वासुदेव बळवंत फडके आणि चापेकर बंधू हुतात्मे झाले. लोकमान्य टिळकांचे त्यांना आशीर्वाद होते. त्यांच्या निधनानंतर क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली.
स्वातंत्र्यदेवतेचे पूजन केल्यानंतर क्रांतिकारकांच्या मनात असे आले की,
लोकमान्यांची झेप आणि सिंहगर्जना आम्हाला झेपणार नाही. तरीदेखील प्रभू रामचंद्रांच्या सेतूला खारीने जशी मदत केली, तसेच हे स्वातंत्र्यदेवते, आम्हाला जे परमेश्वराने आयुष्य दिले आहे, त्याचा आम्ही स्वातंत्र्यासाठी उपयोग करू आणि जिवाची कुरवंडी करू.
त्यांनी तशी शपथ घेतली. त्याच वेळी बंकिमचंद्रांच्या आनंद मठातील मातृदेवतेने सगुण रूप धारण केले. तिला विनवणी करताना क्रांतिकारक म्हणाले,
हे माते, काल तू वैभवसंपन्न होतीस. आज तू दीनदुःखी आणि गुलामगिरीत पिचणारी असहाय आई झाली
आहेस.
हे माते, आम्ही तुझे सुपुत्र स्वातंत्र्यासाठी आमच्या पंचप्राणांच्या पायघड्या पसरू, तुझ्या प्रेमाने रंगलेल्या मातृत्वासाठी रक्ताचा अभिषेक करू, यौवनाचा धूप जाळू. जीवनाचा नैवेद्य दाखवू.
हे स्वातंत्र्यदैवते, तुझ्या मंदिरात सन्मानाने तुझी प्रतिष्ठापना करू. तुझ्या कुशीत असे बलसंपन्न सुपुत्र जन्मले असताना पारतंत्र्यात तुला जास्त दिवस राहावे लागणार नाही. भविष्यकाळात आमची माता जगाला शक्तिसंपन्न आणि वैभवशाली दिसेल, हीच आमची इच्छा आहे.
अशी प्रार्थना करून क्रांतिकारकांनी भक्तिभावाने वंदे मातरम्। वंदे मातरम्।। वंदे मातरम्।।। असा जयघोष केला.
हा जयघोष ७४ वर्षांपूर्वी सुफळ झाला. आज पंचाहत्तरावा भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करताना अशा ज्ञात-अज्ञात क्रांतिकारक देशभक्तांना प्रणाम!
- विलास यशवंत राजवाडकर, खेड
(संपर्क : 84468 55789)


