करोनाचे आव्हान पेलण्यासाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज – अनिल परब

रत्नागिरी : करोनाच्या संकटावर रत्नागिरी जिल्ह्याने मात केली आहे. करोनाचे यापुढील आव्हान पेलण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पूर्णपणे सज्ज आहे, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी आज येथे व्यक्त केला.

येथील पोलिस संचलन मैदानावर पंचाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाचे ध्वजवंदन केल्यानंतर ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर पोलीस दलाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर बोलताना पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त अर्थात ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. नुकत्याच अतिवृष्टी आणि दरड दुर्घटनेत ज्यांनी प्राण गमावले, त्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पालकमंत्री म्हणाले, करोनावर मात करण्यासाठी शासन पूर्ण प्रयत्न करीत आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात धरुन सर्व पूर्वतयारी प्रशासनाने केली आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हटी रेट २ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. ग्रामीण भागात ग्राम कृती दलांनी केलेल्या उत्तम कामामुळे जिल्ह्यातील १५३४ गावांपैकी १२१४ गावे करोनामुक्त करण्यात आतापर्यंत यश आले आहे. ग्रामपंचायतींना यासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून 25 टक्के रक्कम खर्च करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. कोविडवरील उपचार आणि क्षमतावर्धन करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर निधीतून ३० टक्के रक्कम म्हणजे ७५ कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. त्यातील ३८ कोटीं रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यतादेखील देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त जिल्हा खनिकर्म निधीतून १३ रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत. महिला रुग्णालयासह इतर ठिकाणी असणाऱ्या बेड्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचे काम प्रशासनाने केले आहे. दुसरी लाट आली त्यावेळी सर्वत्र प्राणवायूची गरज वाढली. त्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यानुसार शून्यापासून सुरुवात करून आज जिल्ह्यात ९२.४७ टन ऑक्सिजन साठा आणि निर्मितीपर्यंत जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग पोहोचला आहे, हे उल्लेखनीय आहे. ऑक्सिजनच्या सिलिंडर्सची संख्याही ६६८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. करोना महामारीचा आपण गेल्या दीड वर्षापासून मुकाबला करत आहोत. आता व्यवहार सुरळित होत असले तरी तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षित अंतराचे पालन करणे, मास्कचा वापर करणे आणि हातांची स्वच्छता ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन सर्वांनी कोटकोरपणे करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आपत्तीमागून आपत्ती झेलत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेसोबत शासन आणि प्रशासन सदैव आहे आणि आपली भूमिका पार पाडत आहे. संकटांची ही मालिका संपवून आपण जिल्ह्याला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम करू या, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. ते म्हणाले, कोविड, नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळ, तौते आणि अलीकडील अतिवृष्टी या सर्व संकटांच्या मालिकेत प्रत्येकवेळी शासन जनतेच्या पाठीशी उभे राहिले आहे. निसर्ग चक्रीवादळातील बाधितांना नुकसानभरपाई देताना सर्व निकष बदलून शासनाने मदत केली. यात एक लाख ९ हजार २२६ बाधितांना १५३ कोटी ७० लाख १६ हजार रुपये एवढ्या मागणीच्या १०० टक्के मदत वाटप पूर्ण झाले आहे. तौते चक्रीवादळात बाधितांना मदतदेखील वाटप करण्यात येत आहे. अतिवृष्टीत बाधित गावांमधील तातडीच्या दुरुस्तीच्या कामांसाठी जिल्हा नियोजन निधीमधून ४ कोटी ५६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

आपत्तीदरम्यान आणि नंतरच्या काळात मदत करण्यासाठी विविध संस्था, संघटना पुढे आल्या आणि तातडीची मदत तसेच जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर आदी महापालिकांनी पथके पाठविली होती. आपत्तीनंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि बाहेरील जिल्ह्यातील अनेक डॉक्टर आणि आरोग्य सेवकांनी तातडीने साथरोग पसरू नये, याची काळजी घेतल्याने नंतरच्या काळात सर्व वातावरण आता सुरळित झाले आहे. याबाबतही त्यांनी सर्वांचे आभार मानले.

आपत्तीत मदतीनंतर पुनर्वसन महत्त्वाचे असते. यात मंडणगड तालुक्यात वेळीच लक्ष देऊन पंदेरे धरणाची गळती वेळीच रोखण्यात यश आले. तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेत बेघर झालेल्या कुटुंबांना श्री सिद्धिविनायक ट्रस्टच्या मदतीने अलोरे येथे पुनर्वसन करून नवी घरे मिळवून दिली. या आपत्तीत विस्थापित झालेल्या कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन गतिमान पद्धतीने प्रशासन पूर्ण करेल. खेड आणि चिपळूणमध्ये झालेल्या अतिवृष्टीतील बाधितांना निकष शिथिल करून अधिकाधिक मदत वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या आपत्तीमधील मृतांच्या वारसांना नैसर्गिक आपत्तीमधून प्रत्येकी ४ लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष मदत म्हणून प्रत्येकी १ लाख रुपये देण्याचा निर्णय घेऊन लगेच वाटप सुरू करण्यात आले. आतापर्यंत १ कोटी ३१ लाख रुपये वारसांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत, अशीही माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

या संकटात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा सर्वांना कपडेलत्ते आणि भांडीकुंडी यासाठी एसडीआरएफमधून प्रत्येकी ५ हजार आणि शासनातर्फे विशेष निधी म्हणून ५ हजार असे एकूण १० हजार रुपये तातडीची मदत देण्यात येत आहे. यात आतापर्यंत ३ कोटी ८२ लाख रुपये मदत देण्यात आली आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, याच भूमिकेतून शासन काम करते. त्यासाठी यंदा खरीप हंगामात २६८ कोटी आणि रबीसाठी ३२९ कोटी असे एकूण ५९७ कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे. मधल्या काळात शेतकऱ्यांना अतिवृष्टीत मोठे नुकसान सोसावे लागले. त्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यांना भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात लवकरात लवकर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यंदा नेमक्या हंगामाच्या काळात कोविडची साथ वाढली. त्यामुळे आंबा व्यावसायिक संकटात आला होता. त्यांना या काळात एसटी आणि इतर माध्यमातून आंबा वाहतुकीची परवानगी शासनाने दिली आणि आपली कटिबद्धता सिद्ध केली. जुलैमधील अतिवृष्टीच्या काळात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर काही अपघाती मृत्यू झाले. अशा ३७ शेतकऱ्यांच्या वारसांना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून मदत देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आपल्या पीकपेरणीची नोंद गाव नमुना १२ वर करण्यासाठी सरकारी कार्यालयात यावे लागू नये, यासाठी ई-पीक पाहणी ॲपची सुविधा आजपासून मिळणार आहे. याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात केले.

आत्मनिर्भर सप्ताहाला आज प्रारंभ होत आहे. आपण सक्षम होऊन सोबतच आत्मनिर्भर होऊ या. यातून प्रथम करोनामुक्ती आणि नंतरच्या काळात पर्यटनातून जिल्ह्याचा विकास घडवू या. सर्वच बाबतीत शासन आपल्यासोबत आहे. येणाऱ्या काळात जिल्हा निश्चितपणे प्रगती करेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

या सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग उपस्थित होते. कोविडच्या निर्बधांमुळे अधिकाधिक जणांना कार्यक्रम बघणे शक्य व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे फेसबुक तसेच यूट्यूब तसेच खासगी केबलवरून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply