साठावी संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्चपासून रत्नागिरीत

रत्नागिरी : राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे साठावी महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धा येत्या १० मार्चपासून रत्नागिरीत होणार आहे. या स्पर्धेला संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त त्यांचे नाव देण्यात आले आहे.

नवकलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्या कलागुणांमधून व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणावा, यासाठी शासनामार्फत गेली ६० वर्षे राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धा घेतल्या जातात. त्यातीलच राज्य हौशी मराठी संगीत नाट्य स्पर्धा ही एक राज्यस्तरीय स्पर्धा आहे. नुकतीच रत्नागिरी केंद्रावर राज्य हौशी नाट्य स्पर्धा पार पडली. आता संगीत नाट्य स्पर्धेची राज्यस्तरीय प्राथमिक फेरी रत्नागिरीत येत्या १० मार्चपासून होणार आहे. त्यामध्ये राज्यभरातील तसेच गोव्यातील १६ नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला आहे.

रत्नागिरीच्या स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १० मार्च ते २७ मार्च या कालावधीत १२ मार्चचा अपवाद वगळता दररोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेतील नाट्यप्रयोग सुरू होईल. स्पर्धेदरम्यान १५ मार्च आणि २६ मार्च रोजी नाट्यप्रयोग होणार नाही.

स्पर्धेचा तपशील असा (तारीख, नाट्यसंस्था, नाटक, लेखक आणि दिग्दर्शक या क्रमाने) :
१० मार्च – अखिल चित्पावन ब्राम्हण विद्यार्थी सहाय्यक संस्था, रत्नागिरी, कट्यार काळजात घुसली, लेखक : पुरुषोत्तम दारव्हेकर, दिग्दर्शक : वामन जोग.
११ मार्च – अमृत नाट्य भारती, मुंबई (मराठी साहित्य संघ, मुंबई), धाडिला राम तिने का वनी, लेखक : द. ग. गोडसे, दिग्दर्शन : पं. अरविंद पिळगावकर.
१२ मार्च (रात्री ९.३० वाजता) – दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभा, दापोली, गोपिकारमणु स्वामी माझा, लेखक : विलास कर्वे, दिग्दर्शक : विलास कर्वे.
१३ मार्च -अस्तित्व मेकर्स फाउंडेशन, सोलापूर, संगीत स्वप्नवासवदत्तम्, लेखक : सुहास वाळुंजकर, दिग्दर्शक : बळवंत जोशी.
१४ मार्च – क्षितिज इव्हेंट, सावंतवाडी, संगीत मत्स्यगंधा, लेखक : वसंत कानेटकर, दिग्दर्शक : बाळ पुराणिक.
१६ मार्च – कलारंग नाट्यप्रतिष्ठान, खंडाळा, ता. जि. रत्नागिरी, मत्स्यगंधा, लेखक : प्रा. वसंत कानेटकर, दिग्दर्शक : नितीन जोशी.
१७ मार्च – खल्वायन, रत्नागिरी. ययाति आणि देवयानी, लेखक : वि. वा. शिरवाडकर, दिग्दर्शक : मनोहर जोशी.
१८ मार्च – आश्रय सेवा संस्था, रत्नागिरी, देवमाणूस, लेखक : नागेश जोशी, दिग्दर्शक : संदीप थोरात.
१९ मार्च – श्री ओंकार थिएटर्स, गोवा, कट्यार काळजात घुसली, लेखक : पुरुषोत्तम दारव्हेकर, दिग्दर्शक : अनिल आसोलकर.
२० मार्च – परस्पर सहाय्यक मंडळ (वाघांबे) मुंबई, सुवर्णतुला, लेखक : विद्याधर गोखले, दिग्दर्शक : घनश्याम जोशी.
२१ मार्च – कामगार अधिकारी कार्यालय, बृहन्मुंबई महापालिका, मुंबई, संगीत पंढरपूर, लेखक : जगदीश दळवी, दिग्दर्शक : वैशंपायन.
२२ मार्च – संक्रमण, पुणे, आरंभी स्मरितो पाय तुझे, लेखक व दिग्दर्शक : यतिन
माझिरे.
२३ मार्च – सान्वी कला मंच, मांद्रे, गोवा, विठू आलो माहेरा, लेखक : महादेव हरमलकर, दिग्दर्शक : अनिल आसोलकर.
२४ मार्च – मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक क्रीडा संघ, मोरजी, पेडणे, गोवा. शिक्का कट्यार, लेखक : यशवंत नारायण टिपणीस, दिग्दर्शक : साबाजी गं. च्यारी.
२५ मार्च – श्रुती मंदिर, सोलापूर, सूर-साज, लेखक व दिग्दर्शक : श्रीमती विद्या काळे.
२७ मार्च – वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली, तुका म्हणे आता, लेखक : पु. ल. देशपांडे, दिग्दर्शक : रघुनाथ कदम.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply