केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी रत्नागिरीत

रत्नागिरी : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खंडित झालेली जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी (२७ ऑगस्ट) रत्नागिरीत दाखल होत आहे. त्यानंतर ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात रवाना होईल.

श्री. राणे यांची जनआशीर्वाद यात्रा संगमेश्वर येथे स्थगित झाली होती. उद्या सकाळी १० वाजल्यापासून रत्नागिरी शहरातून ही यात्रा सुरू होत आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

या यात्रेचा सविस्तर कार्यक्रम असा – सकाळी १० वाजता श्री. राणे मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर माळनाका येथील लोकनेते शामराव पेजे यांचा पुतळा आणि जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही ते अभिवादन करतील. त्यानंतर गोळप (ता. रत्नागिरी) येथील आंबा बागायतदार विजय देसाई यांच्या कारखान्याला भेट देतील. तेथेच आंबा बागायतदार, काजू उत्पादक, आंबा कॅनिंग प्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

सकाळी साडेअकरा वाजता रत्नागिरीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात श्री. राणे यांचा सत्कार होणार असून तेथे श्री. राणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते विविध प्रतिनिधी मंडळांची भेट घेतील. दुपारी लोकमान्य टिळक जन्मस्थानाला ते भेट देतील आणि त्यानंतर गाडीतळ येथील स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. दुपारी अडीच वाजता श्री. राणे यांची पत्रकार परिषद मारुती मंदिर येथे होईल. त्यानंतर ते कुवारबाव येथील भाजपा कार्यालयाला सदिच्छा भेट देणार असून तेथे केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ झालेल्या नागरिकांची भेट घेणार आहेत. पावणेचार वाजता लांजा आणि साडेचार वाजता राजापूर येथे श्री. राणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात रवाना होतील.

दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर श्री. राणे यांच्या दौऱ्यात सहभागी होणार आहेत.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply