहाचा अभ्यास त्यांनी सुरू केला होता. त्याविषयी त्या काय म्हणाल्या ते त्यांच्याच शब्दांत….

मोबाइलवर एका महाराजांचे राघवयादवीय श्लोकसंग्रहावरील संस्कृत-हिंदी अनुवादाचे श्लोकगायन आणि हिंदी अनुवाद-कथन मी ऐकले. त्याने मी प्रभावित झाले. मला जेव्हा ते सर्व श्लोक मिळाले, तेव्हा त्यांचा मराठीत अनुवाद-थोडा स्वैर-मूळ अर्थ जपून करण्याचा प्रयत्न मी केला. त्यातील न्यून असेल ते माझे आणि उत्तम असेल, ते मूळ ग्रंथकाराचे, असे मी मानते. मी केलेल्या मराठी अनुवादाचा प्रयत्न आपल्यापर्यंत पोहोचावा आणि आपला आशीर्वाद मिळावा ही सदिच्छा.

सौ. वंदना दिगंबर घैसास, रत्नागिरी

राघवयादवीयम्

श्लोक पहिला – अनुलोम

वंदेऽहं देवं तं श्रीतं रन्तारं कालं भासा य: ।
राम: रामाधी: आराप्याग: लीलामारायोध्ये वासे ।।१।।

अर्थ : मी त्या भगवान श्रीरामांच्या चरणी वंदन करतो. ज्यांनी आपली पत्नी सीतेचा शोध घेताना मलय आणि सह्याद्री पर्वतरांगांमधून पुढे जात श्रीलंकेला जाऊन रावणाचा वध केला आणि नंतर अयोध्येला परत येऊन राजवैभव आणि विलासामध्ये दीर्घकाळ सीतेच्या सहवासात वास्तव्य केले.
।। जय श्री राम ।।

श्लोक पहिला – विलोम

सेवाध्येयो रामालाली गोप्याराधी भारामोराः ।
यस्साभालंकारं तारं तं श्रीतं वन्देऽहं देवम् ।।१।।

अर्थ : मी तपस्वी आणि त्यागी रुक्मिणी तसेच गोपिकांच्या सहवासात क्रीडामग्न असलेल्या तसेच गोपिकांना पूज्य असलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणी वंदन करतो. त्यांच्या हृदयात लक्ष्मीमाता विराजमान आहे. तसेच शुभ्र अलंकारांनी त्यांची शोभा वृद्धिंगत झाली आहे.
।। जय श्री कृष्ण ।।
…..
श्रावण शुद्ध द्वितीया, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक दुसरा – अनुलोम

साकेताख्या ज्यायामासीद्याविप्रादीप्तार्याधारा ।
पूराजीतादेवाद्याविश्वासाग्र्यासावाशारावा ।।२।।

अर्थ : पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे अयोध्या, या नावाचे एक शहर होते, जे वेदपारंगत ब्राह्मण आणि व्यापारासाठी प्रसिद्ध होते. तसेच अज राजाचा पुत्र दशरथाचे ते निवासस्थान होते. तेथे नित्य होणाऱ्या यज्ञातील आहुती स्वीकारण्यासाठी देवता सदैव उत्सुक असत. असे हे विश्वातील सर्वोत्तम शहर होते.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक दुसरा – विलोम

वाराशावासाग्रया साश्वाविद्यावादेताजीरापूः ।
राधार्यप्ता दीप्राविद्यासीमायाज्याख्याताकेसा ।।२।।

अर्थ : समुद्राच्या मध्यभागी वसविलेले विश्वाच्या संस्मरणीय शहरातील एक असे द्वारका शहर होते, जेथे असंख्य घोडे आणि जे अनेक विद्वानांच्या वादविवाद स्पर्धेचे स्थळ होते. तसेच ते राधास्वामी श्रीकृष्णाचे निवासस्थान आणि आध्यात्मिक ज्ञानकेंद्र म्हणून पृथ्वीवर प्रसिद्ध होते.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण शुद्ध तृतीया, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक तिसरा – अनुलोम

कामभारस्स्थलसारश्रीसौधासौघनवापिका ।
सारसारवपीनासरागाकारसुभूरुभूः ।।३।।

अर्थ : सर्व मनोकामनांची पूर्तता करणारे, विपुल भवने, वैभवसंपन्न धनिकांचा निवास असलेले, सारस पक्ष्यांच्या गुंजारवाने निनादित झालेले, खोल विहिरींनी परिपूर्ण असे सुवर्णमय अयोध्यानगर होते.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक तिसरा – विलोम

भूरिभूसुरकागारासनापीवरसारसा ।
कापिवानघसौधासौ श्रीरसालस्थभामका ।।३।।

अर्थ : या विपुल कमळे असणाऱ्या द्वारकानगरीमध्ये घरातच तयार केलेल्या पूजावेदीच्या चारही बाजूंना ब्राह्मणांचा समुदाय आहे. पवित्र भवनांच्या या नगरामध्ये उंच आम्रवृक्षांवर सूर्यकिरणांची छटा शोभून दिसत आहे.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण शुद्ध चतुर्थी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक चौथा – अनुलोम

रामधामसमानेनमागोरोधनमासताम् ।
नामहामक्षररसं ताराभास्तु न वेद या ।।४।।

अर्थ : रामाचे हे अलौकिक तेज सूर्यतुल्य आहे. ज्यामुळे सर्व पापांचा नाश होतो. अशा या दिव्य तेजाने संपूर्ण नगर प्रकाशित झाले होते. अगणित उत्सव साजरे करणारे हे शहर अनंत सुखाची खाण होते. तसेच (उत्तुंग भवने आणि वृक्षांमुळे) ताऱ्यांच्या तेजापासून वंचित होते.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक चौथा – विलोम

यादवेनस्तुभारातासंररक्षमहामनाः ।
तां समानधरोगोमाननेमासमधामराः ।।४।।

अर्थ : यादवांचा सूर्य, सर्वांना प्रकाश देणारा, विनम्र, दयाळू, गाईंचा स्वामी, अद्वितीय शक्तिशाली असा श्रीकृष्ण अत्यंत उत्तम प्रकारे द्वारकेचे संरक्षण करत होता.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण शुद्ध पंचमी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक पाचवा – अनुलोम

यन् गाधेयो योगी रागी वैताने सौम्ये सौख्येसौ ।
तं ख्यातं शीतं स्फीतं भीमानामाश्रीहाता त्रातम् ।।५।।

अर्थ : गाधीपुत्र, गाधेय, परमयोगी, विश्वामित्र ऋषी एक निर्विघ्न, सुखदायक, आनंददायक असा यज्ञ करण्याची इच्छा करत होत. परंतु आसुरी शक्तींच्या त्रासामुळे चिंताक्रांत झाले होते. त्यांनी शांत, शीतल, रणरंगधीर अशी ख्याती असलेल्या त्राता श्रीरामाकडून संरक्षण प्राप्त केले होते.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक पाचवा – विलोम

तं त्राताहाश्रीमानामाभीतं स्फीत्तं शीतं ख्यातं ।
सौख्ये सौम्येसौ नेता वै गीरागीयो योधेगायन् ।।५।।

अर्थ : आपल्या संगीताने योद्ध्यांमध्ये शौर्यशक्तीचा संचार करणारे, रक्षणकर्ता, त्राता, सद्गुणसंपन्न, ब्राह्मणांचे नेतृत्व करणारा खंबीर नेता म्हणून दिव्य, तेजस्वी नारदमुनी प्रसिद्ध होते. अशा या नारदमुनींनी विश्वकल्याणासाठी गायन करत श्रीकृष्णाकडे याचना केली, ज्याची ख्याती एक दयाळू, शांत, परोपकारी म्हणून दिवसेंदिवस वृद्धिंगत होत होती.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण शुद्ध षष्ठी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक सहावा – अनुलोम

मारमं सुकुमाराभं रसाजापनृताश्रितं ।
काविरामदलापागोसमावामतरानते ।।६।।

अर्थ : लक्ष्मीपती नारायणाचा सुंदर सुकुमार असा तेजस्वी मानवी अवतार श्रीराम रसाजा (भूमिपुत्री)-धरातुल्य धैर्यशील, आपल्या मधुर वाणीने असीम आनंद देणाऱ्या बुद्धिमान सत्यवादी सीतेने (रामाला) वरले. पती म्हणून निवडले.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक सहावा – विलोम

तेन रातमवामास गोपालादमराविका ।
तं श्रितानृपजासारंभ रामाकुसुमं रमा ।।६।।

अर्थ : नारदांनी आणलेले-देवांचे रक्षक, स्वतःला पती म्हणून प्राप्त झालेल्या, सत्यवादी कृष्णाने पाठविलेले अत्यंत सुंदर पारिजातपुष्प नृपजा (राजकुमारी) रमा (रुक्मिणी) हिला प्राप्त झाले.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण शुद्ध सप्तमी-अष्टमी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक सातवा – अनुलोम

रामनामा सदा खेदभावे दया-वानतापीनतेजारिपावनते।
कादिमोदासहातास्वभासारसा-मेसुगोरेणुकागात्रजे भूरुमे ।।७।।

अर्थ : श्रीराम, दुःखितांप्रती सदा दयार्द्र, सूर्याप्रमाणे तेजस्वी, परंतु सहजप्राय, देवतांच्या सुखामध्ये विघ्न आणणाऱ्या राक्षसांच्या विनाशकाने (श्रीरामाने) आपले वैरी विश्वविजेता, भ्रमणशील, रेणुकापुत्र परशुरामाला पराजित केले. नंतर आपल्या तेजाने आणि पराक्रमाने त्यांना शीतल आणि शांत केले होते.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक सातवा – विलोम

मेरुभूजेत्रगाकाणुरेगोसुमे-सारसा भास्वताहासदामोदिका ।
तेन वा पारिजातेन पीता नवायादवे भादखेदासमानामरा ।।७।।

अर्थ : अपराजित मेरू (सुमेरू) पर्वतापेक्षा सुंदर रैवतक पर्वतावर राहत असताना, रुक्मिणीला, स्वर्गीय तेजस्वी पारिजातपुष्प मिळाल्यावर, पृथ्वीवरील अन्य सर्व कुसुमे कमी सुगंधित वाटू लागली आणि आवडेनाशी झाली. रुक्मिणीला कृष्णसहवासात तेजस्वी परकायाप्रवेश ककरून दैवी रूप प्राप्त झाल्याची अनुभूती येऊ लागली होती.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण शुद्ध नवमी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक आठवा – अनुलोम

सारसासमधाताक्षिभूम्नाधामसु सीतया ।
साध्वसाविहरेमेक्षेम्यरमासुरसारहा ।।८।।

अर्थ : समस्त आसुरी सेनेचा विनाशक, सौमत्वाच्या विरुद्ध अत्यंत प्रखर, प्रभावशाली नेत्र असणारा रक्षक श्रीराम आपल्या अयोध्येतील निवासस्थानी सीतेसह आनंदात राहत होता.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक आठवा – विलोम

हारसारसुमारम्यक्षेमेरेहविसाध्वसा ।
यातसीसुमधाम्नाभूक्षिताधामससारसा ।।८।।

अर्थ : आपल्या गळ्यात मोत्यांच्या हाराप्रमाणे, पारिजातपुष्पमाला धारण करून, प्रसन्नता आणि परोपकाराची अधिष्ठात्री अशा निर्भय रुक्मिणीने भरपूर फुले धारण करून कृष्णासह आपल्या घरी प्रस्थान केले.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण शुद्ध दशमी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक नववा – अनुलोम

सागसाभरतायेभमाभातामन्युमत्तया ।
सात्रमध्यमयातापेपोतायाधिगतारसा ।।९।।

अर्थ : पापी कैकेयी भरताच्या क्रोधाग्नीमध्ये होरपळत होती. लक्ष्मीच्या तेजामुळे प्रकाशमान धरती (अयोध्या) त्या मध्यमा-मधल्या पत्नीने कपटविधीने भरतासाठी मागून घेतली होती.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक नववा – विलोम

सारतागधियातापोपेतायामध्यमत्रसा ।
यात्तमन्युमताभामा भयेतारभसागसा ।।९।।

अर्थ : सूक्ष्मकटी-कमनीय बांध्याची, बुद्धिमती विदुषी सत्यभामा कृष्णाने भेदपूर्वक आणि उतावळेपणाने रुक्मिणीला पारिजातपुष्प दिल्याने क्रोध आणि तिरस्कारामुळे बेभान झाली होती.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण शुद्ध एकादशी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक दहावा – अनुलोम

तानवादपकोमाभारामेकाननदाससा ।
यालतावृद्धसेवाकाकैकेयीमहदाहह ।।१०।।

अर्थ : अशक्त झाल्यामुळे एखाद्या वेलीसारखी ती क्षीण झाली होती. शक्तिहीन झाल्यामुळे पिवळी पडलेली, सर्व आनंदापासून दूर राहिलेली कैकेयी रामाला वनवासात पाठविण्याचे कारण झाली होती. रामाच्या अभिषेकाला नकार दिल्यामुळे वृद्ध राजाच्या सेवेलासुद्धा वंचित झाली होती.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक दहावा – विलोम

हहदाहमयीकेकैकावासेद्ध्वृतालया ।
सासदाननकामेराभामाकोपदवानता ।।१०।।

अर्थ : अत्यंत सुंदर मुख असलेली सत्यभामा क्रोधाने थरथरत उद्विग्न होऊन दावाग्नीप्रमाणे क्रोधाने झालेल्या तिने सुंदर मोरांचे निवासस्थान आणि क्रीडास्थान असलेल्या आपल्या महालाचे दरवाजे बंद केले. त्यामुळे दासींचा प्रवेशसुद्धा बंद झाला होता.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण शुद्ध द्वादशी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक ११वा – अनुलोम

वरमानदसत्यासह्रीतपित्रादरादहो ।
भास्वरस्थिरधीरोपहारोरावनगाम्यसौ ।।११।।

अर्थ : विनम्र, आदरणीय, सत्याचा त्याग केल्याने आणि दिलेल्या वचनाचे पालन न केल्यामुळे लज्जित झालेल्या पित्याचा सन्मान राखण्यासाठी, तेजस्वी, वीर, साहसी आणि मुक्ताहारधारी रामाने वनाकडे प्रस्थान केले.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक ११वा – विलोम

सौम्यगानवरारोहापरोधीरस्स्थिरस्वभाः ।
होदरादत्रापितह्रीसत्यासदनमारवा ।।११।।

अर्थ : संगीतज्ञ, सत्यभामेवर नितांत प्रेम करणारा प्रभू श्रीकृष्ण वीर आणि दृढचित्त होता. अचानक भय आणि लज्जेने व्याकुळ झालेल्या सत्यभामेच्या निवासस्थानी तो पोहोचला.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण शुद्ध त्रयोदशी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक १२वा – अनुलोम

यानयानघधीतादा रसायास्तनयादवे ।
सागताहिवियाताह्रीसतापानकिलोनभा ।।१२।।

अर्थ : शरण आलेल्यांना, शास्त्रोचित सद्बुद्धी देणाऱ्या भूमिपुत्री सीतेवर या लज्जाजनक (अवमानकारक) घटनेचा आघात झाला. तरी तिने (आपल्या मनाला खंबीर करून) आपल्या मुखकांतीचे तेज कायम राखून वनगमनाचे धाडस केले.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक १२वा – विलोम

भानलोकिनपातासह्रीतायाविहितागसा ।
वेदयानस्तयासारदाताधीघनयानया ।।१२।।

अर्थ : वेदज्ञानाने परिपूर्ण अशा सत्यभामेने आपल्याला कमी लेखून (रुक्मिणीला पारिजातपुष्प दिल्यामुळे) अवमानित झाल्यामुळे तेजस्वी रक्षक, वैभवदाता, ज्याचे वाहन गरुड आहे अशा श्रीकृष्णाकडे पाहिलेदेखील नाही.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण शुद्ध चतुर्दशी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक १३वा – अनुलोम

रागिराधुतिगर्वादारदाहोमहसाहह ।
यानगातभरद्वाजमायासीदमगाहिनः ।।१३।।

अर्थ : तामसी, उपद्रवी, गर्विष्ठ अशा बेभान शत्रुसैन्याला आपल्या प्रखर तेजाने जणू जाळून टाकणारा श्रीराम. भारद्वाज आदी संयमी ऋषी, खूप थकून भागून शक्तिहीन झाल्यामुळे घायाळ होऊन श्रीरामाकडे पोहोचले आणि त्याच्याकडे त्यांनी संरक्षणाची याचना केली.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक १३वा – विलोम

नोहिगामदसीयामाजद्वारभतगानया ।
हह साहमहोदारदार्वागतिधुरागिरा ।।१३।।

अर्थ : सत्यभामेने दिव्यपुष्पधारी श्रीकृष्णाच्या शब्दांकडे लक्ष दिले नाही आणि ती काहीच बोलली नाही, जोपर्यंत (कृष्णाने) पारिजात वृक्ष आणून देण्याचा संकल्प केला नाही.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण पौर्णिमा, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक १४वा – अनुलोम

यातुराजिदभाभारं द्यां वमारुतगन्धगम् ।
सोगमारपदं यक्षतुंगाभोनघयात्रया ।।१४।।

अर्थ : असंख्य राक्षसांचा नाश करणारा, तेजस्वी, पराक्रमी श्रीराम आपल्या वनयात्रेदरम्यान स्वर्गीय सुगंधित वारा जेथे संचार करतो, अशा स्थानी (चित्रकूट पर्वतरांगा) यक्षराज कुबेरतुल्य वैभव आणि तेज (असलेल्या) स्थानी पोहोचला.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक १४वा – विलोम

यात्रयाघनभोगातुं क्षयदं परमागसः ।
गन्धगंतरुमावद्यं रंभाभादजिरा तु या ।।१४।।

अर्थ : मेघवर्ण श्रीकृष्ण, सत्यभामेवरील घोर अन्याय दूर करण्याच्या हेतूने अप्सरांनी शोभिवंत आणि रंभादी सुंदरींनी झगमगणाऱ्या स्वर्गांगणात पोहोचला. कारण त्याला पारिजात वृक्षापर्यंत जायचे होते.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण वद्य प्रतिपदा, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक १५वा – अनुलोम

दण्डकां प्रदमोराजाल्याहतामयकारिहा ।
ससमानवतानेनोभोग्याभोनतदासन ।।१५।।

अर्थ : संयमी रामाने बलवान राजांच्या शत्रूला (परशुरामाला) पराभूत केले आणि मानवयोनीतील जनांना आपल्या निष्कलंक कीर्तीने आनंदित करत दंडकारण्यात प्रवेश केला.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक १५वा – विलोम

नसदातनभोग्याभो नोनेतावनमास सः ।
हारिकायमताहल्याजारामोदप्रकाण्डदम् ।।१५।।

अर्थ : सदानंद, जननायक श्रीकृष्ण नंदनवनात येऊन पोहोचला. जे इंद्राचे अतिआनंददायक स्थान होते. तो इंद्र, मनोहारी शरीरयष्टीच्या अहल्येचा आशिक (प्रेमी) होता आणि ज्याने कपटपूर्वक अहल्येची संमती मिळवली होती.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण वद्य द्वितीया, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक १६वा – अनुलोम

सोरमारदनज्ञानोवेदेराकण्ठकुंभजम् ।
तं द्रुसारपटोनागानानादोषविराधहा ।।१६।।

अर्थ : तो राम जो अत्यंत महाज्ञानी, ज्याची वाणी म्हणजे वेद, ज्याला वेद मुखोद्गत आहेत, तो राम कुम्भज (कुंभ म्हणजे घटात जन्म झाला, म्हणून कुम्भज हे अगस्ती ऋषींचे एक नाव आहे.) ऋषीच्या जवळ पोहोचला. त्याने पवित्र झाडांच्या सालींची वस्त्रे (वल्कले) परिधान केली होती आणि ज्याने अत्यंत पापी अशा विराध (या नावाचा दंडकारण्यातील एक राक्षस) याचा संहार केला होता.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक १६वा – विलोम

हाधराविषदोनानागानाटोपरसाद्रुतम् ।
जम्भकुण्ठकरादेवेनोज्ञानदरमारसः ।।१६।।

अर्थ : पृथ्वीला जलप्रदान करणाऱ्या, नाना किन्नर-गंधर्वांच्या सुरेल संगीतामध्ये रममाण होणाऱ्या देवाधिपती इंद्राने जम्भासुरसंहारकाचे (कृष्ण) आगमन होत आहे हे ऐकले आणि (एका) अज्ञान भयाने तो व्याकुळ झाला.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण वद्य तृतीया, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक १७वा – अनुलोम

सागमाकरपाताहाकंकेनावनतोहिसः ।
न समानर्दमारामालंकाराजस्वसा रतम् ।।१७।।

अर्थ : वेदनिपुण आणि संतसंरक्षक (रामाला) गरुडाने (जटायू) विनम्र अभिवादन केले, ज्याच्याबद्दल (रामाबद्दल) लंकाधिपती रावणाची दुष्ट बहीण (शूर्पणखा) हिला अपूर्ण राहिलेली कामयाचना होती.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक १७वा – विलोम

तं रसास्वजराकालंमारामार्दनमासन ।
सहितोनवनाकेकं हातापारकमागसा ।।१७।।

अर्थ : त्या श्रीकृष्णाने वृद्धावस्था आणि मृत्यूवर विजय मिळविलेला होता. पारिजात वृक्ष उपटून नेण्याच्या इच्छेने तो तेथे गेला होता. तेव्हा स्वर्गात राहत असूनही कृष्णाचा हितचिंतक असलेला इंद्र अपार दुःखी झाला.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण वद्य चतुर्थी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक १८वा – अनुलोम

तां स गोरमदोश्रीदो विग्रामसदरोतत ।
वैरमासपलाहारा विनासा रविवंशके ।।१८।।

अर्थ : पृथ्वीला प्रिय विष्णूचा (विष्णू म्हणजे राम) उजवा हात असलेला आणि त्याचा सन्मान करणारा अशा निर्भय लक्ष्मणाने नाक कापल्यावर, त्या मांसभक्षी आणि नाकविहीन स्त्रीने (शूर्पणखा) सूर्यवंशी रामाबरोबर वैर धरले.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक १८वा – विलोम

केशवं विरसानाविराहालापसमारवैः ।
ततरोदसमग्राविदोश्रीदोमरगोसताम् ।।१८।।

अर्थ : उल्हास, जीवनशक्ती आणि तेज यांचा ऱ्हास होईल, याची जाणीव झाल्यावर केशवाला (कृष्ण) मैत्रीपूर्ण वाणीने इंद्र-ज्याने उंच पर्वतांना पराभूत करून महत्त्वहीन केले होते. (उद्दंड उडणाऱ्या पर्वतांचे पंख इंद्राने आपल्या वज्राने छाटून टाकले होते.) ज्याने अमर देवांचा नायक म्हणून दुष्ट राक्षसांना धूळ चारली होती (असा तो इंद्र) पृथ्वी आणि नभाचा निर्माता अशा श्रीकृष्णाला म्हणाला.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण वद्य पंचमी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक १९वा – अनुलोम

गोद्युगोमस्वमायोभूदश्रीगखरसेनया ।
सहसाहवधारोविकलोराजदरातिहा ।।१९।।

अर्थ : पृथ्वी आणि स्वर्गाच्या दूरदूरवरच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या कीर्तीचा स्वामी श्रीरामाने खर (राक्षस) सेनेला धुळीला मिळवून पराभूत केल्याने एक गौरवशाली, निडर अरिहंताच्या रूपाने, त्याची शालीन प्रतिमा अधिकच उज्ज्वलित झाली.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक १९वा – विलोम

हातिरादजरालोकविरोधावहसाहस ।
यानसेरखगश्रीद भूयोमास्वमगोद्युगः ।।१९।।

अर्थ : हे (कृष्ण), सर्व इच्छा पूर्ण करणारे, देवांचा गर्व हरण करणारे आणि ज्याचे वाहन गरुड आहे, जो वैभवप्रदाता श्रीपती आहे, ज्याला स्वतःला काहीच नको आहे, अशा श्रीकृष्णा, हा दिव्य वृक्ष पृथ्वीवर घेऊन जाऊ नको.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण वद्य षष्ठी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक २०वा – अनुलोम

हतपापचयेहेयो लंकेशोयमसारधीः ।
राजिराविरतेरापोहाहाहंग्रहमारघः ।।२०।।

अर्थ : पापी राक्षसांचा संहार करणाऱ्यावर (श्रीराम) आक्रमण करण्याचा विचार, नीच विकृत मनोवृत्तीच्या आणि ज्याच्यासह सदैव मद्यपान करणारे क्रूर राक्षसगण असतात, अशा लंकाधीशाने केला.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक २०वा – विलोम

घोरमाहग्रहंहाहापोरातेरविराजिराः ।
धीरसामयशोकेलं यो हेये च पपात ह ।।२०।।

अर्थ : चिंताग्रस्त झाल्याने, शत्रूच्या शक्तीकडे दुर्लक्ष झाल्याने त्याला (कृष्णाला) बंदी बनविण्याचा आदेश, सूर्यप्रमाणे तेजस्वी, शुभ्र स्वर्णालंकारधारी, परंतु कुत्सित बुद्धीने ताबा घेतलेल्या गंधर्वराज इंद्राने दिला.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण वद्य षष्ठी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक २१वा – अनुलोम

ताटकेयलवादेनोहारीहारिगिरासमः ।
हासहायजनासीतानाप्तेनादमनाभुवि ।।२१।।

अर्थ : ताटकापुत्र मारीच याचा शिरच्छेद केल्यामुळे प्रसिद्ध, आपल्या वाणीने पापाचा नाश करणारा, ज्याचे नाव मनमोहक आहे, अरेरे, असहाय सीता (आपला पती) त्या स्वामी रामाच्या विरहाने व्याकुळ झाली होती. (सुवर्णमृगाच्या रूपात आलेल्या मारीच राक्षसाने रामाच्या स्वरात हाक मारल्यामुळे)
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक २१वा – विलोम

विभुनामदनाप्तेनातासीनाजयहासहा ।
ससरागिरिहारीहानोदेवालयकेटता ।।२१।।

अर्थ : प्रद्युम्नासह (कृष्ण-रुक्मिणीचा पुत्र, शंकराने मदनाला जाळल्याने तोच पुढे कृष्णाच्या घरी जन्मला) देवलोकात संचार करणाऱ्या कृष्णाला अडविण्यामध्ये (इंद्र) पुत्र जयंताचा शत्रू, प्रद्युम्नाचा अहंकार आपल्या बाणवर्षावाने छाटून शांत करणारा, अथांग संपत्तीचा स्वामी, पर्वतांवर आक्रमण करणारा इंद्र, असमर्थ झाला होता.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण वद्य सप्तमी/अष्टमी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक २२वा – अनुलोम

भारमाकुदशाकेनाशराधीकुहकेनहा ।
चारुधीवनपालोक्या वैदेहीमहिताहृता ।।२२।।

अर्थ : अंतकाळ जवळ आल्यामुळेच जणू नीच, दुष्ट आणि कपटी राक्षसाकडून (रावण) सदाचारी वनदेवतांसमोर लक्ष्मीप्रमाणे तेजस्वी पूजनीय (सीतेचे) अपहरण झाले.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक २२वा – विलोम

ताहृताहिमहीदेव्यैक्यालोपानवधीरुचा ।
हानकेहकुधीराशानाकेशादकुमारभाः ।।२२।।

अर्थ : तेव्हा एका ब्राह्मणाच्या मैत्रीमुळे, लुप्त झालेले अविनाशी चिरस्थायी ज्ञान आणि तेज पुनःप्राप्त झाल्याने नाकेश (स्वर्गराज इंद्र) – ज्याची पळून जाणाऱ्या देवतांना वाचविण्याची इच्छा होती, त्याने व्याकुल कुमार प्रद्युम्नाला निःप्रभ (चेतनहीन) केले.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण वद्य अष्टमी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक २३वा – अनुलोम

हारितोयदभोरामावियोगेनघवायुजः ।
तंरुमामहितोपेतामोदोसारज्ञरामय: ।।२३।।

अर्थ : मनोहारी सावळ्या (रामाला) सीतावियोगानंतर भेटलेला निष्पाप हनुमान आणि सुग्रीव, जो स्वपत्नी रुमाचे श्रद्धास्थान होते. त्याला वाली त्रास देत असल्याने आपले सौख्या हरविल्याने, विचारहून आणि शक्तिहीन होऊन रामाला शरण आला होता.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक २३वा – विलोम

योमराज्ञरसादोमोतापेतोहिममारुतम् ।
जोयुवाघनगेयोविमाराभोदयतोरिहा ।।२३।।

अर्थ : तेव्हा देवतांबरोबरच्या युद्धाचा त्याग केला, अतुल्य साहसी (प्रद्युम्न) आकाशात संचार करणाऱ्या हिममारुतम् (शीत वाऱ्याने) पुनरुज्जीवित होऊन गुरुजनांचे गुणगान केले, जेव्हा त्याने शत्रूला ठार मारून विजय प्राप्त केला.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण वद्य नवमी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक २४वा – अनुलोम

भानुभानुतभावामासदामोदपरोहतं ।
तंहतामरसाभक्षोतिराताकृतवासविम् ।।२४।।

अर्थ : सूर्यापेक्षाही तेजस्वी, सुंदर पत्नी सीतेला निरंतर अपरिमित आनंद देणारा, ज्याचे नयन कमळासारखे प्रफुल्लित आहेत, त्याने इंद्रपुत्र वालीचा वध केला.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक २४वा – विलोम

विंसवातकृतारातिक्षोभासारमताहतं ।
तं हरोपदमोदासमावाभातनुभानुभाः ।।२४।।

अर्थ : त्या कृष्णाने, ज्याच्या तेजासमोर सूर्यही जणू निस्तेज आहे – ज्याने आपल्या तेजस्वी सेवक गरुडाचे रक्षण केले, ज्या गरुडाने (जटायू) आपल्या पंखांच्या फडफडाटाने शत्रूची शक्ती आणि गर्व क्षीण केला होता – ज्याने कधी एकदा शंकरालाही पराजित केले होते.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण वद्य दशमी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक २५वा – अनुलोम

हंसजारुद्धबलजापरोदारसुभाजिनि ।
राजिरावणरक्षोरविघातायरमारयम् ।।२५।।

अर्थ : हंसज म्हणजे सूर्यपुत्र सुग्रीवाच्या अपराजेय सैन्यबलाच्या मोठ्या कामगिरीने रामाच्या गौरवामध्ये वृद्धी होऊन रावणवधाने विजयश्री प्राप्त झाली.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक २५वा – विलोम

यं रमारयताघाविरक्षोरणवराजिरा ।
निजभासुरदारोपजालबद्धरुजासहम् ।।२५।।

अर्थ : कृष्णाच्या वाट्याला निर्मल विजयश्रीची प्रसिद्धी आली, जो बाणांचा वर्षाव सोसण्यास समर्थ आहे, ज्याचे तेज युद्धभूमीला असुरहीन केल्याने प्रखर झाले आहे, त्याचे निसर्गदत्त तेज देवतांवरील विजयामुळे शोभून दिसत आहे.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण वद्य एकादशी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक २६वा – अनुलोम

सागरातिगमाभातिनाकेशोसुरमासहः ।
तंसमारुतजंगोप्ताभादासाद्यगतोगजम् ।।२६।।

अर्थ : समुद्र ओलांडून सह्याद्री पर्वतापर्यंत पोहोचून पुढे समुद्रकिनाऱ्यावर दूत हनुमान पोहोचला. त्यामुळे इंद्रापेक्षा अधिक पराक्रमी, असुरसमृद्धीचा असहिष्णु (असहः) त्या रक्षक रामाची कीर्ती वृद्धिंगत झाली.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक २६वा – विलोम

जंगतोगद्यसादाभाप्तागोजंतरुमासतं ।
हस्समारसुशोकेनातिभामागतिरागसा ।।२६।।

अर्थ : जो गदाधारी आहे, अपरिमित तेजाचा स्वामी आहे, तो कृष्ण-प्रद्युम्नाला दिलेल्या कष्टामुळे भयंकर क्रोधित झाला होता. स्वर्गीय वृक्षावर (पारिजात वृक्ष) ताबा मिळवून तो विजयी झाला.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण वद्य द्वादशी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक २७वा – अनुलोम

वीरवानरसेनस्य त्राताभादवता हि सः ।
तोयधावरिगोयादस्ययतोनवसेतुना ।।२७।।

अर्थ : वीर वानरसेनेचा रक्षक म्हणून प्रसिद्ध असलेला राम, समुद्रसेतूवर चालत होता, जो अथांग विस्तृत सागराच्या यादस् – जलचर – जीवजंतूंपासूनसुद्धा रक्षण (सर्वांचे) करत होता.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक २७वा – विलोम

नातुसेवनतोयस्यदयागोरिवधायतः ।
सहितावदभातात्रास्यनसेरनवारवी ।।२७।।

अर्थ : जो प्रभू हरीच्या सेवेत मग्न असतो, त्याची स्तुतीस्तोत्रे गात असतो, तो प्रभूच्या दयेला प्राप्त होऊन शत्रूवर विजय मिळवतो. जो असे करत नाही, तो शस्त्रहीन शत्रूपासूनही भयभीत होऊन निस्तेज होतो.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण वद्य त्रयोदशी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक २८वा – अनुलोम

हारिसाहसलंकेनासुभेदीमहितोहिसः ।
चारुभूतनुजोरामोरमाराधयदार्तिहा ।।२८।।

अर्थ : प्रचंड साहसी अशा त्या रामाने रावणवध केल्यावर देवांनी त्याची स्तुती केली. तो सौंदर्यवती भूमिकन्या सीतेसह आहे, तसेच शरणागतांचं दुःख हरण करतो.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक २८वा – विलोम

हार्तिदायधरामारमोराजोनुतभूरुचा ।
सहितोहिमदीभेसुनाकेलंसहसारिहा ।।२८।।

अर्थ : ज्याने प्रद्युम्नाला युद्ध कष्टातून मुक्त केले, नंतर लक्ष्मीला आपल्या हृदयात स्थान दिले, कीर्तिमान जनांचे शरणस्थान, जो प्रद्युम्नाचा हितचिंतक असा तो कृष्ण ऐरावतस्थित स्वर्गलोक जिंकून पृथ्वीवर परतला.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण वद्य चतुर्दशी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक २९वा – अनुलोम

नालिकेरसुभाकारागारासौसुरसापिका ।
रावणारिक्षमेरापूराभेजे हि ननामुना ।।२९।।

अर्थ : नारळाच्या वृक्षांनी आच्छादित, विविध रंगांच्या उंच इमारतींनी बनविलेले अयोध्यानगर रावणाला पराजित करणाऱ्या रामाचे आता योग्य असे स्थान बनले होते.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक २९वा – विलोम

नामुनानहिजेभेरापूरामेक्षरिणावरा ।
कापिसारसुसौरागाराकाभासुरकेलिना ।।२९।।

अर्थ : अनेक विजयी गजराजांची भूमी द्वारका नगरात धर्मवाहक सताप्रिय-सत्यभामाप्रिय कृष्ण, दिव्य वृक्ष पारिजातामुळे तेजस्वी दिसत होता. त्यांच्या क्रीडारत गोपिकांसह द्वारकानगरीत त्याने प्रवेश केला.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….

श्रावण अमावास्या, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक ३०वा – अनुलोम

साग्रयतामरसागारामक्षामाघनभारगौः ।
निजदेपरजित्यास श्रीरामे सुगराजभा ।।३०।।

अर्थ : वैभवसंपन्न अयोध्या, तामरस (कमळ), कमलासनस्थित राजलक्ष्मीचे सर्वोत्तम निवासस्थान बनले. तन, मन, धन सर्वस्व अर्पण करणाऱ्या अजिंक्य रामाच्या प्रभावी आणि न्यायी शासनाचा (म्हणजे रामराज्याचा) उदय झाला.
।। जय श्रीराम ।।

राघवयादवीयम् – श्लोक ३०वा – विलोम

भाजरागसुमेराश्रीसत्याजिरपदेजनि ।
गौरभानघमाक्षामरागासारमताग्र्यसा ।।३०।।

अर्थ : श्रीसत्यच्या (सत्यभामा) अंगणात असलेला (स्थापन केलेला) पारिजात वृक्ष फुलांनी डवरला होता. सत्यभामेला ही निर्मल संपत्ती मिळाल्यामुळे, कृष्णाची पहिली पत्नी रुक्मिणीबद्दलचा मत्सर भाव सोडून देऊन ती कृष्णाबरोबर सुखासमाधानाने राहू लागली.
।। जय श्रीकृष्ण ।।
।।इति श्रीवेङ्कटाध्वरि कृतं श्री राघवयादवीयं।।

झोंपाळ्यावरची गीता हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी कृपया 9422382621 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

36 comments

  1. खूप छान…..देववाणीची महती अशा अनमोल गोष्टीतून पुढे आणण्याचा प्रयत्न म्हणजे देवकार्यच आहे घैसास ताई

  2. खूप छान उपक्रम.अनुवादही छान.

Leave a Reply