रत्नागिरी : रत्नागिरीतून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक कोकण मीडियाच्या पाचव्या दिवाळी अंकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन आज (१३ नोव्हेंबर २०२०) रत्नागिरीत झाले. करोनाविषयक कथा स्पर्धाही कोकण मीडियाने या दिवाळी अंकाच्या निमित्ताने घेतली होती. त्या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. (बातमीच्या शेवटी निकाल दिला आहे.)
राज्यातील पहिल्या आणि १९३ वर्षांची परंपरा असलेल्या रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयातील छोटेखानी कार्यक्रमात वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन झाले. जागतिक महामारी ठरलेल्या करोना या विषयाला वाहिलेल्या आणि या विषयावरील वैविध्यपूर्ण साहित्याने नटलेल्या कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाचे कौतुक अॅड. पटवर्धन यांनी केले. करोनाचा फटका बसूनही दिवाळी अंकाची परंपरा कायम राखून वाचकांना समृद्ध करण्याचे काम केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. तसेच, सध्याच्या परिस्थितीचा विचार करता केवळ १२५ रुपयांत दर्जेदार अंक उपलब्ध करून देणे आणि ई-बुक स्वरूपातही तो प्रसिद्ध करणे, ही वाचकांसाठी उत्तम भेट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यंदा जवळपास एकतृतीयांश दिवाळी अंकांना करोना आणि त्यानंतरच्या लॉकडाउनचा फटका बसला. ते अंक प्रसिद्ध होऊ शकलेले नाहीत. अनेक अंकांनी कमी प्रती प्रसिद्ध केल्या, तर काही अंकांच्या पानांमध्ये घट झाली. या पार्श्वभूमीवर दिवाळी अंकाची परंपरा कायम ठेवण्याच्या उद्देशाने कोकण मीडियाने सलग पाचव्या वर्षी दिवाळी अंक प्रकाशित केल्याचे संपादक प्रमोद कोनकर यांनी सांगितले.
वाचनालयात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला नगर वाचनालयाचे कार्यवाह आनंद पाटणकर, संतोष प्रभू, कोकण मीडिया दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ साकारणारे चित्रकार प्रहर महाकाळ, ज्येष्ठ पत्रकार सुकांत चक्रदेव, सतीश पालकर आदी उपस्थित होते. करोनाविषयक निर्बंधांमुळे अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. (कथा स्पर्धेचा निकाल बातमीच्या शेवटी आहे.)
करोनाविषयक कथा स्पर्धाही कोकण मीडियाने या दिवाळी अंकाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आली होती. त्या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या विजेत्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. विजेत्यांशी व्यक्तिगतरीत्या संपर्क साधून त्यांची बक्षिसे दिली जातील. स्पर्धेत विजयी झाल्या नसलेल्या, मात्र उल्लेखनीय असलेल्या निवडक कथांनाही अंकात प्रसिद्धी देण्यात आली आहे. तसेच, स्पर्धेव्यतिरिक्त अन्य दर्जेदार कथांचाही अंकात समावेश आहे.
दिवाळी अंक करोना कथा स्पर्धेचा गुणानुक्रमे निकाल असा : (कंसात कथेचे शीर्षक)
१ – डॉ. समिधा गांधी, पनवेल (सद् रक्षणाय)
२ – विवेक (राजू) परब, चिंदर, मालवण, जि. सिंधुदुर्ग (मृत्युपत्र)
३ – संजीवनी फडके, तिर्लोट, देवगड, जि. सिंधुदुर्ग (गोष्ट तशी साधी)
उत्तेजनार्थ १ – माधव गवाणकर, दापोली, जि. रत्नागिरी (कठीण समय येता)
उत्तेजनार्थ २ – धनाजी जनार्दन बुटेरे, पोई, पो. वाहोली, ता. कल्याण, जि. ठाणे (मानलं बुवा बायकोला….!)
दिवाळी अंकाच्या उपलब्धतेबाबत :
साप्ताहिक कोकण मीडियाचा दिवाळी अंक रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात काही दिवसांकरिता सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. रत्नागिरीसह मुंबई, पुणे या शहरांतील सर्व प्रमुख वितरक आणि विक्रेत्यांकडे हा अंक उपलब्ध आहे. तसेच, बुकगंगा डॉट कॉम या वेबसाइटवरून हा अंक जगभर कोठेही घरपोच मागवता येऊ शकतो. ‘बुकगंगा’सह गुगल प्ले बुक्सवर हा दिवाळी अंक ई-बुक स्वरूपातही उपलब्ध आहे.
छापील अंक बुकगंगावरून थेट मागविण्यासाठी लिंक https://www.bookganga.com/R/8A23S
ई-बुक खरेदीसाठी लिंक : https://bit.ly/3khxt6i
या पर्यायांपैकी कोणताच पर्याय शक्य नसल्यास कृपया खाली दिलेला फॉर्म भरावा. आपल्याला पोस्टाने अंक घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल. त्यासाठी आपली पूर्ण माहिती व्यवस्थित भरणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी.
संपर्क क्रमांक : ९४२२३८२६२१, ९४२३२९२१६२
(खालील फॉर्म दिसत नसल्यास कृपया येथे क्लिक करा.)