ध्रुवा संस्कृत महोत्सवात सौ. रेखा इनामदार सहभागी

रत्नागिरी : मुलुंड (मुंबई) येथील या वर्षीच्या पाचव्या ध्रुवा संस्कृत महोत्सवात रत्नागिरीतील सौ. रेखा इनामदार सहभागी झाल्या होत्या.

रत्नागिरीत साजऱ्या होणाऱ्या बहर उत्सवाप्रमाणेच गेली पाच वर्षे ध्रुवा संस्कृत महोत्सव साजरा केला जातो. मुलुंड (मुंबई) येथील वझे केळकर महाविद्यालयातर्फे त्याचे आयोजन केले जाते. यापूर्वी दुसऱ्या वर्षी सन २०१७-२०१८ या वर्षी वेद अश्विनीकुमार जोशी आणि मुकुल प्रकाश रिसबूड हे दोघे रत्नागिरीतून महोत्सवात सहभागी होते. वेद-संस्कृत गाणे (अनुवादित – “तारे जमीं पर”मधील कदाप्यमहं कथयामि न ) त्यांनी त्या वेळी सादर केले होते. त्याकरिता शील्ड आणि सहभाग प्रमाणपत्र मिळाले होते, तर मुकुल रिसबूडला प्रश्नमंजूषेसाठी सहभाग प्रमाणपत्र प्राप्त झाले होते.

यावर्षी महोत्सवाचे पाचवे वर्ष होते. या वर्षी करोना विषाणूच्या सावटामुळे महोत्सवातील सर्व स्पर्धा ऑनलाइन पार पडल्या. यावर्षी “रामपञ्चायतनम् अद्यापि मनोहरम्” ही संकल्पना होती. त्याला अनुसरून श्लोकपठण, गीतगायन, लघुपट निर्मिती इत्यादी स्पर्धा पार पडल्या. वेद अश्विनीकुमार जोशी, श्रावणी चेतन जोशी, ऋग्वेद दिवाकर जोशी, सौमिन हेरंब जोशी, गिरीश हेरंब जोशी, मुकुल प्रकाश रिसबूड यांनी त्यात सहभाग नोंदविला होता. परंतु तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाहीत. शिक्षकांसाठी असलेल्या समस्यापूर्ती स्पर्धेत रत्नागिरीतून वरवडे माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ संस्कृत शिक्षिका सौ रेखा रवींद्र इनामदार यांनी नोंदणी केली होती. सौ. इनामदार यांनी समस्यापूर्तीसाठी तयार केलेला श्लोक असा –

अद्यतनकाले कलियुगम् ।
सन्ति करोनारुग्णम् ।
भजन्ती राम-लक्ष्मणम्- भरत-शत्रुघ्नम् ।
रामपञ्चायतनम् अद्यापि मनोहरम् ।।

वरीलपैकी चौथा चरण संकल्पना म्हणून दिलेला असून वरील तीन चरणांची रचना सौ. इनामदार यांनी केली आहे. त्याबद्दल त्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

स्पर्धेसाठी वझे-केळकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आणि ध्रुवा महोत्सवाच्या संयोजक सौ. आदिती माधवन यांनी ५० विद्यार्थी आणि अनेक परीक्षक, सहकारी, प्राचार्य आदी सर्वांच्या सहभागातून उपक्रमाचे शिवधनुष्य लीलया पेलले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply