रत्नागिरी : करोनामुळे शाळा बंद असल्या, तरी शिक्षण आहे. प्रत्येक शाळा व प्रशासन आपापल्या परीने सक्षमतेने शिक्षणासाठी प्रयत्न करत आहे. मात्र ऑनलाइन शिक्षणाच्या वेगळ्या माध्यमांमुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालकही काहीसे गोंधळलेले आहेत. त्याबाबत त्या दोघांशीही संवाद साधणारा कार्यक्रम येथील लर्निंग पॉइंट या संस्थेने येत्या रविवारी (दि. १ नोव्हेंबर) आयोजित केला आहे.
सद्यःस्थितीतील ऑनलाइन शिक्षणात पाठ्यक्रम मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी, अध्ययन प्रभावी कसे होईल यासाठी अध्यापनातील अनेक पद्धती व तंत्राचा वापर शिक्षक खुबीने करत आहेत. पण त्यापलीकडे अनेक बाबी मुले नव्याने शिकत आहेत. त्यासाठी त्यांच्या शिक्षकांपलीकडचा शिक्षक त्यांना विनासायास किंवा काही प्रसंगी प्रयत्नपूर्वक मिळत आहे. मोबाइल, कुटुंब, मित्रपरिवार, निसर्ग आणि रोजचे अनुभव त्यांना त्यांच्या जीवनातील अनेक धडे सहजतेने देऊन जात आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत, विचारप्रक्रियेत, नातेसंबंधात, वर्तनात बदल दिसत आहे. त्यावर शाळा किंवा इतर माध्यमातही फारसा प्रकाश पडत नाही. गेल्या मार्चपासून उद्भवलेल्या या अभूतपूर्व परिस्थितीत सर्वांचेच जीवनचक्र बदलले आहे. शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्यही कसोटीला लागले आहे. त्याला मुले आणि पर्यायाने पालकही अपवाद नाहीत. याबाबतीत मुलांसाठी, मुलांबरोबर पालकांसाठी ऑनलाइन चर्चासत्राची मालिका लर्निंग पॉइंटने आयोजित केली आहे. त्याचा प्रारंभ येत्या रविवारी सायंकाळी साडेचार वाजता पालकांशी संवाद साधून होणार आहे.
एकूण ४ सत्रांमध्ये या मालिकेची गुंफण घातली जाणार असून पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी असे दोन गट त्यासाठी असतील. प्रत्येक सत्रात स्वतंत्र विषय असून तज्ज्ञांचे मार्गदर्शन त्यांना लाभणार आहे. पाचवी ते आठवीसाठी सुट्टीचाही कंटाळा आला आता काय, नवनवीन अनुभव व माझे शिकणे, खेळाविना आणि शाळाविना मी, अभ्यास आणि सूचनांचा भडिमार असे विषय असतील. नववी ते बारावीसाठी विषय असे – मी व समाजमाध्यमे, धोके आणि परिणाम, करोनाकाळातील माझे मला शोधणे, किशोरावस्थेतील माझ्यामधील बदल, नातेसंबंध, संवाद व माझे व्यक्तिमत्त्व. सत्राच्या शेवटी मुलांच्या प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञ व आयोजकांकडून दिले जातील. सत्रे सुरू करण्यापूर्वी पालकांसाठी एक निःशुल्क सत्रही होणार आहे. त्यात मुलांसाठी होणार असलेल्या सत्रांची मालिका, त्यातील वैशिष्ट्ये याबद्दल पालकांशी संवाद साधला जाणार आहे.
मुलांशी अनौपचारिक आणि मनमोकळ्या गप्पांच्या माध्यमातून साधल्या जाणाऱ्या या संवादसत्रात सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी मानसशास्त्रज्ञ सचिन सारोळकर (9975425610, 9422429899) किंवा सुखदा सारोळकर (9422646872) यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

