मालवण तालुक्यातील रक्षाबंधन कोकमाच्या झाडांमधून होणार अविस्मरणीय

मालवण : विविधांगी उपक्रमांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपला वेगळा ठसा उमटविण्यात अग्रेसर असणारी मालवण पंचायत समिती सोमवारी (ता. ३ ऑगस्ट) साजऱ्या होणार असलेल्या रक्षाबंधनाच्या सणातून कोकमाच्या लागवडीचा संदेश देणार आहे. रक्षाबंधनाचे नाते पवित्र असते. त्याची आठवण करून देण्यासाठी बांधली जाणारी राखी मात्र एकच दिवस टिकते. दुसऱ्या दिवशी राखी फेकून दिली जाते; मात्र तशी ती फेकली गेली, तरी नाते आणि आठवण जिवंत ठेवायला लावील, असा एक आगळावेगळा उपक्रम मालवण पंचायत समितीने या वर्षी राबविला आहे.

कोकमाच्या बीपासून राखी तयार करण्याचा हा उपक्रम आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मालवण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदाचा कार्यभार सांभाळणारे राजेंद्र पराडकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांच्या चर्चेतून हा उपक्रम आकाराला आला आहे. सुकळवाड (ता. मालवण) येथील विस्तार अधिकारी श्री. पाताडे यांच्या मदतीने करोनाच्या सुटीच्या काळात मुलांना कार्यप्रवण करण्यात आले. त्या मुलांनी २५० राख्या तयार केल्या. त्यासाठी कोकम म्हणजेच रातांबीच्या दीड किलो बियांचा वापर करण्यात आला. सभापती-उपसभापतींसह पंचायत समितीचे १२ सदस्य, तसेच महिला कर्मचाऱ्यांना या राख्यांचे वाटप करण्यात आले. प्लास्टिक किंवा पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या इतर कृत्रिम साधनांपेक्षा पर्यावरणपूरक साधन असलेल्या कोकमाच्या बियांपासून तयार केलेल्या या राख्यांवरील बिया परिसरात टाकल्यास किंवा योग्य जागी पुरल्यास कोकमची झाडे उगवण्यास मदत होणार आहे.

अन्य ठिकाणचे उल्लेखनीय उपक्रम

बांबू आणि बियांपासून राखी तयार करण्याचा उपक्रम अनेक ठिकाणी राबविला जात आहे. कुपोषणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्राने हा उपक्रम सर्वप्रथम सुरू केला. आदिवासी बालकांचा विषय केवळ आरोग्याशी जोडला जातो; पण आदिवासींच्या जगण्याच्या साधनांवरील ताण हे त्यामागील एक कारण आहे. सुनील आणि निरुपमा देशपांडे या दाम्पत्याने अमरावती जिल्ह्यातील लवादा (ता. धारणी) येथे सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी संपूर्ण बांबू केंद्र सुरू केले. आदिवासींच्या आत्मबळाचे प्रतीक ठरलेल्या या केंद्रात आदिवासींमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करण्याचे काम केले जाते. शेकडो आदिवासींच्या आयुष्याला बांबूचा आधार देणाऱ्या या केंद्रात देशपांडे दांपत्याने आदिवासी तरुणांना बांबूकला शिकवली. बांबूपासून टिकाऊ घर तयार करण्यापासून विविध कलावस्तूंपर्यंत अनेक गोष्टी शिकवल्या. निरुपमा देशपांडे यांनी आदिवासी महिलांमधील संघटनशक्ती वाढवली. महिला आणि पुरुषांच्या बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विकण्याची व्यवस्था उभी केली. देशपातळीवर या बांबू केंद्राच्या कामाची दखल घेतली गेली आहे. याच केंद्रात सर्वप्रथम बांबूपासून राखी तयार करण्याचा प्रयोग पाच वर्षांपूर्वी सुरू झाला. ही संस्था पर्यावरणपूरक राख्यांचा प्रचार, प्रसार आणि विक्री करत आहे.

कल्याण (जि. ठाणे) येथील नूतन ज्ञानमंदिरात पर्यावरणपूरक राख्यांची कार्यशाळा दोन वर्षांपूर्वी पार पडली होती. तेथे काचेचे मणी, वनस्पतींच्या बिया, बांबू, रेशीम अशा घटकांचा वापर करून राखी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर त्या भागात या कलेने चांगलाच जोम धरला. त्यापैकी वनस्पतींच्या बियांपासून तयार केलेली पर्यावरणपूरक राखी कुंडीत किंवा पाण्यात टाकली तर त्यातील वनस्पतींची बी मातीत रुजते आणि रोपटे उगवते. निसर्गाचे देणे निसर्गालाच दिले जाते आणि नकळतपणे झाडांची लागवडही केली जाते.

रत्नागिरीत आविष्कार या मतिमंदांच्या शाळेनेही गेल्या वर्षी वनस्पतींच्या बियांपासून राखी तयार करण्याचा उपक्रम राबविला होता. शाळेतील विद्यार्थ्यांनी लागवड करण्यासारख्या बीजराख्या तयार केल्या. पाच ते अकरा ग्रॅम वजनाच्या या राख्यांमध्ये झेंडू, टोमॅटो, गवार, भेंडी अशा वनस्पतींच्या बिया घालण्यात आल्या. रक्षाबंधनानंतर या राख्या कुंडीमध्ये लावल्या किंवा मातीमध्ये मिसळल्या, तर त्यातून फुले आणि फळे देणाऱ्या वनस्पती रुजून याव्यात, असा विचार त्यामागे होता. सणाशी असलेले पर्यावरणाचे नाते अधिक दृढ करणाऱ्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

संस्था आणि शाळांनी राबविलेल्या प्रयोगाच्या पलीकडे जाऊन मालवण पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींनी पर्यावरणाच्या रक्षणाचा उपक्रम राबविल्याने पर्यावरण रक्षणाला खऱ्या अर्थाने बळ मिळणार आहे.
…..

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply