“राष्ट्रीय डॉक्टर दिवस” कशासाठी?

दरवर्षी १ जुलै हा दिवस वैद्यकीय क्षेत्रातील आणि स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिकारी आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय या असामान्य आणि अलौकिक डॉक्टरांच्या सन्मानार्थ “राष्ट्रीय डॉक्टर दिवस” साजरा केला जातो. याविषयीची अधिक माहिती.
………..
डॉ. रॉय यांना बी. सी. रॉय या नावाने ओळखले जाते. त्यांचा जन्म १ जुलै १८८२ रोजी अविभक्त बंगालमध्ये झाला. रॉय घराण्याचे धागेदोरे जेसोरच्या राजघराण्याशी जोडलेले असले तरीही आर्थिक परिस्थिती मध्यमवर्गीय पण संस्कारांची आणि शिक्षणाची श्रीमंती या घराण्यात वारसा म्हणून चालत आली होती. पाटणा येथे शालेय शिक्षण झाल्यावर कलकत्ता मेडिकल कॉलेज येथे आपले वैद्यकीय शिक्षण त्यांनी गुणवत्तेने पूर्ण केले. या कॉलेजच्या प्रवेशद्वारावर ‘Whatever thy hands fenedth to do, do it with thy might’ हे वाक्य कोरले आहे. त्याबरहुकूम जीवनाची वाटचाल करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला होता. त्यांच्या उभ्या आयुष्याचे कर्तृत्व जणू काही या एका वाक्यापुढे गुंतले होते.
हातात अवघे १२०० रुपये असताना १९०९ साली ते भारत सोडून इंग्लंडला वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी निघाले. वंशाने आशियाई असल्याने २९ वेळा सेंट बारथोलोम्यू हॉस्पिटल येथे केलेला त्यांचा प्रवेश अर्ज फेटाळण्यात आला. परंतु जिद्दीने तिसाव्या वेळेस केलेला प्रवेश अर्ज हॉस्पिटलच्या डीनने मान्य केला. हे उच्च शिक्षण त्यांनी अवघे २ वर्षे ३ महिने या कालावधीत पूर्ण केले आणि १९११ साली ते भारतात परत आले.
भारतात परतल्यावर धर्म, पंथ आणि जात या फूट पडणाऱ्या गोष्टी विसरून बंगाली जनतेला एकत्र आणून लाल, बाल आणि पाल या क्रांतित्रयींच्या विचारांनी प्रभावित होऊन स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेतला आणि तुरुंगवास भोगला. याच काळात खेड्यापाड्यात जाऊन असंख्य गोरगरिबांवर सकाळी सात वाजल्यापासून न थकता ते वैद्यकीय सेवा करीत असत. स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या अग्रणी नेत्यांचे ते फॅमिली डॉक्टर होते.
पुणे येथे महात्मा गांधींच्या प्रसिद्ध उपवासकाळात त्यांची तब्येत खालावली आणि चिंताजनक परिस्थिती तयार झाली. निग्रही गांधीजी कुणाकडूनही उपचार करून घेईनात. अशा वेळी डॉ. बिधान चंद्र रॉय यांना बोलावण्यात आले. त्यावेळेस गांधीजींनी त्यांना विचारले की, माझ्या देशातील ४० कोटी जनता वैद्यकीय सेवेपासून वंचित आहे. तिला तुम्ही मोफत उपचार करणार का आणि त्यांचा वाली कोण? त्यामुळे मी आपल्याकडून उपचार करून घेणार नाही. तेव्हा डॉ. रॉय यांनी बाणेदारपणे गांधीजींना असे सांगितले की ४० कोटी जनतेच्या हृदयात तुम्ही आहात, त्यामुळे तुम्हाला माझ्याकडून उपचार करूनच घ्यावे लागतील. डॉ. रॉय यांच्या या उत्तराने गांधीजी नमले आणि त्यांच्याकडून उपचार करून घेतले.
त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून १९४२ साली इंग्रज सरकारने त्यांना कलकत्ता युनिवर्सिटीचे कुलगुरूपद दिले. या काळात बंगालच्या शिक्षण पद्धतीत त्यांनी आमूलाग्र बदल घडवले. याचा दूरगामी परिणाम म्हणून बंगालच्या पुढील पिढ्या देशात विविध क्षेत्रांमध्ये सतत अग्रेसर राहिल्या. स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या आग्रहामुळे १९४८ साली ते भारतीय बंगालचे दुसरे मुख्यमंत्री बनले आणि या पदावर त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १ जुलै १९६२ पर्यंत त्यांनी धडाडीने काम करून आधुनिक बंगालचा पाया घातला. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी बंगालमध्ये विविध रोगांवरील विशेष संशोधन करणाऱ्या संस्था आणि प्रमुख शहरांमध्ये सर्वरोग रुग्णालये स्थापन केली. त्यामुळे बंगाल वैद्यकीय क्षेत्रात फार पुढे गेला.
आपली वंशपरंपरागत मालमत्ता मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या आईच्या नावाने दान केली आणि तेथे हॉस्पिटल सुरू केले. त्यांना १९६१ मध्ये ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले.
एक सहृदयी प्रकांड ज्ञानी निष्णात आणि सतत जमिनीवर पाय असणारा, सत्तेची झूल अंगावर कधीही न मिरवलेला असा हा ध्येयवादी डॉक्टर १ जुलै १९६२ रोजी म्हणजे त्यांच्या जन्मदिवशीच अनंतात विलीन झाला. वैद्यकीय सेवा विश्वासार्ह असावी. डॉक्टर हे समाजाच्या कष्टातील पैशांनी उभारलेल्या संस्थांमधून बनत असतात. त्यामुळे त्यांनी समाजाच्या या ऋणाशी उपकृत राहून सतत भान ठेवावे, असे त्यांना वाटे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्ञान आणि कौशल्य तसेच जनतेचा विश्वास हेच खरे धन असते. प्रत्येक डॉक्टरने धनसंचयाच्या मागे न लागता जनसंचय आणि विश्वास मिळवावा, हे त्यांचे तत्त्व आजच्या पिढीतील डॉक्टरांनी आचरणात आणले, तर रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये असलेला संशयाचा पडदा नक्कीच दूर होईल.
डॉ. रॉय यांच्या पश्चात भारत सरकारने डॉ. बी. सी. रॉय नॅशनल अवॉर्ड ऑफ एक्सलन्स हा राष्ट्रीय पुरस्कार सुरू केला. वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आणि निरलसपणे काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. त्यांना प्रणाम!

  • डॉक्टर श्रीधर ठाकूर
    संचालक, इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, मुंबई, रत्नागिरी
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply