रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये येत्या २५ ते ३० डिसेंबर या काळात मधुमेही व्यक्तींसाठी ‘दृष्टी सुरक्षा सप्ताह’ जाहीर करण्यात आला आहे.
डायबेटीस एकदा झाला की कधीच सांभाळून घेत नाही. परंतु सर्वाना त्याच्यापासून सांभाळावे लागते. मधुमेहामुळे शरीरातील हृदय, किडनी, मेंदू व डोळा या अवयवांवर सततच्या वर खाली होणाऱ्या रक्तातील साखरेच्या पातळीमुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होत असतात. त्या अवयवांची मोठ्या प्रमाणात कार्यहानी होते.
डायबेटीस असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदा या चारही अवयवांशी संबंधित तपासणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे या अवयवातील बिघाडाचे किंवा आजारांचे वेळीच निदान होते. त्यामुळे पुढे होणारा वाढीव खर्च आणि हानी टाळता येते.
डोळा हे अत्यंत महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय असून डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेमुळे दृष्टीची सतत हानी होत असते. डोळ्याच्या पडद्याला सूज येणे, पडद्याला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या कमकुवत होऊन रक्तस्राव होणे, प्रसंगी पडद्याला छिद्र पडणे, काही वेळेस अंधत्व येणे असे गंभीर दुष्परिणाम दिसून येतात. मधुमेही व्यक्तींना साखर नियंत्रणात ठेवल्याने आपण सुरक्षित आहे, असे वाटते. मात्र अनेकदा तो चुकीचा आत्मविश्वास असतो. त्यामुळे अशा व्यक्ती डोळ्यांची रेटिना तज्ज्ञांकडून कधीही तपासणी करून घेत नाहीत. काही वर्षे उलटल्यानंतर डोळ्यांच्या पडद्याचे गंभीर आजार लक्षात येऊ लागतात. त्यावरील उपचारांवर भरपूर पैसे खर्च झाल्याने ती व्यक्ती आणि कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागतो.
डोळ्याच्या पडद्याच्या आजारांचे निदान करणाऱ्या त्रिमितीय स्कॅन ग्रीन लेझर, फिल्ड एनालाइजर, बी-स्कॅन यासारख्या अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने डोळ्याच्या पडद्याची स्थिती व समस्येचे निदान अवघ्या दहा मिनटात करता येते. हि सर्व अत्याधुनिक यंत्रणा कोकणच्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटल या एकाच ठइकाणी उपलब्ध आहे. याच बरोबर डोळ्यांच्या पडद्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या कठीण शस्त्रक्रिया येथे केल्या जातात.
त्यासाठीच २५ ते ३० डिसेंबर हा सप्ताह मधुमेही व्यक्तींसाठी इन्फिगोमध्ये ‘दृष्टी सुरक्षा सप्ताह’ म्हणून पाळला जाणार आहे. २०२१ हे वर्ष संपताना प्रत्येक मधुमेही व्यक्तीने या सात दिवसांच्या काळामध्ये आपल्या डोळ्याच्या पडद्याची तपासणी करून आणि आवश्यकता असल्यास त्यावर उपचार करून आपली दृष्टी सुरक्षित ठेवावी आणि नवीन वर्षाच्या स्वागताला आत्मविश्वासाने सामोरे जावे, हा उद्देश यामागे आहे. या सात दिवसांमध्ये चेन्नईतील शंकर नेत्रालयातून प्रशिक्षित प्रख्यात रेटिना सर्जन डॉ. प्रसाद कामत मधुमेही व्यक्तींच्या डोळ्यांच्या पडद्याची तपासणी अत्याधुनिक निदान यंत्रणांच्या साहाय्याने करणार आहेत. तसेच २६ व २७ डिसेंबर रोजी इन्फिगोमध्ये निवडक व अत्यंत अवघड अशा डोळ्याच्या पडद्याच्या १४ शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
या सात दिवसांच्या कालावधीत डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी ९३७२७६६५०४ या क्रमांकावर फोन करून आपल्या पडद्याच्या तपासणीसाठी पूर्वनोंदणी करावी, असे आवाहन इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.
