भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज, ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतीव शोक व्यक्त करून त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
लतादीदींच्या निधनानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असल्या, तरी त्यांच्या मनात लतादीदींविषयी नेहमीच अपार आदर होता. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात नव्वदाव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी झालेल्या हिंदीतील संवादाचा मराठी अनुवाद असा –
माझ्या प्रिय देशवासीयांनो, नमस्कार. मित्रहो, आज ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये मी देशातील एका महान व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करणार आहे. मी त्यांच्याबद्दल बोलणार आहे. आपणा सर्व भारतीयांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदराची, आपुलकीची भावना आहे. त्यांच्याविषयी आदर वाटत नसेल, असा भारतीय नागरीक शोधूनही सापडणार नाही. त्या वयाने आपल्या सर्वांपेक्षा फार मोठ्या आहेत आणि देशाच्या विविध टप्प्यांच्या, विविध कालखंडांच्या त्या साक्षीदार आहेत. आपण त्यांना ‘दिदी’ म्हणतो, लता दिदी. यावर्षी, 28 सप्टेंबर रोजी त्या 90 वर्षांच्या झाल्या. परदेशी दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी दिदींसोबत दूरध्वनीवरून संवाद साधण्याचे भाग्य मला प्राप्त झाले. एखाद्या लहान भावाने आपल्या मोठ्या बहिणीशी बोलावे, अशा प्रकारचा आमच्यातला हा प्रेमळ संवाद होता. अशा प्रकारच्या वैयक्तिक संभाषणाबद्दल मी खरेतर जाहीरपणे फार बोलत नाही. पण आज मला असे वाटते की, आपणही आमच्यातला हा संवाद ऐकावा. ऐकावे की आयुष्याच्या या वळणावरसुद्धा लतादिदी देशाशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी उत्सुक आहेत, तत्पर आहेत. त्यांच्या आयुष्यातील समाधानाची भावना भारताच्या प्रगतीशी जोडलेली आहे, बदलणाऱ्या भारताशी जोडलेली आहे, प्रगतीची नवी शिखरे सर करणाऱ्या भारताशी जोडलेली आहे.
मोदी जी : लतादीदी नमस्कार. मी नरेंद्र मोदी बोलतो आहे.
लता जी : नमस्कार,
मोदी जी : मी फोन केला कारण यावर्षी तुमच्या वाढदिवशी…
लता जी : हो हो
मोदी जी : मी विमान प्रवासात असेन.
लता जी : अच्छा
मोदी जी : तर मला वाटले की रवाना होण्यापूर्वी
लता जी : हो हो
मोदी जी : तुम्हाला वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा द्याव्यात, असं मला वाटलं.तुमची प्रकृती चांगली राहावी, तुमचा आशीर्वाद कायम आमच्यासोबत राहावा, हीच प्रार्थना आणि तुम्हाला प्रणाम करण्यासाठी मी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वीच फोन केला.
लता जी : तुमचा फोन येणार, हे ऐकल्यावर मला फारच उत्सुकता वाटली. तुम्ही जाऊन केव्हा परत येणार.
मोदी जी : मी २८ तारखेला रात्री उशिरा किंवा २९ तारखेला पहाटे पोहोचेन. तोपर्यंत तुमचा वाढदिवस झालेला असेल.
लता जी : अच्छा, अच्छा. वाढदिवस काय साजरा करायचा. सगळी घरातलीच मंडळी असतील.
मोदी जी : दिदी बघा तर मला
लता जी : तुमचे आशीर्वाद मिळाले तर
मोदी जी : अरे तुमचे आशीर्वाद आम्ही मागतो. तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात.
लता जी : वयाने मोठे तर अनेकजण असतात. पण आपल्या कामामुळे जो मोठा होतो, त्याचे आशीर्वाद मिळणे, ही फार मोठी गोष्ट असते.
मोदी जी : दीदी आपण वयानेही माझ्यापेक्षा मोठ्या आहात आणि कर्तृत्वानेसुद्धा मोठ्या आहात. आणि ही जी सिद्धी आपण प्राप्त केली आहे, ती साधना आणि तपश्चर्येच्या माध्यमातूनच प्राप्त केली आहे.
लता जी : खरे तर मला वाटते की हा माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद आहे आणि श्रोत्यांचा आशीर्वाद आहे. मी खरे तर काहीच नाही.
मोदी जी : दीदी, हा जो तुमच्या स्वभावातला विनम्रपणा आहे, ही आमच्या नव्या पिढीसाठी, आमच्यासाठी फार मोठी शिकवण आहे. आमच्यासाठी फार मोठी प्रेरणा आहे. आयुष्यात इतके सगळे साध्य केल्यानंतरसुद्धा तुम्ही नेहमीच आई-वडिलांचे संस्कार आणि नम्र वागणुकीला प्राधान्य दिलं आहे.
लता जी : हो.
मोदी जी : आणि मला फार आनंद होतो, जेव्हा आपण अभिमानाने सांगता की आपल्या आई गुजराथी होत्या…
लता जी : हो
मोदी जी : आणि मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे आलो
लता जी : हो
मोदी जी : तुम्ही नेहमीच मला गुजराती पदार्थ खायला घातले आहेत.
लता जी : हो. तुम्ही काय आहात, याची तुम्हाला स्वतःला कल्पना नाही. मला माहिती आहे की तुम्ही आल्यानंतर भारताचे चित्र बदलते आहे आणि मला त्यामुळे फार आनंद होतो, फार छान वाटते.
मोदी जी : बस दीदी, तुमचे आशीर्वाद कायम असू द्यात. संपूर्ण देशाला तुमचे आशीर्वाद कायम लाभू देत आणि आमच्यासारखे लोक, ज्यांना काही चांगले करायची इच्छा आहे. मला तुमच्याकडून नेहमीच प्रेरणा मिळत आली आहे. तुमची पत्रेसुद्धा मला मिळत राहतात आणि तुम्ही पाठवलेल्या भेटीसुद्धा मला मिळत राहतात. ही जी आपुलकीची भावना आहे, हे जे कौटुंबिक नाते आहे, त्यातून मला एक विशेष आनंद मिळतो.
लता जी : हो, हो. मी तुम्हाला फार त्रास देऊ इच्छित नाही, कारण मी पाहते आहे, मला कल्पना आहे की तुम्ही किती कामात असता आणि तुम्हाला भरपूर काम असते, किती गोष्टींचा विचार करावा लागतो. जेव्हा तुम्ही जाऊन तुमच्या आईचे आशीर्वाद घेतले, हे मी पाहिले तेव्हा मीसुद्धा कोणाला तरी त्यांच्याकडे पाठवून त्यांचे आशीर्वाद घेतले.
मोदी जी : हो, माझ्या आईच्या लक्षात होते आणि ती मला सांगत होती.
लता जी : हो
मोदी जी : हो
लता जी : हो आणि दूरध्वनीवरून त्यांनी मला आशीर्वाद दिले, त्याचा मला फार आनंद वाटला.
मोदी जी : तुम्ही व्यक्त केलेल्या स्नेहामुळे माझ्या आईला फार आनंद झाला.
लता जी : हो, हो
मोदी जी : तुम्ही नेहमी माझ्याबद्दल काळजी करता, त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा देतो.
लता जी : हो.
मोदी जी : यावेळी मुंबईत आलो तेव्हा प्रत्यक्ष भेट व्हावी, असे वाटत होते.
लता जी : हो हो नक्कीच
मोदी जी : मात्र वेळ आणि काम यांचं प्रमाण इतकं व्यस्त होतं की मला येणं शक्य झालं नाही.
लता जी : हो
मोदी जी : पण मी लवकरच येईन.
लता जी : हो
मोदी जी : आणि घरी येऊन तुमच्या हातचे काही गुजराथी पदार्थ चाखणार आहे.
लता जी : हो हो, नक्की नक्की, हे माझे सौभाग्य असेल.
मोदी जी : नमस्कार, दिदी
लता जी : नमस्कार
मोदी जी : तुम्हाला अनेक शुभेच्छा
लता जी : नमस्कार
मोदी जी : नमस्कार
या संवादासह ‘मन की बात’चा २९ सप्टेंबर २०१९ चा कार्यक्रम ऐकण्यासाठी सोबतच्या लिंकवर जा –
https://youtu.be/XieypZtNLLw
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड