रत्नागिरी : एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना २४ तासांत कामावर रुजू होण्याची सूचना एसटीच्या प्रशासनाने केली आहे. जे कर्मचारी हजर होणार नाहीत, त्यांची सेवा समाप्त करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
एसटीचे रोजंदारी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यांनी २४ तासांत हजर व्हावे, अशी सूचना गेल्या १६ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व एसटी आगारांमधील सूचना फलकांवर लावण्यात आली होती. विविध प्रसारमाध्यमांद्वारेही कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याच्या घरच्या पत्त्यावर रजिस्टर्ड पोस्टानेही ही सूचना पाठवली होती. तरीही कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत.
अशा सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. हे कर्मचारी २४ तासांत म्हणजे २९ नोव्हेंबर रोजी कामावर हजर झाले नाहीत, तर त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल, असे एसटीच्या रत्नागिरी विभाग नियंत्रकांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.