आता लतादीदींची अक्षरभेट हेच संचित

पत्रसंग्रहाचा माझा छंद २००६ साली सुरू झाला. संदेश पत्रसंग्रहाच्या या उपक्रमात मध्यंतरीच्या काळात खंड पडला. सुमारे ७५० संदेश पत्रे या संग्रहात त्यावेळी होती. आज त्यातील पत्रांची संख्या १७०० पेक्षा जास्त झालेली आहे. पण खऱ्या अर्थाने संदेश पत्र संग्रहाला लतादीदींच्या एका पत्राने ऊर्जितावस्था आली आणि संग्रहाने पुन्हा एकदा नव्याने भरारी घेतली.

काही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी निमित्त लागते. २००६ सालीही ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्या पहिल्या पत्रापासून माझ्या विविध क्षेत्रातील संदेश पत्रांच्या संग्रहाला सुरुवात झाली. त्यानंतर मजल दरमजल करत या संग्रहाची घोडदौड सुरूच होती. इतर कामातून वेळ काढत या संग्रहाची वाटचाल सुरू झाली. तळेऱ्यासारख्या ग्रामीण भागात राहून देश आणि परदेशातील व्यक्तींशी पोस्टाच्या माध्यमातून मी संपर्क साधून संदेश पत्रे मिळवू लागलो.

मात्र २०१० पासून या संग्रहात खंड पडला. इतर कामांमुळे या संग्रहाकडे दुर्लक्ष झाले. सुमारे ४ वर्षे कोणतेही पत्र या संग्रहात दाखल झाले नाही.

पुन्हा एकदा २०१४ साली काही मान्यवर व्यक्तींना पत्रे लिहिली. त्यामध्ये लता मंगेशकर यांचाही समावेश होता. विशेष असे की, त्या पत्राला लतादीदींनी उत्तर दिले. साक्षात मला प्रभुकुंजवरून त्यांचे पत्र आले. ते पत्र म्हणजे या संग्रहासाठी बूस्टर डोस ठरला.

खऱ्या अर्थाने ते पत्र म्हणजे सरस्वतीमातेचा आशीर्वादच वाटला आणि त्या पत्राने पुन्हा एकदा उत्साह वाढला. संग्रहाला पुन्हा नव्याने ऊर्जितावस्था मिळाली.

गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी मंगेशकर आणि उषा मंगेशकर अशा दोन्हीही महान गायिकांची पत्रे एकत्र आली. आज या संग्रहात देश आणि परदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील १७०० पेक्षा जास्त व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा समावेश आहे.

याच लखोट्यामधून लता दीदींनी संग्रहासाठी फोटो आणि स्वाक्षरी पाठवली.

मेरी आवाजही पहेचान है असे म्हणत अखेरपर्यंत आपल्या आवाजाची जादू समस्त जगावर केलेल्या लतादीदींचा सुर रविवारी थांबला. खरे तर देशाचीच नव्हे तर संपूर्ण जगाची मोठी हानी झाली आहे. एक युग समाप्त झाले. अर्थात निसर्गाच्या नियमानुसार येणारा तो जाणारच, तरीदेखील दीदींच्या “त्या” पत्राने माझ्या अक्षरोत्सव अर्थात संदेश पत्रसंग्रहाचा पुनर्जन्म झाला. आठवण खूपच छान मात्र निमित्त आजचे क्लेशकारक ठरले आहे. अक्षय्य सुरांची अजरामर गीते देणारा गळा आणि त्यांचे शब्द हरपले असले, तरी त्यांची ती अक्षरभेट हेच माझ्या संदेश पत्रसंग्रहाचे संचित आहे.

“अक्षरोत्सव” परिवाराकडून दीदींना विनम्र आदरांजली…

  • निकेत पावसकर, 
    “अक्षरोत्सव” संदेश पत्र संग्राहक 
    तळेरे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग
    संपर्क – 9860927199, 9403120156

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply