मास्क नसेल, तर पोलीसही ठोठावू शकतील ५०० रुपयांचा दंड

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक संचारबंदीबाबत तूर्त कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र येत्या सात-आठ दिवसांमध्ये सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणे अशी आवश्यक ती खबरदारी लोकांनी घेतली, तर संचारबंदीची वेळ येणार नाही. ती येऊ नये यासाठी लोकांनी सहकार्य करावे. मास्क वापरणे अत्यावश्यक असून विनामास्क व्यक्तींना ५०० रुपयांचा दंड आकारण्याचे अधिकार पोलिसांनाही देण्यात आले आहेत, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी ऑनलाइन संवाद साधल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला आवाहन करण्यासाठी श्री. सामंत यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली. मंत्रालयातील आपल्या दालनातून त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जिल्ह्यातील करोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत चालली आहे. जिल्ह्यात सध्या १३२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील ६४ रुग्ण रत्नागिरीच्या नावावर दाखवले जात असले, तरी ते बाहेरचे आहेत. त्यांचा पत्ता रत्नागिरीचा असल्याने ते रत्नागिरीचे दिसतात. पण जिल्ह्याचा करोनामुक्तीचा दर ९४.५१ टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६२ जणांचा मृत्यू झाला असून मृत्युदर ३.६ टक्के आहे. अशा स्थितीत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, अध्यक्ष रोहन बने, आरोग्य सभापती बाबू म्हाप यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. त्यानुसार विनामास्क व्यक्तींना ५०० रुपयांचा दंड आकारण्याचे अधिकार महसूल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच पोलिसांनाही देण्यात आले आहेत. त्याशिवाय गर्दी टाळण्यासाठी नाकेबंदी करणे, इतर आवश्यक निर्बंधही ते घालू शकतील. संशयितांची स्वॅब टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. विनापरवानगी लग्नसमारंभ, हॉलमधील कार्यक्रम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसे आदेश जिल्हाधिकारी देतील. अन्यथा संचारबंदी लागू करावी लागेल. येत्या सात-आठ दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल. त्यामुळेच नागरिकांचं पूर्वीपेक्षा अधिक सहकार्य अपेक्षित आहे, असेही श्री. सामंत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, शिमगोत्सवाचे मोठे आव्हान आहे. तो आपला मोठा सण असला, तरी तो साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन मी करतो. क्रिकेट, खोखो, स्नेहसंमेलनासारखे कार्यक्रम काही दिवसांसाठी थांबवावेत. प्रादुर्भाव वाढू शकतो हे लक्षात घेऊन सर्वांनी सज्ज राहावे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, शासकीय रुग्णालयांविषयीची दररोजचा आढावा अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे घेतील. करोनाची संभाव्य दुसरी लाट थांबविण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत. करोना पुन्हा डोके वर काढण्याच्या स्थितीत असताना त्याला ठेचून काढणे, ही आपली जबाबदारी आहे. संपर्कातील व्यक्तींची तपासणी वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या २ मार्च रोजी अंगारकी संकष्टी आहे. गणपतीपुळे येथे तो उत्सव साधेपणाने साजरा करावा, अशी विनंती आहे. जिल्हाधिकारी मंदिराच्या ट्रस्टशी बोलून पुढचा निर्णय घेतील. पंधरा-वीस दिवसांतील सण, उत्सव, महोत्सव थांबवावेत, अशी शासनामार्फत मी विनंती करतो, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील लसीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. आघाडीच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. पोलिसांचे लसीकरण सुरू आहे. पन्नास वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती श्री. सामंत यांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply