सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू

सिंधुदुर्गनगरी : करोनाप्रतिबंधाचा उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत संचारबंदी लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी बजावले आहेत.

संचारबंदीच्या काळात कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये. अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी आणि वैद्यकीय कारणास्ताव रुग्ण आणि त्यासोबत असलेले नातेवाईक यांना संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त विनाकारण फिरताना आढळल्यास अशा व्यक्तींच्या विरोधात नियमानुसार कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी, आस्थापना, समारंभ, कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असून मास्कर, रुमाल न वापरल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींयकडून एक हजार रुपये दंडाची रक्कम महसूल, पोलीस आणि स्थानिक प्राधिकरण वसूल करतील. लग्न‍ समारंभ फक्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडता येईल. त्यासाठी संबंधित तहसीलदारांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडास्पर्धा, यात्रा, जत्रा, उरूस इत्यादी धार्मिक विधी फक्त ५० व्यक्तींच्या मर्यादेत करता येतील. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे. जिल्ह्यातील आठवडा बाजार स्‍थानिक प्राधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय भरवता येणार नाहीत. पर्यटन स्थळे, आठवडा बाजाराची ठिकाणे, सर्व सार्वजनिक, धार्मिक स्थळे, उद्याने, मोकळ्या जागा, मनोरंजन पार्क, क्रीडांगणे, समुद्र किनारे इत्यादी ठिकाणी एकाचवेळी ५० पेक्षा जास्त‍ लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात ३८१ व्यक्तींना मास्क वापरत नसल्यामुळे दंड ठोठावण्यात आला. महसूल विभागाने काल एका दिवसात २६ व्यक्तींवर कारवाई करून ५२०० रुपयांचा दंड वसूल केला. पोलिसांनी १८१ व्यक्तींवर कारवाई करून ३६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. नगरपालिका क्षेत्रात १५४ व्यक्ती विनामास्क आढळून आल्याने त्यांच्याकडून ३० हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ग्रामीण भागात २० व्यक्तींवर मास्क न वापरल्याने कारवाई करून त्यांच्याकडून ४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. काल दिवसभरात वसूल करण्यात आलेल्या दंडाची एकूण रक्कम ७६ हजार २०० रुपये आहे.

दरम्यान, कणकवली शहरातील तेली आळीतील घर क्र. २/२४८ आणि घर क्र. २/१७७ आणि परिसरात येत्या ८ मार्चपर्यंत कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply