एसटी, खासगी बसमधील प्रवाशांना १४ दिवस राहावे लागेल क्वारंटाइन

रत्नागिरी : राज्य शासनाने करोना प्रतिबंधासाठी गेल्या २१ एप्रिल रोजी जारी केलेल्या आदेशानुसार एसटी तसेच खासगी बसमधील प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. प्रवासी बस थांब्यावर उतरताच त्याच्या हातावर १४ दिवस क्वारंटाइन राहण्याचा शिक्का मारावा, असे आदेशात म्हटले आहे. कोणा प्रवाशाची करोनाविषयक आरटीपीसीआर करावयाची झाल्यास त्याचा खर्च प्रवाशाला करावा लागणार आहे.

शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग घोषित केला आहे. त्याच अनुषंगाने राज्य शासनाने गेल्या २१ एप्रिल रोजी आदेश काढले असून त्याची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यातही करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी त्याबाबतचे आदेश दिले आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थिती, अत्यावश्यक सेवेत ५० टक्के उपस्थिती, विवाह सोहळ्याला केवळ २५ जणांची उपस्थिती आणि हॉलवरील समारंभ केवळ दोन तासांत पूर्ण करणे, या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कुटुंबाला ५० हजार रुपयांचा दंड, करोनाची परिस्थिती सामान्य होईपर्यंत हॉलवर बंदी इत्यादी नियम जारी केले आहेत. याच आदेशांमध्ये खासगी आणि एसटीसह सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर शिक्के मारावेत, असे नमूद करण्यात आले आहे.

या आदेशाचा तपशील असा – खासगी प्रवासी वाहतूक – बसेस सोडून सर्व खासगी प्रवासी वाहतूक फक्त अत्यावश्यक सेवेसाठी किंवा वैध कारणासाठी करता येईल. त्यामध्ये वाहनचालक आणि ५० टक्के क्षमतेएवढे प्रवासी अंतर्भूत असतील. त्यामध्ये जिल्हांतर्गत किंवा आंतरजिल्हा प्रवास करणे अपे‍क्षित नसून रहिवासी शहरामध्ये प्रवास करणे सीमित राहील. आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत प्रवास केवळ अत्यावश्यक सेवा किेंवा तातडीची वैद्यकीय गरज किंवा अंत्यसंस्कार किंवा कुटुंबातील व्यक्तींचे तीव्र आजार अशा टाळता न येणाऱ्या प्रसंगी करता येईल. खासगी बसमध्ये एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना परवानगी असेल. उभे राहून प्रवास करण्यास मनाई असेल. खासगी बसेसद्वारे आंतर-शहर किंवा आंतर-जिल्हा प्रवास खालील नियंत्रणाच्या अधीन असेल – बसला एका शहरात जास्तीत जास्त दोन थांबे घेता येतील. त्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना कळविणे आवश्यक राहील. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण इच्छित असल्यास त्या वेळापत्रकात बदल करू शकतात. सर्व थांब्यांवर प्रवाशांच्या हातावर १४ दिवसांच्या क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात येईल. हा शिक्का बस सेवा पुरविणाऱ्यानेच मारणे बंधनकारक राहील. थर्मल स्कॅनरच्या वापरामध्ये कोणत्याही व्यक्तीला लक्षणे आढळल्यास करोना केंद्र किंवा हॉस्पिटलमध्ये प्रवाशाला पाठविले जाईल. प्रवाशांची आरटीपीसीआर करोना चाचणी करायची असल्यास आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एका अधिकृत प्रयोगशाळेमार्फत प्रवाशांच्या चाचण्या करण्याचे काम करू शकते. या चाचणीचा खर्च संबंधित प्रवाशाकडून घेतला जाईल. कोणताही चालक या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग करत असल्याचे आढळल्यास त्याला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण १० हजार रुपयांचा दंड आकारू शकेल. वारंवार चूक झाल्यास करोनाची अधिसूचना संपेपर्यंत चालकाचा चालन परवाना रद्द करण्यात येईल. विशिष्ट ठिकाणच्या करोना परिस्थितीनुसार तेथून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारावा किंवा नाही, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेऊ शकेल.

सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य शासन किंवा स्थानिक प्रशासनाच्या बसेसनाही खासगी बस प्रवासी वाहतुकीचेच नियम लागू राहतील. जिल्हांतर्गत किंवा आंतरजिल्हा प्रवास लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांद्वारे आणि बसेसद्वारे करणे नियंत्रणासह बंधनकारक राहील. नियंत्रणाचे हे नियम असे – स्थानिक रेल्वे प्राधिकरण, एसटीचे अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला प्रवास करणाऱ्या आणि जिल्ह्यात उतरणाऱ्या प्रवाशांची माहिती पुरवतील, जेणेकरून संबंधित प्रवाशाची चाचणी करणे सोयीचे होईल. थांब्यावर उतरल्यानंतर प्रवाशांच्या हातावर १४ दिवस होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जाईल. थर्मल स्कॅनरमध्ये लक्षणे दिसल्यास करोना केंद्र किंवा हॉस्पिटलमध्ये प्रवाशाला पाठविले जाईल. प्रवाशांची करोना चाचणी करावयाची असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एका अधिकृत प्रयोगशाळेमार्फत प्रवाशांची चाचणी करून घेतील. या चाचणीचा खर्च संबंधित प्रवाशाकडून वसूल केला जाईल. विशिष्ट ठिकाणच्या करोना परिस्थितीनुसार तेथून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारावा किंवा नाही, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल.

या आदेशाची अंमलबजावणी २२ एप्रिल ते १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत अंमलात राहील. हे आदेश रत्नागिरी जिल्ह्यात लागू राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने हे आदेश प्रसिद्ध केले आहेत.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply