कोकण रेल्वेच्या ‘रो-रो’मधून कोसळला ट्रक; २० वर्षांतील पहिलाच अपघात

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर कोलाड ते केरळ मार्गावर धावणाऱ्या रो-रो वाहतुकीच्या गाडीतून आज (१८ नोव्हेंबर २०२०) पहाटे एक ट्रक कोसळला. अपघातात प्राणहानी झालेली नाही. कोसळणाऱ्या ट्रकच्या चालकाने उडी घेऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात तो जखमी झाला. रो-रो सेवा सुरू झाल्यापासून गेल्या वीस वर्षांतील अशा तऱ्हेचा हा पहिलाच अपघात आहे.

कोकण रेल्वेची रो-रो सेवा गेल्या वीस वर्षांपासून सुरू आहे. रेल्वेच्या मालगाड्यांवरून ट्रक्सच्या केल्या जाणाऱ्या वाहतुकीला रो-रो सेवा (Roll On Roll Off) म्हणतात. १७ नोव्हेंबरला रात्री कोलाड येथून सुटलेल्या या गाडीतून १८ नोव्हेंबरला पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास एक ट्रक रुळाशेजारी कोसळला. कोलाड येथून गोव्यातील वेर्णा येथे नेल्या जाणाऱ्या या ट्रकमधून पत्र्याची वाहतूक केली जात होती. रत्नागिरी जिल्ह्यातील दिवाणखवटी ते खेड या दोन स्थानकांच्या दरम्यान सुकिवली नदीच्या वळणावर हा अपघात घडला. ट्रकला बांधलेले साखळदंड तुटल्याचे लक्षात येताच ट्रकमध्ये झोपलेला चालक वसीम याकूब शेख (वय ३४) याला जाग आली. त्याने जिवाच्या आकांताने ट्रकमधून उडी घेतली. त्याच्या पायांना जखमा होण्यावर निभावले आहे. पहाटे घडलेल्या या अपघातामुळे कोकण रेल्वेची वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली.

कोकण रेल्वेच्या जाळ्याच्या मदतीने मालवाहतुकीच्या रो-रोच्या सेवेने वेगळाच प्रयोग प्रत्यक्षात आला. १९९९ साली ही सेवा कोलाड ते वेर्णा या मार्गावर सुरू झाली. या सेवेच्या माध्यमातून दर वर्षी कोकण रेल्वेला सरासरी ७५ कोटी रुपयांचा महसूल मिळत असून, आतापर्यंत सुमारे ६५० कोटी रुपये मिळाले आहेत. कोकण रेल्वे मार्गावर जलद, स्वस्त मालवाहतुकीच्या अनुषंगाने ‘रो-रो’ सेवेचा प्रयोग सुरू करण्यात आला. रस्ते वाहतुकीतून होणारा वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय टाळण्यासाठी सुरू झालेला हा प्रयोग यशस्वी ठरला. या सेवेने कोलाड ते वेर्णा (गोवा), कोलाड ते सुरतकल (कर्नाटक) या मार्गांवर मालवाहतूकदारांना मदतीचा हात दिला आहे.

या मार्गावर ‘रो-रो’अंतर्गत दररोज तीन ते चार मालगाड्या चालवल्या जातात. प्रत्येक मालगाडीत किमान ५० ते ६० ट्रक्स असतात. ‘रो-रो’द्वारे कोकण रेल्वेने आतापर्यंत जवळपास सहा लाख ट्रक्सची वाहतूक केली आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांच्या इंधनाची, तसेच मालवाहतूकदारांच्या वेळेतही बचत झाली आहे. त्यामुळे या वाहतुकीला दिवसेंदिवस अधिकाधिक प्रतिसाद मिळत आहे. करोनाप्रतिबंधक लॉकडाउनच्या काळातही काही दिवसांचा अपवाद वगळता ही सेवा नियमित सुरू होती.

गेल्या वीस वर्षांत या मार्गावर चालणाऱ्या गाडीतून ट्रक कोसळल्याची एकही घटना घडली नव्हती. आज ती घडली आहे. ट्रकची वाहतूक करताना पुरेशी काळजी घेतली जाते. मालगाडीत ट्रक चढविल्यानंतर रेल्वेच्या धक्क्यांमुळे ट्रक हलू नये, यासाठी साखळदंड बांधले जातात. आज कोसळलेल्या ट्रकलाही साखळदंड बांधलेले होते. ते तुटून अपघात घडला. या अपघातात ट्रकचालकाचा जीव वाचला असला, तरी रेल्वेतून ट्रकची वाहतूक करण्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, यासाठी कोकण रेल्वेने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply