कोकणातील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेज देण्याची प्रवीण दरेकर यांची मागणी

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. या मदतीचा कोकणातील शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांसाठी मदतीचे निकष बदलून स्वतंत्र पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (२४ ऑक्टोबर) केली.

रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या हेक्टनरी ५० हजार रुपयांच्या मदतीच्या वचनाची आता पूर्तता करावी, अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी केली. यावेळी आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नीलेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन उपस्थित होते.

कोकणच्या दौऱ्यावर असलेल्या दरेकर यांनी आज रत्नागिरीमधील सोमेश्वर पुलाची पाहणी केली. तसेच निवळी गाव, सोमेश्वर आणि चिंचखरी, लांजा तालुक्यातील कुवे आणि पन्हळे गावातील नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. कोकणवासीयांच्या व्यथा जाणून घेतल्या. अतिवृष्टीच्या मदतीसंदर्भात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांना मदतीच्या सूचना दिल्या.

श्री. दरेकर म्हणाले, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. सरकारकडून भरघोस आर्थिक मदतीची अपेक्षा असताना सरकारने शेतकऱ्यांना अतिशय तोकडी मदत दिली. शेतकर्यां चे झालेले प्रचंड नुकसान पाहता सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी आहे. कोकणातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शेती उद्ध्वस्त झाली आहे. विरोधी पक्षांच्या दबावामुळे सरकारने किमान दहा हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. मात्र कोकणातील शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे जाहीर केलेल्या मदतीचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष काहीच उपयोग होणार नाही. राज्य सरकारचे पॅकेज प्रत्यक्षात नऊ हजार ७६० कोटींचे आहे, त्यामध्येही दोन हेक्टरची मर्यादा घातली आहे. पॅकेजमध्ये ३०० कोटी नगर विकास, २६०० कोटी रस्ते व पूल बांधणीसाठी, १०० कोटी जलसंपदा कामांसाठी, २३९ कोटी महावितरण व १ हजार कोटी ग्रामीण रस्ते व पाणीपुरवठा याकरिता वापरण्यात येणार आहेत. म्हणजे साडेपाच हजार कोटी शेती व घरांसाठी प्रत्यक्षात खर्च करण्यात येतील. कोकणातील शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे त्याच्या वाट्याला प्रतिगुंठा ५० ते ५५ रुपये मदत येणार आहे. म्हणजेच पाच ते दहा गुंठ्याला फक्त पाचशे ते हजार रुपये मिळतील, असा अंदाज आहे. ही तर येथील शेतकऱ्यांची अतिशय क्रूर चेष्टा आहे. नासाडीचे पीक बाहेर काढायलाच शेतकऱ्यांना सुमारे ५०० रुपयांचा खर्च येणार आहे, याचाच अर्थ शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहणार नाही असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

राज्यात सत्तेवर असलेल्या ठाकरे सरकारला कोकणाने भरभरून दिले. ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून, तालुका, जिल्हा परिषद, आमदार-खासदार, व मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वच सत्तास्थाने शिवसेनेला मिळाली. त्यामध्ये कोकणाच्या जनतेचा सिंहाचा वाटा आहे. सरकारचे प्रमुख म्हणून कोकणाला विशेष पॅकेज किंवा शेतकऱ्यांसाठी वेगळी भूमिका घेणे सरकारकडून अपेक्षित होते, परंतु महाविकास आघाडी सरकारचे खास करून शिवसेनेचे कोकणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, ही कोकणवासीयांची खंत आहे. त्यामुळे कोकणासाठी सध्या जे निकष आहेत, ते बदलून स्वतंत्र पॅकेज द्यावे अशी आमची मागणी असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

कोकणात प्रामुख्याने भातशेती केली जाते. एकदा पीक नष्ट झाले तर शेतकऱ्यांचे सर्वस्व संपून जाते. त्यासाठी विशेष धोरण तयार करण्याची आमची राज्य सरकारकडे मागणी आहे. कोकणातील चिंचखरी येथे सामुदायिक शेती केली जाते. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी संस्था तयार केली आहे. केंद्र शासन व राज्य सरकारकडून गटशेतीला प्रोत्साहन देण्यात येते, परंतु शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनाची कल्पना नाही. येथील स्थानिक प्रशासकीय अधिकारीही याबाबत अनभिज्ञ आहेत. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून गटशेतीसाठी एक अभियान राबवून शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे, असे प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहीतीही दरेकर यांनी दिली.

शेतकऱ्यांचे पीककर्ज पूर्णपणे माफ करावे, अशी आमची मागणी आहे. ते माफ झाले नाही तर शेतकरी पुन्हा उभा राहू शकणार नाही. पावसामुळे जमीन उद्ध्वस्त झाली आहे. या जमिनीवर जे कर्ज आहे ते कर्ज फेडले नाही, तर पुन्हा त्यांना कर्जही मिळणार नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे. याव्यतिरिक्त निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाईही लवकरात लवकर मिळावी. रत्नागिरी शहराची पाणीपुरवठा योजना व कोकणातील विविध विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून या विषयांचा पाठपुरावा करण्यात आल्याचे दरेकर यांनी सांगितले.

खेड, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, लांजा तालुक्यात सुमारे ८ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून यापैकी सुमारे ७५ टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता पंचनाम्याच्या फेऱ्यात न पडता शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी. पाचशे-शंभर रुपये देऊन शेतकऱ्यांना मदत होणार नाही. कोकणातील शेतकरी संयमी आहे त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. तो कधीच आत्महत्या करत नाही. राज्य सरकारने कोकणवासीयांकडे दुर्लक्ष केले असले, तरीही भाजप नेहमीच कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply