तुम्ही सर्जनशील आहात? मग ही अपुरी कथा पूर्ण करा आणि बक्षिसे मिळवा…

दोडामार्ग : येथील दोडामार्ग एक्स्प्रेस काव्यमंचाने जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय खुली कथापूर्ती स्पर्धा आयोजित केली आहे. त्यात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सहभागी स्पर्धकांना एक अपूर्ण लघुकथा देण्यात आली आहे. स्पर्धकांनी स्वतःच्या प्रतिभेस वाव देऊन ही लघुकथा पूर्ण करावयाची आहे. कथा पूर्ण करताना कोणताही कॉपी-पेस्ट मजकूर वापरू नये. कथा पूर्ण करण्यासाठी अपूर्ण कथेपुढे तुमची कमाल शब्दमर्यादा २०० शब्दांची राहील. यापेक्षा जास्त लांबलेली कथा स्पर्धेतून बाद करण्यात येईल. स्पर्धकाने कथेला योग्य शीर्षक द्यावयाचे आहे. कथा पूर्ण करून पाठवण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२० आहे. स्पर्धेचा निकाल १५ ऑगस्ट रोजी जाहीर केला जाईल.

पूर्ण केलेली टेक्स्ट स्वरूपातील कथा 9421795955 या क्रमांकावर पाठवावी. आलेल्या कथांमधून जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय अशा दोन गटांत सर्वोकृष्ट, लक्षवेधी, प्रथम तीन उत्कृष्ट कथांची निवड करण्यात येईल आणि दहा कथा उत्तेजनार्थ म्हणून निवडण्यात येतील, असे दोडामार्ग एक्स्प्रेस काव्यमंचाचे संस्थापक मनोज माळकर (9324192492) यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी संयोजक संदीप सुरेश सावंत (9421262678), संकल्पक श्रीकांत राणे (9923819513) यांच्याशी संपर्क साधता येईल.

स्पर्धेसाठी खालील कथा पूर्ण करायची आहे…

‘कालपासून सांगत्येय… रेशनिंग दुकानात मोफत धान्य आलेय. शेजारच्या गंपूशेठच्या बायकोने काल धान्य आणलेदेखील. काल संध्याकाळी वाटेत भेटली तर सांगत होती, चांगली दोनेक पोती भरून धान्य मिळाले. जाऊन बघा तरी…’ सकाळपासून सुरू असलेल्या बायकोच्या टुमण्यांना कंटाळून बाबल्या दोन मोठ्या पिशव्या घेऊन रेशनिंग दुकानाच्या वाटेला लागला. रेशनिंग दुकानासमोर खूप मोठी रांग होती. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कष्टणारे गरीब हात बंद घरातच अडकून पडल्याने उपासमार होऊ नये यासाठी सरकारने रेशनिंग दुकानात गरीब कुटुंबांसाठी मोफत धान्याचे वाटप सुरू केले होते. कोरोना महामारीच्या काळात सावधगिरीचा उपाय म्हणून रेशनिंग दुकानाच्या आवारात ‘सोशल डिस्टंसिंग’ तपासणाऱ्या साहेबाने बाबल्याला कडक समज देऊन रांगेत उभे केले. दुकानासमोर ‘गरिबांसाठीचे मोफत धान्य उपलब्ध आहे’चा फलक वाचून बाबल्या आतल्या आत खूश झाला. मात्र गरिबांच्या रांगेत गावातील मोठ्या ‘हस्ती’ बघून बाबल्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. बाबल्याने त्याच्या पुढच्या माणसाला ‘ही नक्की गरिबांचीच रांग आहे ना?’ विचारून खात्री करून घेतली. तेवढे विचारण्यासाठी बाबल्याने तोंडावरचा मास्क किंचित खाली ओढला तेव्हा मघाशीच्या साहेबाने पुन्हा एकदा दम देऊन बाबल्याला तोंडावरचा मास्क व्यवस्थित बांधण्यास सांगितले. बाबल्याने हातानेच माफी मागत तोंडावरचा मास्क आणखी घट्ट बांधला.

दारिद्र्य आणि गरिबी बाबल्याच्या पाचवीलाच पुजलेली. बाबल्याच्या बापाने दारूच्या व्यसनात वडिलोपार्जित होते-नव्हते ते विकून टाकले. दिवसरात्र घरात घमघमणाऱ्या दारूच्या उग्र दर्पाच्या सान्निध्यात बाबल्याला लहानपणी शाळा काही शिकता आली नाही. बापाच्या दररोजच्या धिंगाण्यात बाबल्याचे शिक्षण कधी विरघळून गेले ते बाबल्यालाही कळले नाही. एके दिवशी ‘लिव्हर’ फुटून बाबल्याचा बाप मेला आणि पुढच्या दिवसापासून बाबल्या मोठा झाला…
……

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

झोंपाळ्यावरची गीता हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी कृपया 9422382621 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply