चिपळूणच्या लोकमान्य टिळक वाचन मंदिरासाठी राज्य शासनाकडून अडीच हजार ग्रंथ

मुंबई : चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या ग्रंथसंपदेचे नुकत्याच झालेल्या महापुरामुळे नुकसान झाले होते. या वाचनालयासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने अडीच हजार ग्रंथ भेट दिले. ही ग्रंथसंपदा घेऊन जाणाऱ्या वाहनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवला.

वर्षा शासकीय निवासस्थानाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील, मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे, साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी मराठी भाषा विभागाशी निगडित सर्व संस्थांच्या या पुढाकाराचे कौतुक केले. तसेच त्यांनी भेट देण्यात येणाऱ्या ग्रंथसंपदेची माहिती घेतली.

चिपळूणमध्ये १८६४ साली स्थापन झालेल्या व १५७ वर्षांची परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, वाचनालयात वर्षानुवर्षे जोपासलेल्या अमूल्य अशा ग्रंथसंपदेचे अतिवृष्टीमुळे महापुराचे पाणी शिरल्याने फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वाचनालयातील पुस्तकांचे नुकसान विचारात घेऊन वाचनसंस्कृतीचे वातावरण पूर्वपदावर यावे, यासाठी मराठी भाषा विभागातर्फे अडीच हजार पुस्तके देण्यात येत असल्याची माहिती मंत्री श्री. देसाई यांनी दिली.

अनेक वर्षांची समृद्ध वाचन परंपरा असलेल्या या वाचनालयाला मदत व्हावी, वाचकांना पुन्हा पुस्तके वाचनासाठी उपलब्ध व्हावीत आणि वाचनसंस्कृती अखंडितपणे प्रवाहित राहावी, या हेतूने वाचनालयाला राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या कार्यालयांच्या पुढाकारातून मराठी भाषा विभागाकडून वैविध्यपूर्ण विषयांवरील मौलिक अशी अडीच हजार पुस्तके भेट देण्यात आली आहेत.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply