बरणीत अडकलेल्या भटक्या कुत्र्याची सुटका

सिंधुदुर्गनगरी : काही दिवस प्लास्टिकच्या बरणीत डोके अडकून पडलेल्या एका भटक्या कुत्र्याची सुटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाइल्डलाइफ इमर्जन्सी रेस्क्यू सर्व्हिसेस या संस्थेने केली आहे.

पाळीव प्राण्यांना त्यांचे मालक कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपत असतात. परंतु भटक्या प्राण्यांना कुणीच वाली नसते. परंतु अशा भटक्या प्राण्यांना ते जर एखाद्या संकटात असतील किंवा त्यांना मानवी अधिवासात आल्यानंतर पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडण्यासाठी त्यांच्या मदतीला धावून येतात सिंधुदुर्गातील वन्य प्राणीप्रेमी. तसेच पाळीव प्राणी आणि वन्य प्राणी जेव्हा जेव्हा संकटात असतात, तेव्हा तेव्हा त्यांची सुखरूप सुटका करून त्यांना त्यांच्या पुन्हा अधिवासात सोडण्याचे काम सिंधुदुर्गातील वाइल्डलाइफ इमर्जन्सिी रेस्क्यू सर्व्हिसेस ही संस्था करते.

असाच एक प्रसंग गेल्या बुधवारी सिंधुदुर्रनगरीत येथे घडला. एका भटक्या कुत्र्याच्या डोक्यात प्लास्टिकची बरणी अडकली होती. त्यामुळे त्याची अवस्था दयनीय झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी ते पाहिले. त्यांनी लगेच त्यांच्या ओळखीचे प्राणीमित्र आंबोलीतील काका भिसे यांना फोन केला.
श्री. भिसे यांनी वाइल्डलाइफ इमर्जन्सी रेस्क्यू सर्व्हिसेसचे अध्यक्ष अनिल गावडे यांना फोन केला. अनिल गावडे यांनी वेळ न दवडता लागलीच या कुत्र्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. अर्धा दिवस शोध घेऊनही कुत्र्याचा शोध लागला नाही.
मग पुन्हा आपल्या स्वयंसेवकांसह दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून त्यांनी शोधमोहीम सुरू केली. जवळपास चार तास शोध घेतल्यानंतर त्यांना तो कुत्रा कचरा डेपो येथे आढळून आला. त्यांनी त्या कुत्र्याला पकडले आणि त्याचे डोके अडकलेली बरणी कटरच्या साह्याने कापून काढली. कुत्र्याचे डोके बरेच दिवस बरणीत अडकून राहिल्याचे लक्षात आले. कारण कुत्रा अशक्तही झाला होता. त्याच्या मानेला मोठ्या प्रमाणावर जखमाही झाल्या होत्या. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने अनिल गावडे यांनी त्या कुत्र्यावर उपचार करून पुन्हा त्याला सुरक्षितरीत्या सोडून दिले.

वाइल्डलाइफ इमर्जन्सी रेस्क्यू सर्व्हिसेसच्या या मोहिमेमध्ये अनिल गावडे, आनंद बांबर्डेकर, वैभव अमृस्कर, डॉय प्रसाद धुमक, महेश राऊळ, नंदू कुपकर, सिद्धेश ठाकूर, दीपक दुतोंडकर आदी सहभागी झाले होते. अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply