परिचय रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या गौरवमूर्तींचा

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या २०२० सालच्या विविध पुरस्कारांचे वितरण आज (दि. २८ नोव्हेंबर) करण्यात येणार आहे. या गौरवमूर्तींचा परिचय थोडक्यात येथे दिला आहे.

आज, रविवारी, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमाला डोणजे (पुणे) येथील आपलं घर या संस्थेचे संस्थापक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते विजय फळणीकर आणि अ. भा. कऱ्हाडे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष विजय आंबर्डेकर तसेच सचिव गणेश गुर्जर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षीचे म्हणजे २०२० सालचे पुरस्कार करोना महामारी आणि लॉकडाउनमुळे देता आले नव्हते. त्यामुळे ते आज वितरित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये अरुण आठल्ये यांना दर्पण पुरस्कार, कीर्तनभास्कर अनंत तथा नंदकुमार कर्वे यांना आदर्श कीर्तनकार पुरस्कार, सुयोग मोहन पाध्ये यांना आदर्श पौरोहित्य पुरस्कार, विनायक केशव वाकणकर यांना उद्योजक पुरस्कार आणि चिपळूणच्या स्वराली उदय तांबे हिला राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय फळणीकर हे महाराष्ट्राला सुपरिचित व्यक्तिमत्त्व आहे. पुण्यातील वारजे येथे ते अनाथ विद्यार्थीगृह चालवतात. मुलाच्या निधनानंतर त्यांनी या धक्क्यातून सावरण्यासाठी ट्रस्ट स्थापन करून आश्रम सुरू केला. आईवडिलांचे छत्र हरवलेल्या मुलामुलींना जात, पात, धर्म वगैरेचा भेदभाव न करता तेथे सामावून घेतले जाते. त्यांना शिक्षणाबरोबरच राहणे, जेवण, कपडे, औषधोपचार वगैरे सर्व सुविधा मोफत पुरवल्या जातात. या संस्थेत मुलामुलींसाठी तांत्रिक शिक्षणाचीदेखील सोय केली आहे, जेणेकरून ती पुढे स्वत:च्या पायावर उभी राहू शकतील. फाइल बनवणे, शिवण काम, पेपर बॅग बनवणे, संगणक प्रशिक्षण, मुद्रण प्रशिक्षण यासारख्या गोष्टींचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. पुण्यातील आयटी क्षेत्रातील काही तरुण-तरुणी संस्थेत संगणक प्रशिक्षण देतात आणि संस्थेच्या कामात आपलेही योगदान करतात.

असे आहेत गौरवमूर्ती

अरुण आठल्ये

दर्पण पुरस्कार : अरुण कृष्णनाथ आठल्ये

श्री. आठल्ये (वय ७२) यांचे प्राथमिक शिक्षण खानू (ता. रत्नागिरी) येथे तर माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले. ते १९६८ ते १९७८ या काळात भारतीय नौदलात होते. १९७१ च्या भारत-पाक युद्धात त्यांचा सक्रिय सहभाग होता. सैन्यातील निवृत्तीनंतर त्यांनी १९८२ ते १९८४ या काळात इराणच्या शिपिंक कंपनीत इलेक्ट्रिकल ऑफिसर म्हणून काम केले. त्यानंतर १९९० ते १९९५ या काळात त्यांनी खानू गावाचे सरपंच भूषविले. याच दरम्यान १९८७ पासून त्यांनी पत्रकारिता सुरू केली. आजही ते या क्षेत्रात सक्रिय आहेत. यापूर्वी संकल्प कला मंच, कुमार शेट्ये मित्रमंडळ, राज्य सैनिक कल्याण विभाग, राजरत्न प्रतिष्ठान, कीर्तनसंध्या परिवार इत्यादी संस्थांतर्फे त्यांना गौरविण्यात आले आहे.

आदर्श पौरोहित्य पुरस्कार : वेदमूर्ती सुयोग मोहन पाध्ये (डोंबिवली)

श्री. पाध्ये यांचे शालेय शिक्षण देवरूख येथे झाले. तेथेच १९८८ साली देवरूखमधील न्यू इंग्लिश स्कूलमधून ते दहावी उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी राजापूर संस्कृत पाठशाळेतून वेदमूर्ती गणेश दत्तात्रय खेर यांच्याकडे १९८८-१९९२ या काळात याज्ञिकीचे अध्ययन केले. त्यानंतर देवरूख येथे ६ महिने वेदमूर्ती गणेश फाटक यांच्याकडे सप्तशती मंत्रसंहिता आदी अध्ययन केले. वेदमूर्ती गजानन फाटक यांच्याकडे षोडशसंस्कार, अंत्येष्टी, कुंडार्क असे अध्ययन केले. वेदमूर्ती चंद्रकांत नामजोशी, वेदमूर्ती प्रकाश साधले, वेदमूर्ती सुनील भाटवडेकर, वेदमूर्ती अनंत बांधेकर, वेदमूर्ती हरिहर खांडेश्वर, वेदमूर्ती बाळकृष्ण थिटे हे त्यांचे याज्ञिक मार्गदर्शक गुरू होत. याशिवाय त्यांनी विविध हस्तलिखितांचे संकलन, विविध जुन्या ग्रंथांचे संकलन आणि प्रकाशन तसेच विविध संग़्रहांचे किमान प्रत्येकी ५००० प्रतींचे वितरण केले. वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्या अधिपत्याखाली शृंगेरी पीठामार्फत झालेल्या अतिरुद्रांपैकी ८ अतिरुद्रांमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले. रत्नागिरीत कुंडमंडपात नवकुंडात्मक नवग्रह यज्ञ, विविध ठिकाणी विविध प्रकाराने किमान ५०/६० प्रतिष्ठा विधान प्रकाशित केले. प्रयोग सूची, विविध सार्थ ग्रंथ उपलब्ध करून त्याच्या प्रती ते गरजूंना देतात. जोधपूर येथे २०१८ आणि कलकत्ता येथे २०२० मध्ये प्रतिष्ठा प्रयोगात ते सहभागी झाले होते. पंचांगकर्ते मोहन दाते यांच्या कालसुसंगत आचारधर्म पुस्तकाच्या लेखनात त्यांचा सहभाग आहे. त्यासंदर्भात विविध ठिकाणी सभेत उपस्थित असतात तसेच निर्णय प्रक्रियेत सहभागी होता.

आदर्श कीर्तनकार पुरस्कार : हभप अनंत गणेश तथा नंदकुमार कर्वे

जन्म १३ ऑक्टोबर १९५४ पनवेल. प्राथमिक शिक्षण खारघर तर उच्च माध्यमिक शिक्षण पनवेल येथे. वडील भजनी कलावंत असल्याने संगीताचा वारसा आपोआपच चालून आला. त्यांनी १९७५ पासून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात भाग घ्यायला सुरुवात केली. १९८० मध्ये अ. भा. गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद (हार्मोनियम वादन) आणि २००० मध्ये संगीत अलंकार (गायन) ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. १९८० पासून रसायनी (रायगड) येथील एच. ओ. सी. स्कूलमध्ये संगीत शिक्षक सेवा बजावली आणि एप्रिल २०११ मध्ये स्वच्छानिवृत्ती घेतली. राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धांमध्ये प्रत्यक्ष भूमिका आणि संगीत संयोजन असा दुहेरी सहभाग. अनेक ऑ़डिओ कॅसेट्ससाठी संगीतकार, संगीत मार्गदर्शक आणि हार्मोनियमवादक म्हणून सहभाग घेतला. पनवेल कल्चरल सेंटर या सांस्कृतिक कार्य संस्थेचे माजी अध्यक्ष आणि संस्थेच्या विद्यालयाचे माजी प्राचार्यपद त्यांनी भूषविले. आवड म्हणून त्यांनी १९८४ पासून कीर्तन सेवेला प्रारंभ केला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा तसेच कर्नाटकात त्यांची कीर्तने होत असतात. त्यांना आतापर्यत विविध सन्मान मिळाले आहेत. त्यात १९९९ साली करवीर पीठाच्या पूज्य शंकराचार्यांच्या हस्ते सन्मानपत्र प्राप्त झाले. कीर्तनाच्या माध्यमातून केलेल्या समाजसेवेबद्दल आशाकिरण मानव सेवा पुरस्कार मिळाला आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये उज्जैन येथील कीर्तन महोत्सवात ‘कीर्तनरत्न’ ही उपाधी प्राप्त झाली. ऑगस्ट २०१५ मध्ये पूर्णवादवर्धिष्णु विष्णू महाराज पारनेरकर यांच्या हस्ते पूर्णवादी कीर्तनकार हा पुरस्कार मिळाला. ऑक्टोबर २०१७ मध्ये कीर्तन केसरी कै. नागनाथ जोशी चर्‍होलीकर स्मृती पुरस्कार आणि कीर्तन भूषण पदवी पुणे येथे प्रदान करण्यात आली. जानेवारी २०१९ जालना येथे श्रृंगेरी पीठाधिश विधुशेखरभारतीतीर्थ स्वामी महाराजांच्या हस्ते कीर्तन भूषण पुरस्कार मिळाला. जानेवारी २०२० मध्ये पुण्याच्या श्री हरिकीर्तनोत्तेजक सभेतर्फे ‘कीर्तन भास्कर’ पदवी सन्मानपूर्वक देण्यात आली.

उद्योजक पुरस्कार : विनायक केशव वाकणकर

केळ्ये, ता. रत्नागिरी. जन्म २२ नोव्हेंबर १९६४.
शिक्षण बी. ए., त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून मोटर मेकॅनिक पदविका घेतील. त्याशिवाय N.C.T.V.T.S.T. वर्कशॉप, औरंगाबाद विद्यापीठाच्या फळप्रक्रिया प्रशिक्षण वर्ग दोन वेळा पूर्ण. १९८९ ते १९९९ एस.टी. महामंडळामध्ये मेकॅनिक म्हणून नोकरी केली. १९९० पासून अमृत कोकम निर्मितीच्या व्यवसायाला घरगुती स्वरूपात सुरुवात केली. अन्न आणि औषध प्रशासनाचा परवाना घेऊन १९९३ साली मार्केटमध्ये विक्रीला सुरुवात केली. त्याकरिता लागणारे ८०० चौ. फूट बांधकाम एसटी को-ऑप. बॅंकेकडून कर्ज घेऊन केले. पहिली ५ वर्षे एसटी वर्कशॉपमधील सुमारे ४५० कामगार हेच ग्राहक होते. त्यांनीच प्रोत्साहन दिले. व्यवसायात जम बसल्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ व्यवसाय सुरू केला. २००३ पर्यंत अमृत कोकम हे एकच उत्पादन ‘शितल’ या नावाने तयार केले जात होते. सुमारे १२ वर्षांमध्ये उत्पादनाचे नाव झाले. त्यानंतर उत्पादन क्षमता वाढविली आणि २००३ पासून आलेलिंबू मिश्रित आवळा सरबत हा नवीन प्रकार प्रथमच बाजारात आणला. ते सरबत लोकांना आवडले. सुरवातीला मिळालेल्या सूचनांचा विचार करून उत्पादनात आवश्यक ते बदल केले आणि ४-५ वर्षांत सरबत लोकप्रिय झाले. त्यानंतर अननस, संत्री, कैरी पन्हे, लिंबू इत्यादी प्रकारच्या सरबतांचे उत्पादन सुरू केले. ही सर्व उत्पादने उन्हाळी विक्रीची असायची. त्यामुळे पावसाळा आणि हिवाळ्यात काम नसे. यावेळी सौ. ममता वाकणकर यांनी गोड लिंबू लोणचे, आंबा, मिरची, मोरावळा अशी उत्पादने सुरू केली. दिवाळीसाठी चकली, कडबोळी, चिवडा, लाडू वगैरे प्रकार चालू केले. श्री. आणि सौ. वाकणकर यांनी फळप्रक्रिया आणि साठवणीविषयीचे प्रशिक्षण एकाच वेळी पूर्ण केले असल्याने त्याचा फायदा झाला आणि २०१४ पासून मॅंगो पल्प पॅकिंग सुरू केले. सन २०१३ साली १४५० चौ. फूट व्यवसायासाठी स्वतंत्र इमारत बांधली. आवश्यक अद्ययावत यंत्रसामग्री घेतली. हा खर्च बचतीच्या रकमेतून केला, हे विशेष. आता ज्येष्ठ चिरंजीव उपेंद्र मार्केटिंग आणि इतर आर्थिक व्यवहार सांभाळतो, तर द्वितीय चिरंजीव शुभम कॉलेज सांभाळून मदत करतो. दापोलीच्या कुणबी सेवा संघाकडून सन २०१९-२० चा ‘उत्कृष्ट कृषी उद्योजक’ सेवाव्रती शिंदे गुरुजी स्मृती पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते मिळाला. रोख पाच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार : कु. स्वराली उदय तांबे

योगपटू स्वराली तांबे सध्या चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये आठवीत शिकत आहे. चिपळूण येथील पाग व्यायामशाळेत दुसरीपासून प्रशिक्षक रणवीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सराव सुरू केला. जुलै २०१६ मध्ये मुंबई महापौर चषक योगासन स्पर्धेत १० वर्षांखालील गटात सुवर्ण पदक, सप्टेंबर २०१७ रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय फेडरेशन योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक, राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड, ऑक्टोबर २०१७ मध्ये मोर्शी (अमरावती) येथे राज्यस्तरीय फेडरेशन योगासन स्पर्धेत सुवर्णपदक, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड, त्याच महिन्यात गाझियाबाद (दिल्ली) येथील राष्ट्रीय फेडरेशन योगासन स्पर्धेत सहभागी, जुलै २०१८ रत्नागिरी ब्राह्मण सेवा संघ आयोजित लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त आयोजित जिल्हा स्तरावरील योगासन स्पर्धेत सुवर्णपदक, ऑगस्ट २०१८मध्ये दादरच्या शारदाश्रमात मुंबई महापौर चषक योगासन स्पर्धेत ११ वर्ष गटात सुवर्ण पदक, जुलै २०१८ मंध्ये खेड येथील जिल्हास्तरीय फेडरेशन योगासन स्पर्धेत सुवर्णपदक, राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड, सप्टेंबर २०१८ शिर्डी (कोकमठाण) येथे राज्यस्तरीय फेडरेशन योगासन स्पर्धेत ११ वर्षे वयोगटात सुवर्ण पदक, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड, नोव्हेंबर २०१८ मध्ये पतियाळा (पंजाब) येथे राष्ट्रीय फेडरेशन योगासन स्पर्धेत सहभागी, ऑगस्ट २०१९ रत्नागिरीतील जिल्हा स्तरावरील फेडरेशन योगासन स्पर्धेत १२ वर्षे वयोगटातील स्पर्धेत सुवर्णपदक, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड, सप्टेंबर २०१९ मध्ये शिर्डी (कोकमठाण) येथे राज्यस्तरीय फेडरेशन योग स्पर्धेत सुवर्णपदक, डिसेंबर २०१९ मध्ये लखनौमध्ये झालेल्या राष्ट्रीय फेडरेशन योगासन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड, सप्टेंबर २०१९ रत्नागिरीत शालेय जिल्हा स्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक, ऑक्टोबर २०१९ कण्हेरी मठ (कोल्हापूर) येथील शालेय योगासन स्पर्धेत पाचवा आणि ऱ्हिदमिक योग प्रकारात प्रथम, राज्य स्तरीय स्पर्धेसाठी पात्र, ऑक्टोबर २०१९ मध्ये संगमनेर येथील शालेय राज्य स्तरीय योगासन स्पर्धेत सहावा क्रमांक, ऱ्हिदमिक योग प्रकारात रौप्य पदक, २०२० साली ३९ व्या राज्यस्तरीय फेडरेशन योगासन स्पर्धेत (आॅनलाइन) १४ वर्षांखालील गटात प्रथम, राष्ट्रीय फेडरेशन योगासन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड अशा अनेक पदकांची कमाई स्वराली तांबे हिने केली आहे. या कामगिरीबद्त्यादल चिपळूण नगरपालिका, ब्राह्मण सहाय्यक संघ, दापोली ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्था, चिपळूण ज्येष्ठ नागरिक संघ इत्यादी संस्थांनी तिचा आतापर्यंत गौरव केला आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे स्वरालीची मोठी बहीण कु. आर्या तांबे हिला २०१८ चा रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

विशेष पुरस्कार

याच कार्यक्रमात डॉ. श्रीधर ठाकूर, डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. अभयराज जोशी आणि पद्मश्री आठल्ये यांना विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय.

डॉ. श्रीधर ठाकूर

महाराष्ट्रातील सर्वांत मोठी नेत्रचिकित्सा आणि उपचारांच्या हॉस्पिटल साखळी निर्माण करणारे डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई आपल्या वैद्यकीय ज्ञानाप्रमाणेच त्यांच्या सर्वसमावेशक प्रतिभेसाठीही परिचित आहेत. वैद्यकीय व्यवसाय करतानाच हॉस्पिटल मॅनेजमेंटसारख्या विषयात अभ्यास करून त्यांनी स्वतःचे करियर अत्यंत वेगळ्या वळणावर नेले. कोणत्याही स्टार विद्यापीठात शिक्षण वगैरे घेता केवळ मेहनतीच्या जोरावर वयाच्या ३२ व्या वर्षी हे स्वप्न त्यांनी साध्य केले. विविध शहरांत काम करत असताना स्थानिक पारंपरिक गोष्टींशी जुळवून घेत रुग्णांच्या सोयीचा आणि भल्याचा विचार करत आपले हॉस्पिटल मॅनेजमेंटचे ज्ञान पणाला लावून त्यांनी काम केले. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचीस्थापना करताना देशभरातून इक्विटी फंडातून पैसे उभे केले आणि आजपर्यंत १५ हॉस्पिटल्स महाराष्ट्राच्या विविध भागांत कार्यरत आहेत. रुग्णाला उपचार देण्याआधी त्याला त्याच्या आजाराचो, त्याला मिळणार्‍या उपचारांचे ज्ञान देणे, माहिती करून देणे यावर त्यांचा भर असतो. यापेक्षा अगदी वेगळा आणि उल्लेखनीय उपक्रम म्हणजे त्यांनी भांबेड (ता. लांजा) येथे १० एकर जागेत ७०० हून अधिक झाडे जोपासली आहेत. त्यात फणसाच्या १० जाती आहेत. त्याविषयी त्यांच अफाट ज्ञान आश्चर्य चकित करते.

डॉ. सुशीलकुमार वसंत मुळ्ये

आईवडिलांकडून मिळालेला वैद्यकीय वसा घेऊन डॉ. सुशीलकुमार वसंत मुळ्ये यांनी १९९४ पासून वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. संगमेश्वर, लांजा आणि रत्नागिरी येथे ते सेवा देतात. रत्नागिरीत त्यांनी अपेक्स मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू केले. नाचणे येथे प्रशस्त जागेत हे रुग्णालय आहे. करोनाच्या काळात करोना रुग्णालय म्हणून काम करू लागले. वर्षभरात एक हजारपेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. डॉ. मुळ्ये यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातील एखादा खेळाडू खेळताना जखमी झाला तर तो पूर्णपणे बरा होईपर्यंत ते मोफत उपचार करतात. या उपक्रमाची सुरुवात त्यांनी २००७ मध्ये केली. आतापर्यंत त्यांनी २०० खेळाडूंवर मोफत उपचार केले आहेत. आमदार अशोक मोडक यांच्या सांगण्यानुसार लांजा येथे पंडित दीनदयाळ हॉस्पिटल सुरू केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तेथे सर्वसामान्यांना दिला जातो.

डॉ. राजीव गजानन सप्रे
डॉ. सप्रे यांनी दीर्घकाळ गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले. गणिताचे अध्यापन करतानाच विद्यार्थ्यांना गणिताची उपयुक्तता पाहण्याची नवी दृष्टी दिली. गणिताशी संबंधित विविध शोधनिबंध त्यांनी सादर केले.

डॉ. अभयराज श्रीकृष्ण जोशी
डॉ. अभयराज जोशी (सध्या वास्तव्य डेन्मार्क) यांच्या पेटंटला भारत सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाने (Intellectual Property and Patent Office, Government of India) मान्यता दिली आहे. आयआयटी (कानपूर) येथून पीएचडी करत असताना नॅनोटेक्नॉलॉजीशी संबंधित नवी मेथड शोधून काढली आणि त्या मेथडचे पेटंट त्याला मिळाले आहे. यापूर्वी अमेरिकेत झालेल्या Gorden Research Conference (GRC) मध्ये त्याने भारताचे आणि आय आय टी चे प्रतिनिधित्व केले होते. बौद्धिक संपदा विभागात सादर केलेल्या या पेटंटमुळे अनेक अभ्यासकांना त्यांच्या संशोधनासाठी उपयोग होणार आहे.

सौ. पद्मश्री श्रीहरी आठल्ये
पूर्वाश्रमीच्या पद्मश्री दत्तात्रय मुळ्ये आणि विवाहानंतरच्सौया . आठल्ये यांची रत्नागिरीच्या दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापक कमिटीवर निवड झाली आहे. बीएस्सी, बीएड झाल्यानंतर त्यांनी फाटक प्रशालेत २३ वर्षे अध्यापन केले. त्यापूर्वी जीजीपीएसमध्येही त्या गणित आणि विज्ञान विषय शिकवत असत. दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो. गेल्या ऑक्टोबरमध्ये त्यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply