गुढीपाडव्याला रत्नागिरीत जल्लोषात निघणार नववर्ष स्वागतयात्रा

रत्नागिरी : श्री देव भैरी जुगाई, नवलाई, पावणाई, तृणबिंदुकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्था आयोजित हिंदू नववर्ष स्वागतयात्रा येत्या २ एप्रिलला हिंदू एकतेचे दर्शन घडवत मोठ्या जल्लोषात काढण्यात येणार आहे. त्यामध्ये पारंपरिक वेशभूषेत रत्नागिरीकर हिंदू मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सुमारे ७५ संस्थांचे चित्ररथ, वाहने, ढोल, ताशापथके सामील होणार आहेत.

यासंदर्भात पतितपावन मंदिर संस्थेत झालेल्या बैठकीला भैरी देवस्थान संस्थेचे अध्यक्ष रवींद्र (मुन्नाशेठ) सुर्वे, उपाध्यक्ष राजन जोशी, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे, नववर्ष स्वागत यात्रेचे संयोजक आनंद मराठे, पतितपावनचे माजी अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, कॅप्टन कोमल सिंग, मोहन भावे, संतोष पावरी, सुधाकर सावंत, मुकुंद जोशी यांच्यासह सुमारे १०० पुरुष, महिला भगिनी उपस्थित होत्या.

स्वागतयात्रा प्रचारासाठी दुचाकी फेरीचे नियोजन करण्यात येत आहे. स्वागतयात्रेत गुलाल उधळला जाणार नाही. हिंदू बांधव आपापल्या परिसरात सजावट, रस्त्यावर रांगोळी काढून स्वागत करणार आहेत.

सुरुवातील दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर गेल्या १८ वर्षांत या स्वागतयात्रेमध्ये १५० हून अधिक संस्था, चित्ररथ सहभागी झाले होते, त्यांचा आढावा घेण्यात आला. विविध संस्था, संघटनांनी स्वागतयात्रेत चित्ररथासंबंधी माहिती दिली.

स्वागतयात्रा जल्लोषात निघण्याची वाट सर्व हिंदू बंधूभगिनी आतुरतेने पाहत आहेत, असे या वेळी सांगण्यात आले. यंदा सुमारे वीस नवीन संस्था सहभागी होणार आहेत. यात्रा जल्लोषात व मोठ्या दणक्यात निघेल, आपण सारे हिंदू एक आहोत याचे दर्शन घडेल, अशी विराट यात्रा काढण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.

श्री भैरी मंदिरातून ९.३० वाजता सुरवात होईल. श्री देव भैरी, खालची आळी, मुरलीधर मंदिर, विठ्ठल मंदिर, गोखले नाका, मारुती आळी, जयस्तंभ, राम आळी, राधाकृष्ण नाका, गोखले नाका, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिरात सांगता होईल. मारुती मंदिर येथूनही सकाळी ९.३० वाजता स्वागतयात्रा निघेल आणि ही यात्रा मूळ स्वागतयात्रेत जयस्तंभ येथे सामील होईल.

यात्रा नियोजन समितीची पुढील बैठक २९ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता पतितपावन मंदिरात आयोजित केली आहे.

रत्नागिरीत हिंदू नववर्ष स्वागतयात्रेच्या बैठकीला उपस्थित हिंदू समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply