प्रवेश शुल्क : प्लास्टिकच्या दहा बाटल्या!

रत्नागिरीत ४, ५ मार्चला पृथ्वीवरील बदलांची माहिती देणारे अनोखे प्रदर्शन

रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने पुण्यातील असीमित आणि अनुनाद एज्युकेशनल अँड रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थांनी ‘पृथ्वीची कहाणी : माझा ग्रह – माझे घर’ या विषयावरील हे प्रदर्शन ४ आणि ५ मार्चला आयोजित केले आहे. प्रदर्शनाला प्रवेश शुल्क म्हणून प्लास्टिकच्या दहा बाटल्या आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या बाबुराव जोशी ग्रंथालयात सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनात पृथ्वीच्या निर्मितीपासून आत्तापर्यंत झालेल्या बदलांची माहिती आणि महाराष्ट्रात आढळणाऱ्या जैवविविधता विभागांची माहिती दिली आहे. या प्रदर्शनासाठी सहआयोजक म्हणून गोगटे- जोगळेकर महाविद्यालय, निसर्गयात्री संस्था आणि लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी सहभागी होत आहे.

विज्ञान आणि पर्यावरण याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती व्हावी, पृथ्वी आणि तिचे विश्वातील महत्त्व त्यांच्या लक्षात यावे, यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. या प्रदर्शनाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन असीमितचे सारंग ओक, निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड, मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूरदेसाई आणि अनुनादच्या पूजा खांडेकर यांनी केले आहे.

मानवनिर्मित कचऱ्याचा निसर्ग आणि जैवविविधतेवर होणारा परिणाम विद्यार्थी व नागरिकांना कळावा व त्यांच्याकडून त्याची काही प्रमाणात भरपाई व्हावी, या हेतूने या उपक्रमासाठी १० रिकाम्या प्लास्टिक बाटल्या हे अनोखे प्रवेश शुल्क ठेवलेले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने पाण्याच्या १ लिटरच्या १० रिकाम्या प्लास्टिक बाटल्या आणायच्या आहेत. अधिक माहितीसाठी सुहास ठाकूरदेसाई (९८२२२९०८५९), सुधीर रिसबूड (९४२२३७२०२०) यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply