आज पाच सप्टेंबर, शिक्षक दिन. त्या निमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यात कोमसाप-मालवण शाखेचे आजीव सदस्य असलेले विविध स्थानिक लेखक आपल्याला घडविणाऱ्या शाळेच्या आणि शिक्षकांच्या स्मृती जागवणारे लेख लिहिणार आहेत. ही लेखमाला आजपासून कोकण मीडियाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध होणार असून, २० दिवस चालणार आहे. या लेखमालेतील पहिला लेख आहे माधव गावकर यांचा… असगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील शाळा आणि शिक्षक लक्ष्मण परब यांच्याविषयीचा…
………
मित्रांनो! पन्नास वर्षांपूर्वी मी असगणी (ता. मालवण) येथील पूर्व प्राथमिक शाळेत सातवीपर्यंत शिकलो. लक्ष्मण शिवाजी परब गुरुजींच्या छत्र छायेखाली चार वर्षे सर्वार्थाने घडलो, वाढलो. आजही गुरुजी मला समूर्त स्पष्ट दिसतात. माझे मातृहृदयी गुरुजी!
कल्पतरू, सुखाचा सागरू, तात, माय असं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं. ‘लतानो सांगू कां तुम्हां…’ ही कविता मी म्हटली, तेव्हा गुरुजी म्हणाले, ‘माधव, गोड आहे आवाज. सगळ्यांना ही चाल सांग बरं!’ तेव्हापासून सगळ्या कवितांच्या चाली मीच सांगितल्या. गुरूंनी दिलेला तो स्वराधिकार जन्मजन्मांतरीचा आशीर्वाद!

गुरुजींच्या घरी रात्रौ क्लास असे, तेव्हा तिथेच झोपायचं. एका रात्री विचित्र आवाजाने मी घाबरलो, रडू लागलो! म्हटलं ‘गुरुजी भिती वाटते.’ त्यांनी, ‘अरे भित्रो रे आमचो भटजीकाका’ म्हणत मला कुशीत झोपवलं! ती गाढ झोप आजही आठवते. पायी प्रवास करीत आम्ही कणकवलीला सहलीला गेलो. तिथे बाजारात गेल्यावर सगळी मुलं काही ना काही घेत होती. मी आणि थोरली बहीण आम्ही एका बाजूला दूर उभे राहिलो. खिशात पैसे नव्हते. गुरुजींच्या लक्षात आलं. त्यांनी एक खाऊची पुडी माझ्या हाती ठेवली, म्हणाले ‘दोघांनी घ्या हं!’ माझ्या डोळ्यात तरळणारे अश्रू मी पुसत गुरुजींकडे पाहिलं! पितृवात्सल्यानं आमच्याकडे पाहत ते प्रसन्न हसत होते.
माझी ती मातृप्रेमी शाळा आणि मातृहृदयी गुरुजी या लेखनामुळे आठवले! तोच सहृदयी साठा सांभाळत आम्ही संवेदनशील गुरुजींमध्ये देव पाहिला. अपुरा पगार, गैरसोयीच्या शाळा अशा अडचणी असूनही, गुरुजींची मनाची श्रीमंती आणि शिष्यप्रेम कधीही संपलं नाही.

दुर्भाग्यवशात आज गुरुजी अंथरुणावर आहेत. माझी ती जुनी शाळाही आता बदलली! एक जिव्हाळ्याचं नातं हरवल्याची वेदना आज मला अस्वस्थ करते. नकळत डोळे पाणावतात. आपलं माणूसपण जोपासणारे माझे गुरुजी गलितगात्र आहेत हे पाहून मन कळवळतं; पण काळाचं पाऊल अखंड चालतं! ‘माझे शिक्षक’ मला या लेखनातून आठवले, दिसले, जाणवले! क्षणभराच्या तृप्तीनेही समाधान वाटले!
- माधव धोंडो गावकर (गायक)
पत्ता : असगणी, ता. मालवण.
सध्या वास्तव्य : नाडकर्णीनगर, कणकवली, जि. सिंधुदुर्ग
मोबाइल : ९४२३८ ७९२०७
…..
(उद्याचा लेख मेघना जोशी यांचा)
(या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)


श्री. माघव गांवकर हे स्व:त व्यवसायाने प्राथमिक शिक्षक होते. आज संगीत क्षेत्रात त्याचा नावलौकिक आहे. श्री. लक्ष्मण शिवाजी परब यांनी आज पन्नाशीच्या वय असलेल्या सर्व असगणीच्या सुपुत्रावर प्रेम केलं. त्यांनी असगणी गावातील एका पिढीला घडविले. साहित्यिक अंग असलेल्या आमचे आदर्श ग्रामस्थ, आणि जीवाभावाचे मित्र माधवराव उर्फ दादा गांवकर यांनी परब गुरुजींचे यथार्थ वर्णन केले आहे. परब गुरुजी यांनी माधव गांवकर, पांडुरंग (मधु) पवार यांच्या सारखे विद्यार्थी घडविण्याचे महान कार्य केले. धन्य ते परब गुरुजी, धन्य ते माधव गांवकर गुरूजी. शतशः प्रणाम!
अॅड सदानंद चव्हाण.
अध्यक्ष, असगणी ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई.