साध्या फोनवर मोफत ऐका दिवाळी अंक; ‘छात्र प्रबोधन’चा मुलांसाठी अनोखा उपक्रम

दिवाळी हा जसा दिव्यांचा उत्सव, तसाच महाराष्ट्रात तो अक्षरवाङ्मयाचाही उत्सव असतो. दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे आणि शंभर वर्षांहूनही अधिक काळ ही परंपरा जपली जात आहे. हे दिवाळी अंक आबालवृद्धांचे साहित्यिक-सांस्कृतिक भरणपोषण करत असतात; मात्र यंदा करोनामुळे नेहमीचं सगळंच चित्र पालटून गेलं आहे.

शाळा बंद झाल्या नि शिक्षण ऑनलाइन झालं; मात्र दुर्गम भागातल्या, तसंच आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांना मात्र त्यात खूप अडचणी येत आहेत. दैनंदिन शिक्षणातच जिथे इतक्या अडचणी येतायत, तिथे दिवाळी अंक घेऊन वाचण्याची गोष्टच दूर. या पार्श्वभूमीवर, पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या ‘छात्र प्रबोधन’ या कुमारांसाठीच्या मासिकाने यंदा दिवाळी अंक फोनवर मोफत ऐकण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. यासाठी स्मार्टफोन लागणार नाही आणि इंटरनेटचीही गरज नाही. फक्त साधा फोन, रेंज आणि ऐकण्याचा उत्साह यांची आवश्यकता आहे.

पाच नोव्हेंबर ते चार डिसेंबर २०२० या एक महिन्याच्या कालावधीत राज्यभरातल्या मुलांना मान्यवर लेखक-कवींचं दर्जेदार साहित्य त्यांच्याच आवाजात फोनवरून ऐकता येणार आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईलच; पण खास करून ग्रामीण भाग, तसेच दुर्गम वाड्या-वस्त्यांमधील विद्यार्थी आणि अंध विद्यार्थी यांना डोळ्यांसमोर ठेवून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

यासाठी काय करायचं?
९६६७७१५७१६ हा नंबर डायल करायचा. त्यावर नाव, गाव, तालुका आणि वय ही माहिती सांगून एकदाच नोंदणी करावी लागेल. त्यानंतर पुढच्या महिन्याभरात त्याच फोन क्रमांकावरून फोन करून तुम्ही तुमच्या वेळेनुसार दिवाळी अंकातलं साहित्य ऐकू शकता.

फोनच्या १ ते ९ क्रमांकावर गोष्टी, गाणी, जिद्दीच्या कहाण्या, माहितीपर आणि कृतीपर विशेष लेख, कलाकृती, विज्ञान प्रयोग अशा १० साहित्यप्रकारांचा एक संच देण्यात आला आहे. दर पाच दिवसांनी हा संच बदलणार. म्हणजेच पाच नोव्हेंबरला उपक्रम सुरू झाल्यानंतर १०, १५, २०, २५ आणि ३० नोव्हेंबर या दिवशी नवीन संचातील साहित्य ऐकता येणार आहे. अशा रीतीने महिन्याभरात ६० गोष्टी, गाणी, लेख ऐकायला मिळणार आहेत.

इंद्रजित भालेराव, एकनाथ आव्हाड, आश्लेषा महाजन, मुबारक शेख, मृणालिनी चितळे, आबा महाजन, दुर्गेश सोनार, मृणालिनी कानिटकर, रामचंद्र देखणे यांच्यासारख्या अनेक मान्यवर लेखक-कवींच्या आवाजात त्यांच्या कथा, कविता, लेखांचं अभिवाचन ऐकायला मिळणार आहे. या उपक्रमासाठी रोहा (जि. रायगड) येथील एक्सेल इंडस्ट्रीजचं सहकार्य लाभलं आहे.

‘बोलक्या दिवाळी अंकाच्या या वेगळ्या उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या दिवाळीचा आनंद शतगुणित करावा आणि जीवन समृद्ध करावं. तसेच, आपल्या परिचयातले विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी, जेणेकरून या दिवाळीला हजारो वंचित विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार साहित्याची मेजवानी पोहोचू शकेल,’ असं आवाहन ‘छात्र प्रबोधन’चे संपादक महेंद्र सेठिया यांनी केलं आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply