मुंबई : कोकण कट्टा या विलेपार्ले येथील विविध क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थेने पेण (जि. रायगड) येथील ग्रामसंवर्धन संस्थेच्या वंचित मुलांसाठी सुरू केलेल्या बालग्राम प्रकल्पासाठी सुमारे बाराशे किलो धान्य, टी-शर्ट, शूज, चादरी आणि शालेय साहित्य दिले.
संस्थेतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे माणुसकीची भिक्षा फेरी उपक्रम यावर्षीही राबविण्यात आला. त्यातून तांदूळ, डाळ आदी साहित्य जमविण्यात येते. यंदाही उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला. संस्थेने साई आधार (भाताने, जव्हार) या आदिवासी विकास संस्थेला मदत केली होती. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील पेण येथील संस्थेलाही मदत करण्यात आली.
बालग्राम प्रकल्पाचे मार्गदर्शक संतोष ठाकूर व बालग्रामचे मुख्य प्रतिनिधी, त्यांचे सहकारी तसेच वंचित दुर्बल आदिवासी भागातील मुलांच्या सदस्यांनी प्रकल्पाला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. श्री. ठाकूर यांनी संस्थेची ओळख करून दिली. उदय गावंड यांनी बालग्राम मित्रांची कार्यपद्धती व उपक्रमांची सविस्तर माहिती कोकण कट्टाला दिली. कोकण गटाचे सक्रिय सदस्य दादा गावडे आणि. संतोष कदम यांचा पन्नासावा वाढदिवस होता. बालग्राम संस्थेच्या विद्यार्थ्यांकडून केक कापून तो आनंद साजरा करण्यात आला.
कोकण कट्टा सदस्य हर्षल धराधर (चित्रकार) यांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा संस्थेला भेट देऊन स्फूर्ती, जिद्द व एकता आचरणात आणण्याचा संदेश दिला. पार्ल्यातील रिक्षाचालक प्रभाकर सांडम यांनी त्यांच्या रिक्षामध्ये लावलेल्या दानपेटीत जमा झालेली रक्कम कोकण कट्टाच्या माध्यमातून बालग्राम संस्थेतील पंचवीस मुलांना कॅनव्हास शूज दिले. श्री. सांडम यांच्या या स्तुत्य उपक्रमाची माहिती रिक्षाचालक सुरेश मंचेकर, दिलीप पवार, मिलिंद पालेकर यांनी संस्थेला दिली. सर्व उपस्थितांनी कौतुक केले.
कोकण कट्टा आयोजन समितीच्या सौ. आकांक्षा पितळे व सौ. स्नेहल कदम यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. संस्थेचे कार्यकर्ते सुनील वनकुद्रे, जयवंत घावरे, सुभाष कांबळे, सुजित कदम, राहुल वर्तक, दया मांडवकर, रवी कुळे, हर्षल धराधर, दशरथ पांचाळ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे यांनी मुलांचे संबोधन केले. विविध प्रेरणादायी अनुभव आणि किस्से त्यांनी सांगितले या कठीण दिवसातून तुम्ही नक्कीच चांगले दिवस पाहणार आहात, पण तेव्हा मात्र इतरांना मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बालग्राम संस्थेशी आमचे नाते कायम ठेवू, असे त्यांनी सांगितले. नारळाच्या करवंटी पासून विविध आकर्षक व प्रदर्शनीय वस्तू मुलांकडून तयार करण्यासाठी प्रशिक्षण, प्रशिक्षक, साहित्य व अवजारे देण्याचा उपक्रम नव्याने सुरू करण्याचे कोकण कट्टाने ठरविले आहे. हा उपक्रम काही दिवसांत सुरू करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
संपर्क : अजित पितळे 93232 29074

