गणेशोत्सवाच्या काळात प्रकट झालेल्या मूषकाने स्वीकारला गणपतीचा प्रसाद!

लांजा : गणेशोत्सवात मूषकाच्या म्हणजे उंदराच्या पूजेलाही स्थान असते. याच मूषकाने गणेशोत्सवाच्या काळात गणपतीला अर्पण केलेल्या नैवेद्याचा प्रसाद स्वीकारला आणि गणपतीशी असलेल्या आपल्या नात्याची प्रचीती आणून दिली. (व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

गणपती हा सर्वच आबालवृद्धांना हवाहवासा वाटतो. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे, त्याचबरोबर बुद्धीची देवताही आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. गणपती म्हटले की, गजमुख, लंबोदर, शूर्पकर्ण, मोदक, मूषक अशा अनेक गोष्टी पटकन लक्षात येतात. मूषक आणि गणपतीच्या अनेक कथाही आपण ऐकल्या, वाचल्या आणि पाहिल्या आहेत. या गोष्टींमागे अनेक कारणे आहेत. मूषक दिसला की, अनेकांना ते आवडत नाही. मात्र महाकाय गणपतीचे वाहन म्हणून मूषकाची निवड कशी झाली? यामागे नेमके काय कारण सांगितले जाते? याविषयीच्या कथाही आवर्जून ऐकल्या, वाचल्या, सांगितल्या जातात.
गणपतीचे वाहन म्हणून मूषक प्रसिद्ध आहे. खरे म्हणजे उंदराप्रमाणे मोर हेदेखील गणपतीचे वाहन आहे. पण गणपतीच्या मूर्तीपाशी जशी मूषकाची लहानशी मूर्ती ठेवली जाते किंबहुना तशी ती ठेवली जाणे, अत्यावश्यक मानले जाते, तसेच मोराच्या बाबतीत होत नाही. मोर हे गणेशाचे वाहन आहे हे लक्षात घेऊन गणपतीला मोरेश्वर, मयूरेश्वर अशी विविध नावेही दिलेली आढळतात. तरीही गणपतीचे मूषक हेच वाहन अधिक प्रसिद्ध आहे. आता एवढासा मूषक त्याच्यावर महाकाय देहाचा लंबोदर गणपती स्वार होणार कसा आणि स्वार झाला तरी गणपतीला पाठीवर घेऊन मूषक धावणार तरी कसा, असा प्रश्न सर्वांसमोर असतो. मात्र मूषक गणपतीचे वाहन कसे झाले, याबद्दल एक कथाही आढळून येते. त्यापैकी एक कथा अशी की, क्रौंच नावाचा एक गंधर्व इंद्रसभेत उपस्थित असताना चुकून त्याचा पाय वामदेवाला लागला. रागावलेल्या वामदेवाने तू मूषक होशील, असा त्याला शाप दिला. त्या शापाप्रमाणे क्रौंच गंधर्व मूषक झाला आणि त्याच रूपात थेट पराशरमुनींच्या आश्रमात दाखल झाला. त्याने आश्रमात जेवढे काही खाण्यासारखे होते, ते सर्व खाऊन टाकले, जे खाण्यासारखे नव्हते ते कुरतडून टाकले. त्याचा हा धुडगूस असह्य होऊन पराशरमुनींनी त्यापासून मुक्तता करावी, अशी श्रीगणेशाला प्रार्थना केली.

पराशरमुनींची प्रार्थना ऐकून गणराय तेथे प्रकट झाले आणि त्यांनी आपला पाश मूषकावर टाकला. त्यामधून मूषकाची सुटका झाली नाही. मूषक तेवढ्यापुरता गणपतीला शरण आला. प्रसन्न झालेल्या गणपतीने उंदराला वर मागण्यास सांगितले. मात्र मूषक गर्वाने आंधळा झाला होता. त्याने उलट गणपतीलाच सांगितले की, तुला काय हवे असेल तर मला सांग, मी तुझ्यापाशी वर मागणार नाही. उंदराचे हे बोलणे ऐकून गणेशाने मुत्सद्दीपणाने मूषकाला सांगितले की, मी तुझ्याकडे वर मागतो. तू आजपासून माझे वाहन हो. मूषकाला आपल्या गर्विष्ठपणाचा पश्चात्ताप झाला. पण त्याचा उपयोग झाला नाही. गणपतीचे वाहन होण्याशिवाय मूषकाला गत्यंतर उरले नाही. गणपतीच्या प्रचंड देहाचे ओझे पाठीवर बाळगत त्याला सर्वत्र वावरावे लागले.

असा हा मूषक शेतीचा नाश करणारा आहे. गणपती हा शेतकऱ्यांचा देव मानला जात असल्यामुळे त्याने मूषकाला आपल्या अंकित करून घेतले आहे, असेही एक मत सांगितले जाते. गणपती हा शेतकऱ्यांचा देव आहे, याचे स्पष्टीकरण देताना गणपतीचे शूर्पकर्ण म्हणजे सुपासारखे कान ही शेतकऱ्याची दोन सुपे आहेत आणि गणपतीची सोंड ही भाताच्या लोंब्यांसारखी आहे, असे मानले जाते. गणपती हे सूर्याचेही एक रूप असून, तो दिवसाचा सूर्य म्हणून रात्रीवर आरूढ झाला आहे आणि मूषक हा रात्री सर्वत्र संचार करीत असल्यामुळे रात्ररूपी उंदरावर गणेशरूपी सूर्य आरूढ झाला, असाही एक मतप्रवाह आहे.

मूषक थोड्याच कालावधीत फार मोठ्या संख्येने वाढू शकतो. मूषकाच्या जातीची वाढ फार झपाट्याने होते. ज्याप्रमाणे दूर्वेसारखी खूप वाढणारी वनस्पती गणपतीने आपली मानली. तसेच झपाट्याने संख्या वाढविणाऱ्या मूषकाला त्याने आपले वाहन केले, असेही सांगितले जाते. मूषक प्रत्येक गोष्ट कुरतडून पाहतो. तेव्हा ती गोष्ट कामाची आहे वा नाही, ते तपासून पाहतो. समाजात प्रत्येक गोष्टीवर टीका करणाऱ्या अनेक वृत्ती आपणास दिसतात. अशा प्रवृत्तीवर नियंत्रणासाठी मूषक. म्हणजेच विवेकाचा अविवेकावर विजयाचे द्योतक आहे, असे मानले जाते.

….. तर असा हा मूषक गणपतीचे वाहन असल्याने गणपती जेथे असेल, तेथे तो असतोच, असे मानले जाते. इतर दिवशी विनाशकारी उंदराला मारले जात असले, तरी गणेशोत्सवाच्या काळात मात्र त्याला मारले जात नाही. उलट कोकणात गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मूषक पूजन केले जाते. त्याला खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्याने शेताची नासधूस थांबवावी, असाच उद्देश त्यामागे असतो.

असाच एक मूषक गणेशोत्सवाच्या काळात किशोर सावंत (माजळ, ता. लांजा, जि. रत्नागिरी) यांच्या घरी प्रकट झाला. एवढेच नव्हे, तर त्याने गणपतीची पूजा सुरू असताना घरासमोर ठाण मांडले. इतर वेळी माणसाची सावलीही पडू न देणारा उंदीर श्री. सावंत यांच्या घरात आला. पूजा सुरू असताना थांबून राहिला. त्यानंतर त्याला दिलेला नैवेद्याचा प्रसाद त्याने तो सर्वांसमक्ष खाऊन टाकला. इतर वेळी पळ काढणारा उंदीर शांतपणे प्रसाद भक्षण करत आहे, हे पाहून त्या उंदराला दैवी वलय असले पाहिजे. आपण गणपतीची केलेली सेवा उंदराच्या रूपाने त्याच्या चरणी रुजू झाली, अशी श्री. सावंत कुटुंबीयांची भावना झाली.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply