मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर आज, रविवारी (६ फेब्रुवारी) सायंकाळी ७ वाजता पंचत्वात विलीन झाल्या.
आज सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी लता मंगेशकर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
निधनानंतर प्रभूकुंज या त्यांच्या निवासस्थानी दुपारी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर तेथून अंत्ययात्रा निघाली. ती दादर येथील शिवाजी उद्यानात पोहोचली. पार्कमध्ये आणले गेले. त्यापूर्वी पोलिसांनी लतादीदींना मानवंदना दिली.
लतादीदींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गर्दी जमली होती. पेडर रोड, हाजी अली, वरळी नाका, प्रभादेवी, सिद्धिविनायक मंदिर या मार्गे शिवाजी पार्कपर्यंत अंत्ययात्रा पोहोचली. मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता.
अंत्ययात्रेदरम्यान पोलिसांची चोख व्यवस्था होती. लतादीदींच्या पार्थिवाच्या पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूंना पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला. सर्व मंगेशकर कुटुंबीय पार्थिवासोबत होते. अंत्ययात्रेला चाहत्यांची गर्दी जमली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर दिग्गज मान्यवर शिवाजी पार्कवर यावेळी उपस्थित होते. लतादीदींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी शिवाजी पार्कवर गर्दी उसळली होती. चाहत्यांनी लतादीदींचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. सर्वसामान्यांसह राजकीय नेते आणि कलाकारही शिवाजी पार्कवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लतादीदींचे अंत्यदर्शन घेतले. पुष्पचक्र वाहिले. त्यानंतर त्यांनी मंगेशकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही लतादीदींना पुष्पचक्र वाहिले. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भारतरत्न सचिन तेंडुलकर, विद्या बालन, आमिर खान, रणबीर कपूर, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, जावेद अख्तर, छगन भुजबळ, दिलीप पळसे पाटील, शाहरूख खान, श्रद्धा कपूर, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पियुष गोयल, अनिल देसाई यांच्यासह अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते.
सायंकाळी सात वाजता शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींचे बंधू संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी अग्नी दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्या पद्धतीने अंत्यसंस्कार झाले, त्याच पद्धतीने लतादीदींनाही अखेरचा निरोप देण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्या गुरुजींनी सतीश घाडगे यांनी अंत्यसंस्कार केले, त्यांनीच लतादीदींवरही अंत्यसंस्कार केले. त्यांच्यासोबत एकूण आठ ब्राह्मण होते. यावेळी भगवद्गीतेमधील बाराव्या अध्यायाचे पठण करण्यात आले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड