रत्नागिरीत १७ फेब्रुवारीपासून कालिदास स्मृती व्याख्यानमाला

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे उद्यापासून (दि. १७ फेब्रुवारी) दोन दिवसांची कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमाला होणार आहे. अज्ञात रामायण या विषयाची व्याख्याने त्यामध्ये होणार आहेत.

यावर्षी व्याख्यानमालेचे ६४ वे वर्ष असून मुंबईतील सीए चंद्रशेखर वझे अज्ञात रामायण या विषयावर व्याख्यान देणार आहेत. रामायणाचा खरा बोध कोणता आणि संस्कार कोणता, रामराज्य असे का म्हणायचे, प्रभू श्रीरामाचे प्रशासन कसे होते, मूळ वाल्मीकी रामायणात आपल्याला माहीत नसलेल्या कोणत्या गोष्टी आहेत, अशा प्रश्नांची उत्तरे अज्ञात रामायण या व्याख्यानातून रसिकांना मिळणार आहेत.

चंद्रशेखर वझे विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत असून संस्कृत भारतीचे कोकण प्रांताचे अध्यक्ष आहेत. वाल्मीकी रामायण या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास आहे.

उद्या सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात पहिले व्याख्यान होणार आहे. जास्तीत जास्त संस्कृतप्रेमी अभ्यासक, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि शिक्षकांनी याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी आणि संस्कृत विभाग प्रमुख उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply