उपाय पुरेसे नसल्याचे चिपळूण बचाव समितीचे मत
रत्नागिरी : चिपळूणमधील वाशिष्ठी नदीतील गाळ तीन टप्प्यांत काढण्याचा निर्णय आज मुंबईत झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला. मात्र बैठकीत सुचविण्यात आलेले उपाय आणि करण्यात आलेली निधीची तरतूद पुरेशी नाही, असे मत चिपळूण बचाव समितीतर्फे व्यक्त करण्यात आले.
कोकणातील नदीकाठच्या शहरातील पूरस्थितीसंबंधात उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात आज विशेष बैठक पार पडली. त्यावेळी श्री. पवार म्हणाले, कोकणातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्यामुळे त्यांची वहनक्षमता कमी झाली आहे. अतिवृष्टीमुळे होणाऱ्या पूरस्थितीचा फटका नदीकाठावरील गावांना, शहरांतील नागरी वस्त्यांना वारंवार बसत आहे. नदीकाठच्या शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महाड, चिपळूण, संगमेश्वरसह कोकण विभागात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे नदीकाठच्या शहरांचे, गावांचे दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यासाठी कोकणातील नदीपात्रातील गाळ, बेटे काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात यावेत. कामासाठी आवश्यक निधी जलसंपदा विभागाला तातडीने वर्ग केला जाईल.
चिपळूण शहराला असणारा पुराचा धोका टाळण्यासाठी वाशिष्ठी नदीतील गाळ, बेटे काढण्याचे काम तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. हे काम वेगाने आणि सुनियोजित पद्धतीने होण्यासाठी एकाच वेळी अनेक ठिकाणी कामांना सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या कामासाठी आवश्यक असणारा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे काम वेगाने पूर्ण होण्यासाठी जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागात आवश्यक अत्याधुनिक यंत्रसामग्रीची खरेदी करण्यात येणार आहे. नदीतील गाळ आणि त्यामुळे तयार झालेली बेटे काढल्यानंतर नदीची वहनक्षमता वाढणार असून नदीकाठच्या गावांचा, शहरांचा पुराचा धोका कमी होणार आहे.
बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार शेखर निकम, चिपळूण बचाव समितीचे प्रतिनिधी राजेश वाजे, शाहनवाज शाह आदी मान्यवरांसह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.
उपाय पुरेसे नाहीत
दरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी वाशिष्ठी मधील गाळ काढण्यासाठी केलेल्या गोळी विषयी चिपळूण बचाव समितीचे प्रमुख पत्रकार सतीश कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की उपमुख्यमंत्र्यांनी सुचविलेले उपाय पुरेसे नाहीत आर्थिक तरतूदही केवळ दहा कोटीची करण्यात आली आहे वाशिष्ठी मधील गाळ काढण्यासाठी किमान 160 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे त्याची दखल आजच्या बैठकीत घेण्यात आलेली नाही विविध मंत्री आणि चिपळूण बचाव समितीचे काही सदस्य त्यामध्ये उपस्थित होते पण बैठकीत जाहीर करण्यात आलेली निर्णय समाधानकारक नाहीत अशा स्थितीत आंदोलन सुरू ठेवायचे का याबाबतचा निर्णय चिपळूण बचाव समितीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार आहे असे श्री कदम यांनी सांगितले.
चिपळूणमधील महापुराच्या हाहाकाराची दृश्ये



कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड