रत्नागिरी : इंटरनेट आणि मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हेगारीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे असे गुन्हे घडल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा गुन्हे घडूच नयेत, यासाठी सर्वांनीच जागरूक राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सायबर गुन्हे अन्वेषण विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर यांनी केले.

फिनोलेक्स महाविद्यालयातील इंटर्नल कंम्प्लेट कमिटी आयोजित सायबर क्राइम अवेअरनेस अँड प्रिव्हेंशन या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सोशल मीडियाचा वाढत वापर तसेच ऑनलाइन माध्यमाद्वारे आर्थिक व्यवहार होत असताना सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक, शारीरिक किंवा मानसिक त्रास होईल, अशा फसवणुकीचे प्रकार वारंवार घडत आहेत. म्हणून पोलीस विभागाने “एहसास” या उपक्रमाअंतर्गत सायबर गुन्हे प्रमाण कमी व्हावे यासाठी शिक्षण संस्था, बँक, विविध सरकारी, निमसरकारी कार्यालये येथे जाऊन जाणीवजागृतीचे काम हाती घेतले आहे. यावेळी श्री. पुरळकर यांनी सायबर गुन्हे कशा प्रकारे घडू शकतात, त्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे, याची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद म्हणाले की, करोनाच्या वैश्विक महामारीनंतर ऑनलाइन लर्निंग आणि ऑनलाइन ट्रान्झॅक्शनचे प्रमाण वाढले आहे. परिणामी सर्वांचाच स्क्रीन टाइम वाढला आहे त्यामुळे सायबर गुन्हे घडू नयेत म्हणून आपण सर्वांनीच वेळीच खबरदारी घेण्यासाठी आयसीसीचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
आयसीसीच्या प्रमुख डॉ. शारदा चौगुले यांनी प्रास्ताविकात या कमिटीची आवश्यकता आणि कार्य उपस्थितांना विशद केले. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी सध्याच्या काळात इंटरनेटचा अधिकाधिक वापर दैनंदिन व्यवहारात अपरिहार्यपणे करत आहेत. त्यामुळे नकळत आपण आर्थिक, मानसिक फसवणुकीला बळी पडू नये यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण व्हावी, यासाठी कमिटीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
करोनाच्या नियमांचे पालन करून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. नेहा मराठे, तर आभार प्रदर्शन प्रा. वृंदा कुलकर्णी यांनी केले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड