विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे पुरस्कार देऊन गौरव

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या २०२० सालच्या विविध पुरस्कारांचे वितरण रविवारी (२८ नोव्हेंबर २०२१) राणी लक्ष्मीबाई सभागृहात करण्यात आले. या वेळी पुण्यातील ‘आपलं घर’ या आश्रमाचे संस्थापक विजय फळणीकर, सौ. साधना फळणीकर, अ. भा. कऱ्हाडे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष विजय आंबर्डेकर, सचिव गणेश गुर्जर, अध्यक्ष माधव हिर्लेकर, माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे व्यासपीठावर उपस्थित होते.

संघाचे २०२० सालचे पुरस्कार कोरोना महामारीमुळे देता आले नव्हते. ते रविवारी देण्यात आले. यामध्ये अरुण आठल्ये यांना दर्पण पुरस्कार, कीर्तनभास्कर अनंत तथा नंदकुमार कर्वे यांना आदर्श कीर्तनकार पुरस्कार, सुयोग पाध्ये यांना आदर्श पौरोहित्य पुरस्कार, विनायक वाकणकर यांना उद्योजक पुरस्कार आणि चिपळूणच्या स्वराली उदय तांबे हिला राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार देण्यात आला.

या वेळी विजय फळणीकर यांनी सांगितले, ‘वृद्धाश्रम हा समाजाला मिळालेला शाप आहे. परंतु ज्यांचे कोणीच नाही त्यांच्यासाठी अशी व्यवस्था करावी लागते. आम्ही पैसे कमावण्यासाठी आश्रम काढला नाही. ‘आमचं घर’मध्ये अशा व्यक्तींना मोफत प्रवेश आहे. गेली २१ वर्षे आश्रम चालू असून, पारदर्शी कारभार असल्याने आतापर्यंत ७० कोटी रुपयांचे प्रकल्प यशस्वी झाले आहेत. आता आम्ही हॉस्पिटलचा दुसरा टप्पा सुरू करत आहोत. चांगल्या कामासाठी समाजाचा हात नेहमीच पुढे असतो; पण पारदर्शी कारभार असल्यामुळेच हे शक्य होते.’

याच कार्यक्रमात नेत्रचिकित्सा क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. श्रीधर ठाकूर, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, गणित अध्यापन, शोधनिबंध सादरीकरणाबद्दल डॉ. राजीव सप्रे आणि दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापक कमिटीवर निवड झाल्याबद्दल पद्मश्री आठल्ये यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नॅनो टेक्नॉलॉजीशी संबंधित पेटंट मिळवल्याबद्दल डॉ. अभयराज जोशी यांच्या वतीने आई सौ. ऋचा जोशी यांनी पुरस्कार स्वीकारला. सन्मानचिन्ह, रोख रक्कम आणि पुस्तक भेट असे या पुरस्कारांचे स्वरूप होते.

अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी प्रास्ताविकामध्ये कऱ्हाडे ब्राह्मण संघाने कोरोना महामारीच्या काळात राबवलेल्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती सांगितली. संघाला 92 वर्षे पूर्ण झाली असून, शताब्दी वर्षाकडे यशस्वी वाटचाल करत असल्याचे सांगितले. सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी सूत्रसंचालन केले.

श्री. आंबर्डेकर म्हणाले, ‘रत्नागिरी ही रत्नांची खाण आहे. संघ दरवर्षी अशा रत्नांना शोधून कौतुकाची थाप देत आहे. महासंघही कार्य करत आहे. कऱ्हाडे ज्ञातीबद्दल अभिमान वाटतो आणि यापुढेही असेच कार्य आम्ही चालू ठेवणार आहोत.’

पुरस्कारप्राप्त व्यक्तींची भाषणे झाली. सर्व सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त करताना कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे आभार मानले. पुरस्काराने जबाबदारी वाढली आहे, तसेच कोणतेही अर्ज न मागवता माहिती घेऊन पुरस्कार दिले जातात, ही पद्धत खूपच चांगली असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली. श्री. व सौ. फळणीकर यांचा सविस्तर परिचय करून देताना पुण्यातील आश्रमाला सर्वांनी जरूर भेट द्यावी, असे आवाहन डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी केले.

‘आपलं घर’साठी भरघोस देणग्या
या वेळी ‘आपलं घर’साठी फळणीकर दाम्पत्याला रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ, के. जी. एन. सरस्वती फाउंडेशन यांच्यासह ज्ञातिबांधवांनी भरघोस देणग्या दिल्या. तसेच संघातर्फे फळणीकर दाम्पत्याचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सन्मापत्रासाठी साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी ‘आपलं घर’वर कविता रचली होती. संघातर्फे आश्रमात लावण्यासाठी सुरंगी आणि अन्य झाडांची रोपेही अध्यक्ष हिर्लेकर यांनी दिली. याप्रसंगी संघासाठी देणगी देणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.

फोटोची ओळ : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘आपलं घर’चे विजय फळणीकर व साधना फळणीकर यांचा सत्कार करताना माधव हिर्लेकर आणि विजय आंबर्डेकर. सोबत सर्व सत्कारमूर्ती आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी. (छायाचित्र : माऊली फोटो, रत्नागिरी)

सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या कार्याची ओळख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply