घरच्या घरीच तयार करू आकाशकंदील

यावर्षी दिवाळीला आकाशकंदील आपण आपल्या घरीच तयार करूया का? कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रपणे १-२ दिवस एक-दोन तास काम केले, तरी हे सहज शक्य आहे.

असा उपक्रम राबविण्यासाठी साहित्य कोणते लागेल, तर * बांबूच्या पट्ट्या, * रंगीत कागद * गव्हाची खळ (घरीच करता येते) आणि * दोरा बस्स!

गेली काही वर्षे आम्हाला जमला तसा कधी छोटा कधी मोठा असा आकाशकंदील आम्ही घरीच करत आहोत. यावर्षीही घरीच करण्याचा प्रयत्न आहे. ज्यांना शक्य असेल, त्यांनी अशा प्रकारे एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करू या का?

आपण थोडे वेळेच्या आधी काम सुरू करू या आणि त्याचे फोटो आपल्या परिचित लोकांना शेअर करून प्रेरित करू या.

प्रत्येक तालुक्यात आपल्या प्रयत्नातून किमान पंधरा-वीस जणांनी असा उपक्रम केला, तरी किमान तेवढ्या कुटुुंबांपर्यंत आपण पोहोचल्याचे समाधान आणि आपल्या एवढ्या सर्वांचे एक पाऊल पर्यावरणाकडे निश्चितच पडेल.

माझ्यासारखेच आपल्यापैकी काही जण दरवर्षी कुठल्या ना कुठल्या प्रकारचा कंदील कदाचित घरीच तयार करत असतील. त्याचे काही फोटो एकमेकांना पाठवू या.

अंध, अपंग, कर्णबधिर, दिव्यांग मुलांच्या शाळांमध्ये अशा तऱ्हेचे उपक्रम दरवर्षीच राबविले जातात. त्यातून अर्थार्जनाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचतो. ही मुले पुढच्या आयुष्यात चांगला रोजगार मिळवू शकतात. इतर सर्वसाधारण शाळाही अशा प्रकारचे आवाहन विद्यार्थ्यांना करू शकतील का? त्यायोगे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नक्कीच वाव मिळेल. विद्यार्थ्यांच्या मदतीला त्यांचे आई-वडील, ताई-दादा, काका-काकू, आजी-आजोबा अशी मंडळी येतील आणि कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रितपणे हा उपक्रम करू शकतील. त्यातून एक वेगळाच आनंद मिळेल, तो वेगळाच.

काही जण अशा प्रकारे घरी कंदील करतही असतील पण जे करत नसतील त्यांच्यासाठी कदाचित हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे कंदिलाचा आकार वेडावाकडा होईल. त्यामध्ये काही त्रुटी राहतील, पण आपण स्वतः केल्याचा आनंद त्यांना निश्चितच मिळेल.

  • प्रशांत निजसुरे, दापोली
    (कृषिवरदा)
    (संपर्क : 94040 89329)
    पर्यावरण गतिविधि, उत्तर रत्नागिरी
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply