राजापूर : शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे बाळकडू देण्याचे उपक्रम राबविणारे जुवाठी (ता. राजापूर) येथील शिक्षक बी. के. गोंडाळ यांच्या अक्षरमित्र या उपक्रमांची माहिती देण्यासाठी अनेकांनी त्यांना निमंत्रण दिल्याने आपल्या प्रयत्नांना चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया श्री. गोंडाळ यांनी व्यक्त केली.

राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने प्रभानवल्ली येथील माध्यमिक विद्यालयात संघाचे अध्यक्ष सुभाष महादेव लाड यांच्या प्रयत्नातून आणि कुशल नेतृत्वाखाली सातवे ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले होते. ते मोठ्या दिमाखात पार पडले. संमेलनात बी. के. गोंडाळ यांच्या अक्षरमित्र या उपक्रमांचे साहित्य संमेलनात कौतुक करण्यात आले. तेथे खास उभारण्यात आलेल्या कक्षाला मान्यवरांनी भेट दिली. आपल्या अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे तसेच शालेय स्तरावर घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या वह्या, बातम्या, छायाचित्रे यांचा कक्ष श्री. गोंडाळ यांनी उभारला होता. स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन, हस्ताक्षर सुधार उपक्रम, श्यामची आई वाचन परीक्षण उपक्रम, पुस्तक परीक्षण, उत्तम वाचक पुरस्कार, रद्दीतून ग्रंथालय, पुस्तक भेट, व्यवसाय मार्गदर्शन, शुद्धलेखन, गतिमंद मुलांना मार्गदर्शन इत्यादी विविध उपक्रम अक्षरमित्रतर्फे राबविले जातात. त्या साऱ्यांचा परिचय देणारे साहित्य कक्षात मांडण्यात आले होते. वह्या, कात्रणे, बातम्यांचे सादरीकरण तेथे करण्यात आले.
या कक्षाला संमेलनाध्यक्ष साहित्यिक अशोक लोटणकर, राजापूर लांजा नागरिक संघाच्या सचिव स्नेहल अहिरे, निवेदक विजय हटकर, पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर, प्रमोद कोनकर, आंबेड हायस्कूलचे शिक्षक जयराज मांडवकर, कुडाळचे नितीन पावसकर, कवी समीर देशपांडे, लेखिका सौ. विजयालक्ष्मी देवगोजी, प्राथमिक शिक्षक श्रीकांत पाटील इत्यादी अनेक मान्यवरांनी भेट दिली. श्री. गुंजाळ यांच्या यांच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले. आपापल्या शाळांमध्ये तसेच संस्थांमध्ये या उपक्रमांचा परिचय करून देण्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्तींनी श्री. गोंडाळ यांना निमंत्रित केले आहे त्यामुळे त्यांच्या उपक्रमांना चालना मिळणार आहे.
प्रभानवल्ली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने श्री. गोंडाळ यांनी तयार केलेला व्हिडीओ