सॅटर्डे क्लबच्या ऑनलाइन बैठकीसाठी उद्योजकांना आवाहन

रत्नागिरी : महाराष्ट्रातील उद्योजकता वाढीस लागावी यासाठी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट वर्षे प्रयत्न करत आहे. या क्लबच्या रत्नागिरी शाखेतर्फे येत्या शनिवारी (दि. १० ऑक्टोबर) सकाळी आठ ते दहा या वेळेत ऑनलाइन बैठक होणार आहे. पाहुणे येती घरा अशी या बैठकीची संकल्पना आहे. बैठकीत उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इंजिनीयर माधवराव भिडे यांनी २००० साली सॅटर्डे क्लबची स्थापना केली. मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी या क्लबची स्थापना करण्यात आली. छोट्या-मोठ्या उद्योजकांनी एकत्र यावे, ही सॅटर्डे क्लबची संकल्पना आहे. ओळखीतून व्यवसाय वाढतो. आपल्या व्यवसायात वाढ करण्याची सुवर्णसंधी मिळते. एकत्र येऊन एकमेकांच्या व्यवसायाच्या वाढीला मदत करणारे मराठी उद्योजकांचे व्यासपीठ, अशी सॅटर्डे क्लबची ओळख आहे.

रत्नागिरीमध्येही या क्लबची शाखा आहे. या शाखेतर्फे दर पंधरा दिवसांनी येणाऱ्या शनिवारी बैठक घेतली जाते. करोनाच्या काळात या बैठका ऑनलाइन होत आहेत. झूम ॲपद्वारे या बैठका होत आहेत. येत्या शनिवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत झूम ॲपवरून होणाऱ्या बैठकीच्या निमित्ताने व्यवसायवाढीसाठी पाहुणे येती घरा ही संकल्पना राबविली जात आहे. सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी चॅप्टरव्यतिरिक्त राज्यभरातील इतर चॅप्टरमधील सदस्यांनी या बैठकीत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी रत्नागिरी विभागाच्या सदस्यांनी इतर विभागातील त्यांचा परिचय झालेल्या सदस्यांना निमंत्रित करावे. त्या सदस्यांनी आपल्या विभागाच्या अध्यक्षांना सांगून रत्नागिरी विभागाचे अध्यक्ष विनोद वायंगणकर यांच्याकडे नावनोंदणी करावी. अधिक माहिती आणि नावनोंदणीकरिता विनोद वायंगणकर (७८४१८७२४३१) किंवा सचिव चंद्रकांत राऊत (९९२०४७५१७४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply